Home Breaking News वस्तू व सेवाकराची चुकवेगिरी प्रकरणी अमरावती विभागातील पहिला गुन्हा खामगावात

वस्तू व सेवाकराची चुकवेगिरी प्रकरणी अमरावती विभागातील पहिला गुन्हा खामगावात

१७ कोटी रूपयांची थकबाकी: दुर्गाशक्ती फूडस्च्या शशिकांत सुरेका  विरोधात गुन्हा दाखल

खामगाव: शासनाच्यावतीने ग्राहकांकडून जमा केलेला वस्तू व सेवा कर वर्षानुवर्ष शासनाच्या तिजोरीत जमा न करता खामगाव येथील दुर्गाशक्ती फुडस प्रा.लि. खामगावचे संचालक शशीकांत  सुरेका यांनी शासनाची फसवणूक केली. सुनियोजितपणे शासनाची फसवणूक, अफरातफर आणि शासकीय रक्कमेच्या करचुकवेगिरी प्रकरणी खामगाव येथील शिवाजी नगर पोलिस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. वस्तू व सेवाकर कायदा २०१७ अन्वये हा अमरावती विभागातील पहिला गुन्हा असून देशातील सहाव्या क्रमांकाचा गुन्हा असल्याचे समजते.
खामगाव येथील  दुर्गाशक्ती फुडचे संचालक शशीकांत फकीरचंद सुरेका यांनी ग्राहकांकडून जमा केलेला वस्तू व सेवा कर वर्षानुवर्ष शासकीय तिजोरीत जमा केला नाही. त्यामुळे जीएसटीच्या कलम ६२ अन्वये वस्तू व सेवा कर विभागाने आदेश पारीत करीत अमरावती विभागीय सह आयुक्त टी.के. पाचरणे यांच्या आदेशान्वये खामगाव येथील सहा. आयुक्त डॉ. चेतनसिंग राजपूत यांनी बुधवारी खामगाव येथील शिवाजी नगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली. या तक्रारीच्या अनुषंगाने शिवाजी नगर पोलिसांनी दुर्गाशक्ती फुडसचे संचालक आणि मालक शशीकांत सुरेका यांच्या विरोधात महाराष्ट्र वस्तू व सेवा कर कायदा २०१७ कलम १३२ (१),(ड), १३२ (२), भादंवि कलम ४२०, ४०६, ४०९, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला.

पत्रकार बनायचे… कॉल करा..!

मालमत्ता गहाण; वसुली येणे अशक्य!
– दुर्गाशक्ती फुडसच्या संचालकांची सर्व मालमत्ता बँकाकडे गहाण असल्यामुळे शासनाच्या थकबाकीची वसुली येणे अशक्य होते. गुन्हेगारी पध्दतीने त्यांनी नियोजित पध्दतीने शासनाची फसवणूक केली. प्रदीर्घ कालावधीपासून ‘विवरणपत्र कसूरदार’ ठरणे अखेर शशीकांत सुरेका यांच्या अंगलट आले.

मॅरेथॉन बैठकीनंतर गुन्हा दाखल
– सुनियोजीत गुन्हेगारी, अफरातफर प्रकरणी खामगाव येथील वस्तू व सेवाकर खामगाव कार्यालयाचे सहा. राज्यकर आयुक्त डॉ. चेतनसिंग राजपूत आणि खामगाव येथील अपर पोलीस अधिक्षक तथा प्रभारी जिल्हा पोलीस अधिक्षक श्रवण दत्त यांच्यात तब्बल ९ तास मॅरेथॉन बैठक चालली. करचुकवेगिरीसाठी फसवणूक शासनाची फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच श्रवण दत्त यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिलेत.

गुन्हेगारीपध्दतीने शासनाची कर चुकवेगिरी केल्या प्रकरणी खामगाव येथील दुर्गाशक्ती फुडस्च्या संचालकांविरोधात बुधवारी रात्री तक्रार प्राप्त झाली. त्यानुसार महाराष्ट्र वस्तू व सेवा कर कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.
अरूण परदेशी
निरिक्षक, शिवाजी नगर, पोलीस स्टेशन, खामगाव.