Home Breaking News भूखंड माफिया गँगला दिवाळी पुर्वीच फटाके!

भूखंड माफिया गँगला दिवाळी पुर्वीच फटाके!

 

नियमबाह्य फेरफार अखेर रदद ; भूमि अभिलेख उप अधिक्षकांचा आदेश

खामगाव : स्थानिक शिट क्रमांक 35 प्लॉट क्रमांक 8 या जागेचा एनए झाला असल्याचे समजून अनावधनाने चुकीने फेरफार करण्यात आल्याचे कबुल करीत, सदर फेरफार रदद करण्याचे आदेश भूमि अभिलेखचे उप अधिक्षक यांनी दिला आहे. त्यामुळे या बहुचर्चित वादग्रस्त भुखंड गिळंकृत करण्याचे मनसुबे उधळले गेले आहेत. दरम्यान या आदेशाने भूखंड गँगला दिवाळी पुर्वीच फटाके लागले असल्याची चर्चा रंगत आहे.

अधिक वृत्त असे कि, खामगाव येथील शिट क्रमांक 35 प्लाट क्रमांक 8 ही जागा खामगाव शहराच्या सुधारित विकास योजनेच्या नकाशात आरक्षण क्रमांक 52 टाउन सेंटर म्हणून आरक्षित जागा दर्शविली आहे. आरक्षित जागेचे नगर पालिकेची परवानगी न घेता या भूखंडाचे तुकडे पाडून विक्री केल्याचे नमुना ड वरून दिसून आले. त्यामुळे महाराष्ट्र जमीन महसूल संहितेप्रमाणे घेण्यात आलेली नोंद रदद करणे बाबत नंदलाल रमणलाल भटटड यांनी भूमि अभिलेख उप अधिक्षक कार्यालयाकडे तक्रार दाखल केली होती. उपरोक्त जागेवर एनएचे आदेश नसताना ही तेरा वर्षे जुन्या शिटच्या आधारे नोंद करण्यात आली आहे. त्याबाबत चौकशी सुरू झाली आणि समिर नरेंद्र संचेती, प्रमोद अग्रवाल( पप्पू सेठ), विनय अग्रवाल व चंद्रकांत संचेती यांचे पितळ उघडे पडले. या प्रकरणात भूमि अभिलेख उप अधिक्षक कार्यालयाकडे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 258 नुसार पुनर्विलोकनची परवानगी मागण्यात आली होती. यावर भूमि अभिलेख उप अधिक्षक यांनी आपल्या आदेशात उल्लेख केला आहे की, अर्जदार यांनी सादर केलेल्या मोजणी शिटचे अवलोकन केले असता खामगाव येथील शिट क्र 35 प्लाट क्रमांक 8 प्रकरण कार्यालयाकडून नाशात काढलेले नाही तसेच कार्यालयात या मिळकतीचे मिळकत पत्रीका अभिलेखात उपलब्ध आहेत. त्यावर यापुर्वी फेरफार क्र.3115 दि.15-10-2007 रोजी अर्जदार यांच्या नावाची नोंद करण्यात आली आहे. तसेच नोंद करतांना भुखंड क्रमांक 1 ते 16 अशी नोंद करण्यात आली आहे. सदर मिळकत नगर भूमापण कडील असल्याने सदर मिळकत ही एनए झालेली असावी, असा कयास बांधून फेरफार घेण्यात आला आहे. चौकशीअंती असे निदर्शनास आले आहे कि ज्या मिळकत पत्रिकेच्या आधारे फेरफार घेण्यात आलेला आहे ती मिळकत एन.ए. झालेली नाही आहे. त्याबाबतचा कुठलाही एन.ए. आदेश अर्जदार सादर करू शकलेले नाही. त्यामुळे झालेला फेरफार हा सदोष झालेला आहे असे स्पष्ट झाले. त्यामुळे तो फेरफार रद्द समजावा तसेच या बाबतची समज सर्वाना देवून फेरफार रजिस्टर वर तशी नोंद घेण्यात यावी असे भूमि अभिलेख उप अधिक्षकांचा आदेश आदेशात नमूद केले आहे. या आदेशाने तक्रारकर्त्याला दिलासा मिळाला असून सत्याचा लढाईत ‘पप्पू’ सेठ फेल तर नंदलालाचा बोलबाला होत असल्याचे या प्रकरणात दिसून आले आहे.

आयकर विभागाने लक्ष द्यावे- नंदू भट्टड

 

भूखंड प्रकरणात समाविष्ट असलेल्या लोकांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करून करचुकवेगिरी केली असल्याची शक्यता आहे तरी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याकडे आयकर विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी सुद्धा सामाजिक कार्यकर्ते नंदू भट्टड यांनी केली आहे.