Home Breaking News राज्य उत्पादन शुल्क विभागाने उगारला अवैध दारू विक्री धंद्यावर ‘ दंडुका ‘

राज्य उत्पादन शुल्क विभागाने उगारला अवैध दारू विक्री धंद्यावर ‘ दंडुका ‘

*१९ व २० नोव्हेंबर रोजी राबविली विशेष मोहीम
*१६ गुन्हे नोंदवून १६ आरोपींना अटक
*उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यास मारहाण; हॉटेल मालकास अटक

बुलडाणा,दि. २१: राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत सलग तिन दिवसांच्या शासकीय सुट्टीच्या अनुषंगाने अवैध दारु धंद्यावर कठोर कार्यवाही करण्याकरीता संयुक्त मोहिम राबविण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त,नागपूरचे विभागीय उप-आयुक्त व अधीक्षक श्रीमती भाग्यश्री पं.जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीकाऱ्यांनी या कार्यालयाचे आदेशाने दिनांक १९ व २० नोव्हेंबर असे दोन दिवस मोहीम राबविली. उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू विक्री, साठवण व निर्मिती वर आपला दंडुका उगारून कारवाई केली आहे.
त्यामध्ये गवळीपुरा चिखली, शेळगांव आटोळ ता.चिखली, बोराखेडी व वरुड शिवार ता.मोताळा, राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ ता.खामगांव व देऊळगांव मही ता.दे. राजा या ठिकाणी अवैध दारु धंद्याविरुद्ध निरीक्षक चिखली व खामगांव कार्यक्षेत्रामध्ये संयुक्त मोहीम राबविण्यात आली. यामध्ये एकुण १६ गुन्हे नोंदवुन १६ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. सदर कारवाईमध्ये २१२ लि. हातभट्टी दारु, २६३४ लि. मोहा रसायन, ३०.३५ लि. देशी दारु, १.६२ लि. विदेशी दारु व एक वाहन जप्त करुन १ लक्ष ५१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे.


या कारवाई दरम्यान दे. मही ते दे. राजा या महामार्गावरील हॉटेल निर्सग ढाबा या ठिकाणी अवैध देशी दारु विक्री बाबत गुप्त माहिती प्राप्त झाली. त्यानुसार सदर ठिकाणी पथकाने दारुबंदी गुन्हे कामी छापा टाकुन अरुण तेजराव शिंगणे विरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा चे कलम ६५ ई नुसार गुन्हा नोंदवित असतांना सदर हॉटेल/ढाबा मालक अमोल तेजराव शिंगने याने पथकातील अधीकारी व कर्मचारी यांच्याशी दारुच्या नशेमध्ये वाद घातला. शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली तसेच लाथा बुक्यांनी, लोखंडी पाईपने कर्मचाऱ्यांना मारहाण करुन दारुची बॉटल फोडुन पथकातील कर्मचारी विशालसिंग पाटील यास जखमी केले व सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण केला.
त्यामुळे सदर घटनेची फिर्याद प्रकाश विरभद्र मुंगडे यांनी देऊळगांव राजा पोलीस स्टेशनला देऊन देऊळगांव राजा पोलिसांनी आरोपीत इसम अमोल तेजराव शिंगणे यास भारतीय दंड संहिता १८६० कलम ३५३, ३३२,५०४,५०६ नुसार अटक केली. त्यानंतर देऊळगांव राजा न्यायालय येथे हजर केले असता त्यास न्यायालयाने १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये रवाना केले आहे. शासकीय कामकाज करतांना सरकारी कर्मचाऱ्यांवर अशा प्रकारे हल्ला होणे हा गंभीर गुन्हा आहे. सदर ढाब्यावर या पूर्वी देखील उत्पादन शुल्क विभागाने दारुबंदी गुन्हे कामी गुन्हे नोंदविले असुन विभाग लवकरच त्याचेवर फौ.प्र.सं.चे कलम ९३ नुसार प्रतिबंधात्मक कारवाई करणार आहे.
महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ८६ प्रमाणे कोणत्याही जागेचा वापर दारुचा गुत्ता म्हणुन चालवीने हा अपराध आहे. सदर विभाग हा अतिशय तोकडया मनुष्यबळावर पुर्ण जिल्हयात कागकाज करीत आहे. त्यामध्ये
कर्मचाऱ्यांवर अशा प्रकारे जिवघेणा हल्ला होणे हा चिंतेचा विषय आहे. आपल्या परीसरात अशी अवैध मद्य विक्रीची अथवा बनावट मद्य निर्मीती आढळल्यास विभागाचे टोल फ्री नंबर १८००८३३३३३ वर किंवा व्हॉट्अॅप नंबर ८४२२००११३३ वर किंवा excisesuvidha. mahaonline.gov.in या विभागाचे पोर्टलवर माहिती कळविण्यात यावी. सदर कार्यवाहीत निरीक्षक जी.आर.गांवडे, आर.आर.उरकुडे, दुय्यम निरीक्षक एन.के.मावळे, आर.के.फुसे, पी.व्हि.मुंगडे, एस.डी.चव्हाण, वार.रा.बरडे व त्यांच्या अधिपत्याखालील सर्व जवान तसेच जवान-नि-वाहनचालक यांनी सहभाग घेतला होता, असे अधीक्षक श्रीमती भाग्यश्री जाधव यांनी कळविले आहे.