Home जागर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काढलेले ‘मूकनायक’ नावाचे पहिले मराठी पाक्षिक !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काढलेले ‘मूकनायक’ नावाचे पहिले मराठी पाक्षिक !

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ३१ जानेवारी १९२० रोजी ‘मूकनायक’ नावाचे पहिले मराठी पाक्षिक काढले. सभोवारचे दु:ख आपल्या एकट्याचे नाही; आप्तस्वकियांचे मन याच जातीयतेच्या आगीत पोळले जातेय, ही वास्तविकता सर्व समाजाला कळविण्याचा हेतू त्यामागे होता. दु:खतप्त मनातील विश्वासनिर्मिती हीच व्यथाहरणाच्या मार्गातील पहिली पायरी असल्याची जाणीव बाबासाहेबांना होती. ‘मूकनायक’ हा बाबासाहेबांच्या पत्रकारितेचा अधिकृत आद्यबिंदू होता. महानायकाने सुरू केलेल्या या लढ्याला आज शंभर वर्षे होत आहेत. अनंत अडचणी आणि अस्तित्वाच्या संघर्षातून निघालेल्या वृत्तपत्राचे शतकी स्मरण औचित्याचे ठरते. ही अस्तित्वपत्राची शताब्दी साऱ्याच कळवळ्याच्या जातींनी साजरी करायला हवी.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तित्व विविधांगी वैशिष्ट्यांनी उजळले होते. अर्थतज्ज्ञ होते. त्याचवेळी मानसिक घुसमटीवर फुंकर घालण्याचे त्यांचे योगदानही अवर्णणीय आहे. त्यांची ज्वलंत पत्रकारिता हा स्वतंत्र अध्ययनाचा विषय आहे. समाजाने त्याची तितकीशी दखल घेतली नाही. बाबासाहेबांनी बहुसंख्य लेख इंग्रजीतून लिहिले. लोकपत्रकारितेची सुरुवात मात्र त्यांनी हेतुपुरस्सर मराठीतून केली. त्यांची लिखाणाची शैली सोपी होती. तत्कालीन व्यवस्थेला तडाखे देण्याचे काम त्यांनी नेटाने केले. अग्रलेखांमधून कुणाचाही मुलाहिजा न ठेवण्याचे त्यांचे व्रत होते. ‘नि:शंक हे तोंड वाजविलें’ या तुकाराम महाराजांच्या अभंगाला प्रत्येक अंकात शीर्षकाच्या बरोबरीने स्थान देण्याचा त्यांचा इरादा स्वयंस्पष्ट आहे.

बाबासाहेब अमेरिकेतून परतले होते. उच्च शिक्षणासाठी त्यांना लंडनला जायचे होते. दरम्यान या जननायकाने ‘मूकनायका’चा झेंडा उंचावला. त्यासाठी त्यांना पहिली आर्थिक मदत केली ती राजर्षी शाहू महाराजांनी. ‘मूकनायक’मध्ये अनेक जाहिराती येत. लक्षवेधी जाहिरात ठरली ती परळच्या गोदरेज तिजोरीची. ‘मूकनायक’चा खरा वाचक वंचित समाज होता. तिजोरी घेण्याची आर्थिक संपन्नता या वर्गाकडे अर्थातच नव्हती. जाहिरातींची गणिते संभाव्य आर्थिक लाभावर अवलंबून असतात. तरीही गोदरेज तिजोरीची जाहिरात ‘मूकनायक’मध्ये सतत दिसे. नवल भटेना या पारशी उद्योजकाची बाबासाहेबांवर अपार माया होती. सयाजीराव गायकवाडांनी फेलोशिप दिल्यामुळे बाबासाहेब अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात पीएच.डी.चे शिक्षण घेत होते. त्यावेळी भटेना यांनी स्वत:च्या खोलीत जागा देऊन बाबासाहेबांचा आर्थिक भार कमी केला. इतर शैक्षणिक कामासाठीही साह्य केले. फेलोशिप संपल्याने बाबासाहेब मुंबईत परतले. तत्कालीन गव्हर्नर, केळुस्कर गुरुजी आणि भटेनांच्या पुढाकारामुळे बाबासाहेबांना प्राध्यापकाची नोकरी मिळाली. या नोकरीतील पैसे जमवून ते लंडनला गेले. इंग्रजांच्या भूमीतून ते ‘मूकनायक’चे अग्रलेख लिहायचे. त्या काळात अत्यल्प प्रतिसाद मिळेल याची शाश्वती असतानाही ‘मूकनायक’ला गोदरेज तिजोऱ्यांची जाहिरात देण्याचे धाडस भटेनांनी दाखविले. सध्याचा काळ फुले, आंबेडकरांच्या मालिकांना वाहिन्यांवर अनेक प्रायोजक मिळण्याचा आहे. शंभर वर्षांपूर्वी समाज हेटाळणी करीत असताना एका पारशी उद्योजकाचे बाबासाहेबांसाठी धावून जाणे महत्त्वाचे ठरते. हे सख्य जणू ‘करी लाभाविण प्रीती’ या तुकोबारायांच्या वचनाचे उदाहरणच होते.

