Home Breaking News कापूस खेडा खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून दिड लाखाची वसुली

कापूस खेडा खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून दिड लाखाची वसुली

 

शेगांव बाजार समिती राबवित आहे मोहीम

शेगांव – खेडा खरेदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वजनात लुटण्यासोबतच बाजार समितीचा सेस व शासनाचा महसूल बुडविणाऱ्या व्यापारी विरोधात कारवाईची मोहीम शेगांव बाजार समितीकडून हाती घेण्यात आलेली आहे. त्या अंतर्गत आठवडा भरात तब्बल १६ व्यापाऱ्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून १ लाख २० हजार रुपयांचा सेस वसूल करण्यात आल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यात भरपूर प्रमाणात कापूस या शेतमालाची लागवड होते. त्यामध्ये संतनगरी शेगांव हा तालुका कापूस लागवडीसाठी ओळखला जातो. शेगांव तालुक्यात एकूण ७३ गांवे बाजार समिती कार्यक्षेत्रात येतात. शेगांव तालुक्यातून बाजार समितीत रोजची कापसाची आवक सरासरी ३ हजार क्विंटल ची राहते. गेल्या हंगामात पणन महासंघाकडून हमीभाव योजने अंतर्गत कापूस खरेदी करण्यात आलेली होती. त्यानुसार शेगांव शासकीय कापूस खरेदी केंद्रावर व परवाना धारक खाजगी जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी मध्ये बाजार समितीत ५५ हजार क्विंटलपर्यंत कापसाची खरेदी गेल्या हंगामात झाली होती.
यावर्षी कापसाचे दर तेजीत असल्याच्या परिणामी बाजार समिती ऐवजी खेडा खरेदीच्या माध्यमातून व्यापारी कापसाची उचल करीत आहेत. त्यामुळे बाजार समितीचा व शासनाचा महसूल बुडत असल्याने बाजार समिती व्यवस्थापनाने याविरोधात कारवाईचा निर्णय घेतला. त्या अंतर्गत कोणताही परवाना नसताना बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात कापसाची खरेदी करणाऱ्या शेगांव कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्रा बाहेरील सुमारे १६ व्यापाऱ्यांवर कारवाई करून १ लाख २० हजार रुपयांचा बाजार फी देखरेख फी सेस वसूल करण्यात आला. शेगांव बाजार समिती मध्ये कापसावर सुमारे प्रति शेकडा १ रु ५ पैसे कर आकारला जातो. हा महसूल बुडतो त्यासोबतच खेडा खरेदीत शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता देखील अधिक राहते. परिणामी बाजार समितीने उचललेल्या या पावलामुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये धडकी भरली आहे.

“बाजार कायदा,नियम व उपविधी नुसार स्थानिक प्राधिकरणाच्या मदतीने समितीचा कर बुडविणाऱ्या व्यापाऱ्यांकडून समितीला तीनपट दंड आकारून सेस वसूल करण्याचा अधिकार आहे. खेडा खरेदीतून शेतीमाल घेणाऱ्या व्यापाऱ्यांचा वजन काटा तपासला जातो. या माध्यमातूनही शेतकऱ्यांच्या लुटीचे प्रकार घडण्याची शक्यता असते. त्यासोबतच त्यांच्याकडे खरेदीचा अधिकृत परवाना आहे किंवा नाही हे देखील तपासल्या जाते. परवाना नसलेल्या १५ ते १६ व्यापाऱ्यांवर एका आठवड्याभरात कारवाई करण्यात आली असून त्या माध्यमातून १ लाख २० हजार रुपयांच्या बाजार फी व देखरेख सेसची वसुली बाजार समितीचे भरारी पथकामार्फत करण्यात आली आहे.”

विलास पुंडकर सचिव कृउबास, शेगांव

तालुक्यातील शेतकरी बांधवांनी कृपया बाजार समितीचे परवानाधारक कापूस खरेदीदार यांनाच आपला शेतमाल विक्री करून बाजार समितीस सहकार्य करावे जेणेकरून कोणत्याही शेतकरी बांधवांची फसवणूक होणार नाही

–  शेषराव पाटील, सभापती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here