Home Breaking News हा ‘एसटी’ ची मालमत्ता हडप करण्याचा डाव;  आ.फुंडकर यांचा ठाकरे सरकारवर आरोप

हा ‘एसटी’ ची मालमत्ता हडप करण्याचा डाव;  आ.फुंडकर यांचा ठाकरे सरकारवर आरोप

एसटीच्या संपकर्‍यांना न्याय मिळेपर्यंत भाजपा संघर्ष करणार
बुलडाणा, 10 नोव्हेंबर
संकटग्रस्त जनता, अन्यायग्रस्त शेतकरी, अत्याचारग्रस्त महिला, दुर्लक्षित विद्यार्थी आणि नोकरभरतीच्या नाटकात फसलेले उमेदवार यांच्या रांगेत आता राज्य सरकारने एसटी कर्मचार्‍यांनाही बसविले असून फसवणुकीच्या खेळासाठी नवे खेळणे म्हणून एसटी कर्मचार्‍यांना वेठीस धरले जात आहे. वेळेवर वेतन मिळत नसल्याने कुटुंबाची घडी विस्कटत असताना ठाकरे सरकार मात्र संपकरी कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई करून त्यांच्या जखमांवर मीठ चोळत असल्याने एसीटी कर्मचार्‍यांसोबत आता सरकारशी संघर्ष करण्यासाठी भाजप राज्यभर संघर्ष चालूच ठेवेल असे भाजपचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.आ. आकाश फुंडकर यांनी 10 नोव्हेंबर रोजी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे जाहीर केले.


पंजाबच्या एका भागात आणि दिल्लीच्या सीमेवर हट्टाने आंदोलन करीत केंद्र सरकारला व जनतेस वेठीस धरणार्‍या शेतकर्‍यांविषयी कळवळा दाखवून मंत्रिमंडळ बैठकीत श्रद्धांजलीचे राजकारण करणार्‍या ठाकरे सरकारला एसटी महामंडळातील 30 हून अधिक कर्मचार्‍यांनी केलेल्या आत्महत्यांचे दुःख होत नाही असा जळजळीत आरोप आ.फुंडकर यांनी केला. ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी केवळ बहुजन हिताय या भावनेने तुटपुंज्या पगारात जनतेची सेवा करताना कौटुंबिक समस्यांची पर्वा केली नाही. महामंडळाच्या बेपर्वाईमुळे वेळेवर पगारदेखील मिळत नसताना सेवा करणार्‍या कर्मचार्‍यांमध्ये नैराश्य पसरल्याने 30 हून अधिक कर्मचार्‍यांनी वेगवेगळ्या आगारांमध्येच आपले जीवन संपविले. कोरोनासारख्या संकटकाळात जिवावर उदार होऊन एसटी कर्मचार्‍यांनी बजावलेल्या सेवेची राज्य सरकारने उपेक्षा केली आहे, अशी खंतही आ. फुंडकर यांनी व्यक्त केली. एसटी कर्मचार्‍यांना कर्तव्याची जाणीव करून देणारे ठाकरे सरकार, कर्मचार्‍यांच्या हक्काचा पगार मात्र वेळेवर देत नाही. महामंडळाच्या आर्थिक बेशिस्तीचा फटका कर्मचार्‍यांना बसत असल्यामुळेच महामंडळाचे सरकारमध्ये विलीनकरण करावे आणि सरकारी कर्मचार्‍यांचे हक्क एसटी कर्मचार्‍यांना द्यावेत अशी संपकरी कर्मचार्‍यांची मागणी आहे. महामंडळास आणखी डबघाईस आणून एसटीची कोट्यवधींची मालमत्ता खाजगीकरणाच्या माध्यमातून घशात घालण्याचा सरकारचा डाव असून त्यासाठी कर्मचार्‍यास वेठीस धरून आत्महत्येस प्रवृत्त केले जात आहे. त्यामुळे गरीब कर्मचार्‍यांच्या आत्महत्यांना सरकारच जबाबदार आहे, असा आरोपही आ.फुंडकर यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here