 

वृत्तपत्राचे माहात्म्य आणि जातीयवादाच्या सर्वस्तरीय फटक्याची कारणमीमांसा बाबासाहेबांनी ‘मूकनायक’च्या पहिल्याच अग्रलेखात केली. ते म्हणतात, ‘बहिष्कृत समाजावरील अनन्वित अन्यायावर उपाययोजना सुचविण्यास, तसेच त्यांच्या भावी उन्नतीच्या मार्गांबद्दल खऱ्या स्वरूपाची चर्चा होण्यास वर्तमानपत्रासारखी अन्य भूमीच नाही. एखादी जात अवनत झाली तर तिच्या अवनतीचा चट्टा इतर जातींना बसल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच स्वहितसाधू वृत्तपत्रांनी इतरांचे नुकसान करून आपले हित साधण्याचे पढतमूर्खाचे लक्षण शिकू नये.’

माणगाव आणि नागपुरातील परिषदा हा ‘मूकनायका’चा क्रांतिकारी टप्पा होता. स्थापनेनंतर दोन महिन्यांतच माणगावात दक्षिण महाराष्ट्रातील बहिष्कृत वर्गाची परिषद भरली. पाडव्याच्या सभेला पाच हजार लोक उपस्थित होते. ‘बाट्या लोकांच्या परिषदेला जाऊ नका’ असा अपप्रचार झाल्याने बरीचशी संख्या रोडावली. ‘कोल्हापूर दरबारातील वरिष्ठ दर्जाची मंडळी हजर होती. काही थोडे ब्राह्मण गृहस्थही हजर होते. परंतु डिप्रेस्ड क्लास मिशन व इतर बहिष्कृतांच्या हितासाठी झटणाऱ्या कोणत्याही संस्थेचे एक पिसूदेखील आले नव्हते हे ध्यानात ठेवण्यासारखे आहे’, असा परखड दम ‘मूकनायका’तून देण्यास बाबासाहेब विसरले नाहीत. आधीच्या काळात अस्पृश्यांना गावात असल्याची हजेरी नित्यनेमाने पाटलांकडे द्यावी लागायची. गैरहजेरीचा धाक दाखवून अधिकारीवर्ग कनिष्ठ समाजावर जुलूम करायचा. रोजच्या हजेरीचा रिवाज रद्द ठरविण्याचा लक्षणीय निर्णय शाहू महाराजांनी घेतला. त्यामागील विवेचन त्यांनी माणगावात केले. ‘सर्व पाटील लोक मला या कामात मदत करतील’ ही महाराजांची अपेक्षा ‘मूकनायक’च्या वार्तांकनात ठळकपणे आली. पुढे नागपुरातील कस्तुरचंद पार्कात अखिल भारतीय बहिष्कृत परिषद झाली. बाबासाहेब त्यात होते. शाहू महाराजांनी तेवढ्यासाठी नागपूर गाठले. माणगाव परिषदेत अस्पृश्यांच्या सोबतीने भोजनावळी केल्याबद्दल काही वर्गांमध्ये राजर्षी शाहूंबद्दल रोष होता. त्याचे पडसाद नागपुरात उमटले. महाराजांना राजवाड्यावर बोलवावे लागेल. शब्दाने शब्द वाढेल, याची नागपूरकर भोसल्यांना भीती होती. शिकारीचे निमित्त सांगून ते नागपूरबाहेर गेले. शाहू महाराजांचा सहवास त्यांनी खुबीने टाळला. नागपूरच्या कडक उन्हाची चिंता न करता परिषदेला दहा हजारांची गर्दी जमली. शाहू महाराजांचे जागोजागी स्वागत झाले. परिषदेचे वृत्त राज्यव्यापी करण्याचे काम ‘मूकनायक’ने केले.

