Home जागर “माझ्या भीमाला सोडाल, तर देश फोडाल”, असं आपल्या कीर्तनात का सांगत गाडगेबाबा...

“माझ्या भीमाला सोडाल, तर देश फोडाल”, असं आपल्या कीर्तनात का सांगत गाडगेबाबा ?

ही खरी मौज आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म सोडला. राम-कॄष्ण नाकारले. संत गाडगेबाबा मात्र अखेरपर्यंत ‘गोपाला गोपाला, देवकीनंदन गोपाला’ गात राहिले.

अर्थात, आंबेडकर आणि गाडगेबाबा सदैव सोबत होते. एकाच ध्येयाच्या दिशेने चालणारे वाटसरू होते.

‘समता आणि ममता हाच आजचा रोकडा धर्म आहे’, असे सांगत गाडगेबाबांनी प्रस्थापित धर्म नाकारला आणि रूढी, अंधश्रद्धा, कर्मकांडांवर कठोर प्रहार केले. “जरा आधी भेटला असतात, तर धर्मशाळा बांधण्याऐवजी शाळा बांधल्या असत्या”, असे गाडगेबाबा बाबासाहेबांना आणि कर्मवीर भाऊरावांना सांगतात. एवढंच नाही फक्त, पंढरपुरातील धर्मशाळा बाबासाहेबांना देऊन टाकतात. पोटचा पोरगा मेल्यावर स्थितप्रज्ञ असणारे गाडगेबाबा, बाबासाहेब गेल्यावर मात्र धाय मोकलून रडतात. एवढंच नाही, बाबासाहेब गेल्यावर दहा दिवसांतच, म्हणजे २० डिसेंबर १९५६ ला देह ठेवतात.

हे काहीतरी विलक्षण नातं आहे या दोघांमध्ये.

बाबासाहेब गाडगेबाबांपेक्षा पंधरा वर्षांनी लहान. म्हणजे, त्या काळात मुलाच्याच वयाचे. बाबासाहेबांवर एवढी माया कशी गाडगेबाबांची!

“माझ्या भीमाला सोडाल, तर देश फोडाल”, असं आपल्या कीर्तनात सांगणारे गाडगेबाबा आणि आजारपणात जातीनं गाडगेबाबांकडं लक्ष देणारे बाबासाहेब हे काहीतरी वेगळं नातं आहे.

देवळात झोपणारा एक निःसंग साधू आणि विद्रोही क्रांतदर्शी असा मूकनायक यांच्यातलं हे नातं समजून घेतलं पाहिजे. कर्मवीर भाऊराव पाटीलही गाडगेबाबांपेक्षा लहान. पण, “पंढरपुरातल्या मंदिरात देव नाही सापडत. तो बघायचा असेल, तर हा भाऊराव पाटील बघा. तो आजचा देव आहे”, असं गाडगेबाबाबा सांगतात.

चळवळीची नवी परिभाषा आखताना हा इतिहास मुद्दाम अभ्यासला पाहिजे.

वरवर पाहाता भेद असले आणि प्रतिकं वा साधनं, एखादी कृती वा धारणा वेगळी असली, तरी अंतिमतः ही कामे सारखीच असतात, हे ओळखले पाहिजे. काहीवेळा वरवरच्या सामान्य भेदांनी आपण आपलेच समविचारी गमावतो आणि एकाकी होतो.
हा काळ सर्वांनी सोबत असण्याचा आहे. रात्रीच्या या अंधारात एकत्र शेकोटी पेटवण्याचा- कॅम्पफायरचा आहे.

अशावेळी बाबा-गाडगेबाबा यांचं एकत्र असणं केवढं आश्वासक वाटतं.

संजय आवटे

जेष्ठ संपादक, विचारवंत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here