Home Breaking News असा झाला पाऊस, अशी आहेत जलसाठे!

असा झाला पाऊस, अशी आहेत जलसाठे!

जिल्ह्यात संततधार…!

सरासरी 36.2 मि.मी पावसाची नोंद
बुलडाणा तालुक्यात सर्वात जास्त 89.7 मि.मी पाऊस
मेहकर, दे. राजा, सिं.राजा, लोणार तालुक्यांनी ओलांडली शंभरी
9 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद
बुलडाणा, (जिमाका) दि.28 : गत दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यात काही भागात मुसळधार, तर कुठे दमदार, कुठे मध्यम अशा स्वरूपात वरूण राजा हजेरी लावत आहे. मात्र काल रात्रीपासून सर्वत्र मुसळधार पावसाचे धुमशान जिल्ह्यात दिसून येत आहे. यामुळे नदी नाल्यांना पूर आला असून नदीकाठावरील धरणांमधून विसर्ग करण्यात येत आहे. जिल्ह्यातील वान, पुर्णा, नळगंगा, पैनगंगा, विश्वगंगा, ज्ञानगंगा, खडकपूर्णा आदी नद्यांना पूर आला आहे.

जिल्ह्यात बुलडाणा तालुक्यात सर्वात जास्त 89.7 मि.मी पावसाची म्हणजेच अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत महसूल विभागाकडील नोंदीनुसार सरासरी 36.2 मि.मी पाऊस जिल्ह्यात झाला आहे. तसेच आतापर्यंत सर्वसाधारण पर्जन्यमानाशी तुलना केली असता मेहकर तालुक्यात 128.79 टक्के पाऊस झाला आहे. मेहकर पाठोपाठ सिं. राजा 111.45, दे. राजा 103.70, लोणार तालुक्यात आतापर्यंत 107.11 टक्के पाउस झाला आहे.

जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंत नोंदविलेला पाऊस पुढीलप्रमाणे : कंसातील आकडेवारी आजपर्यंत झालेल्या पावसाची. बुलडाणा : 89.7 मि.मी (880.5), चिखली : 29.3 (761.9), दे.राजा : 45 (730.7), सिं. राजा : 16.2 (893.7), लोणार : 15.1 (934.6), मेहकर : 26.4 (1080.2.), खामगांव : 36.4 (697.5), शेगांव : 33.3 (524.4), मलकापूर : 28.8 (567.4), नांदुरा : 48.1 (608.9), मोताळा : 48.6 (642.9), संग्रामपूर : 24.7 (638.1), जळगांव जामोद : 28.4 (487.5)

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 9448.3 मि.मी पावसाची नोंद झाली असून त्याची सरासरी 726.8 मि.मी आहे. आतापर्यंत सर्वात कमी 487.5 मि.मी पावसाची नोंद जळगांव जामोद तालुक्यात झाली आहे. त्याची टक्केवारी 68.95 आहे. तसेच जिल्ह्यात 9 महसूल मंडळात अ‍तिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. बुलडाणा तालुक्यातील बुलडाणा मंडळात 88.8, रायपूर 95.5, पाडळी 89.5, धाड 75.5, साखळी 112.8, देऊळघाट 112, चांधई ता. चिखली 65.3, निमगांव ता. नांदुरा 67.3, धा. बढे ता. मोताळा 70.8 मिली या अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील जलसाठ्यात वाढ

जिल्ह्यातील तीन मोठ्या व 7 मध्यम प्रकल्पांत जलसाठा पुढीलप्रमाणे : आजचा पाणीसाठा व कंसात टक्केवारी – नळगंगा : 55.01 दलघमी (79.35), पेनटाकळी : 45.50 दलघमी (75.85), खडकपूर्णा : 84.39 दलघमी (90.36), पलढग : 7.51 दलघमी (100), ज्ञानगंगा : 33.93 दलघमी (100), मन : 36.37 दलघमी (98.77), कोराडी : 15.12 दलघमी (100), मस : 10.18 दलघमी (67.74), तोरणा : 7.66 दलघमी (97.12) व उतावळी : 19.79 दलघमी (100).

प्रकल्पांमधून विसर्ग सुरू

जिल्ह्यात काल रात्री व सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रकल्पांमध्ये जलसाठा वाढला आहे. काही प्रकल्पांमधून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मन प्रकल्पाची जलाशय पाणीपातळी 374.50 मीटर असून जीवंत पाणी साठा 98.77 टक्के आहे. प्रकल्पातून आज दुपारी 4.50 वाजता 5 दरवाजे 0.20 मीटरने उघडण्यात आले आहे. सद्यस्थितीत नदीपात्रात एकूण 120.00 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोराडी प्रकल्पाच्या सांडव्यावरून 25 से.मी ने 34.65 क्युसेक विसर्ग सुरू आहे. खडकपूर्णा प्रकल्पातून 19 दरवाजे 50 से.मी उघडल्यामुळे नदीपात्रात 37940.7 क्युसेक प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ज्ञानगंगा प्रकल्पाच्या सांडव्यावरून 112.67 क्युसेक विसर्ग सुरू आहे. तसेच पलढग प्रकल्पाच्या सांडव्यावरून 20 से. मी उंचीवरून 47.29 क्युमेक विसर्ग सुरू आहे. प्रशासनाने नदीकाठावरील गावांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच पेनटाकळी प्रकल्पातून पुर नियंत्रणासाठी सायं 4.45 वा दोन वक्रद्वार 25 से.मी उघडून नदीपात्रात 181.167 क्युमेक विसर्ग करण्यात येत आहे.