पहिल्या लोकपत्रातून बाबासाहेबांनी वर्णव्यवस्थेवर आसूड ओढले. ‘शंकराचार्य की शर्कराचार्य’ या लेखात त्यांनी ब्राह्मणेतर शिष्यांचा तिटकारा करणाऱ्या धार्मिक पुढाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. जगात एकेकाळी श्रेष्ठ म्हणून लौकिक असलेल्या हिंदू धर्मावर धार्मिक गुलामगिरीमुळे दशा ओढवली असल्याचे बाबासाहेबांनी सुनावले. शंकराचार्य हे नाव सार्थ करायचे असेल, तर आता तरी शर्करामिश्रित लाडवांची भोजने सोडा आणि स्पर्शास्पर्शाचा भेद मोडून राष्ट्र वैभवशिखरावर जाईल असा उपदेश गावोगाव जाऊन करा, ही तंबी त्यांनी दिली. ‘ठराव पास करून थांबू नका, तर पूर्व आफ्रिका व फिजी बेटांवरील हिंदी लोकांवरील अन्याय तातडीने थांबवा’ अशी सूचना पंडित मदनमोहन मालवीय यांनी मुंबईच्या सभेत केली होती. ‘पण हे केव्हा?’ या लेखातून बाबासाहेबांनी मालवियांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात ओढले. ‘दूरदेशीचे सोडा, शताकानुशतके आपल्या देशाच्या पायाखालील अज्ञानमुक्तता केव्हा करणार?’ हा बाबासाहेबांनी मालवियांवर कळकळीतून केलेला प्रहार होता. अस्पृश्यांवर होणाऱ्या अन्यायाचे प्रसंग जनतेपुढे आणण्यासाठी बाबासाहेबांनी ‘आमची जखम’ शीर्षकाने अनुभवांची मालिका सुरू केली. वाचक सहभाग गरजेचा हे तथ्य शंभर वर्षांपूर्वी संपादक बाबासाहेबांनी हेरले. मुक्या जनतेला वाचा प्रदान करणारे पाक्षिक वारंवार येणाऱ्या अडचणींमुळे अखेर बंद पडले. ‘बहिष्कृत भारत’, ‘जनता’, ‘प्रबुद्ध भारत’,’समता’ अशी वृत्तपत्रे बाबासाहेबांनी काढली. ‘मूकनायका’चा प्रवास तडाखेबंद होता. पिचलेल्या समाजाच्या भूतकाळातील मौन सातत्याला छेद देत अक्षरहुंकार प्रदान करण्याचे काम त्यातून झाले. या लोकपत्रकारितेच्या शताब्दीचा क्षण सर्व भारतीयांसाठी महत्त्वाचा आहे. पत्रकारांनी यानिमित्ताने बाबासाहेबांविषयी जाहीर कृतज्ञता व्यक्त करावयास हवी. समाजातील ‘अवनतीचे चट्टे’ थोपविण्याच्या धडपडीला त्यातून निश्चितच बळ मिळेल.
वैभव सोनारकर