Home Breaking News ऐकावे ते नवल !एका तिळाचे केले शंभर तुकडे!

ऐकावे ते नवल !एका तिळाचे केले शंभर तुकडे!

इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये अभिषेकची कला

पुसद : इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने पुसदच्या अभिषेक सूर्यकांत रुद्रवारच्या कलेची दखल घेतली आहे. आपल्याकडे एक म्हण आहे, एक तीळ सात जणांनी वाटून खावा. या म्हणीचा विचार करीत अभिषेक ने एका तिळाचे चक्क शंभर तुकडे केले तेही १६ मिनिटे व २० सेकंदात. २० नोव्हेंबरला अभिषेकने त्याचा व्हिडिओ इंडिया बुक ऑफ रेकॉर्र्डला पाठवला होता. इंडिया बुकने अभिषेकला नुकत्याच त्याच्या विक्रमाची नोंद झाल्याचे कळवले आहे. भविष्यात एका तिळाचे दोनशे तुकडे करण्याचा अभिषेकचे धैय आहे.
नांदेडच्या एमजीएम महाविद्यालयात बीएफए अंतिम वर्षात अभिषेक शिकत आहे. मायक्रो आर्ट हा विषय त्याला आवडतो. त्याने आजपर्यंत मोहरी, तांदूळ, हराळी, सुपारी, खडू, पेन्सिल, काडेपेटी यावर गौतम बुद्ध, गणपतीचे चित्र रेखाटले आहे. एक इंच कागदावर राष्ट्रगीत, प्रतिज्ञा लिहिली आहे. सावित्रीबाई फुले जयंतीला अभिषेकने चनाडाळवर त्यांचे चित्र रेखाटले होते. यापूर्वी त्याने तिळावर इंग्रजी मुळाक्षरे व एक ते १०० पर्यंत अंकही लिहिले आहेत.
पेन्सिलच्या टोकावर त्याने सूक्ष्म कलेतून माहूरची रेणुकादेवी व कोल्हापूरची देवी साकारली आहे. त्याने तांदळाच्या दाण्यावर झेंडादेखील कोरला आहे. त्यासोबतच दर संक्रांतीला तांदळाच्या दाण्यावर पतंग काढतो. यात विशेष बाब म्हणजे अक्षरांमधून गणपतीचे रूप तो सहजतेने साकारतो. त्याने तयार केलेल्या अक्षररूपी गणपतीचे चित्र मनाला प्रसन्नता देते. त्याचीही इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. त्याचा आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्याचा मानस आहे. त्याचा नुकताच बाबासाहेब नाईक चित्रकला महाविद्यालयात सत्कार झाला.

मी तिळाचे एवढे सूक्ष्म तुकडे करूनही ते उघड्या डोळ्यांनी पाहता येतात. मला आजोबा कृष्णा नाना नालमवार व आजी लीला यांच्याकडून प्रोत्साहन मिळते. त्यांच्या कलाचे अनेक कंगोरे आहेत. रुपयाच्या नाण्यावर विविधरंगी निसर्गचित्र रेखाटणे, आपट्याच्या पानावर सुरेख निसर्गरंग भरणे हा छंद मी जोपासत आहे. – अभिषेक रुद्रवार, पुसद
————————

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here