Home Breaking News वाकूड सशस्त्र हाणामारीतील कोमात गेलेल्या गजानन लाहुडकर यांचा मृत्यू ; खुनाचा गुन्हा...

वाकूड सशस्त्र हाणामारीतील कोमात गेलेल्या गजानन लाहुडकर यांचा मृत्यू ; खुनाचा गुन्हा होणार दाखल

खामगाव ः तालुक्यातील वाकुड येथे झालेल्या सशस्त्र हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या गजानन वासुदेव लाहुडकर (49) यांचा 22 सप्टेंबर रोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास मृत्यू झाला. तलवारीचे गंभीर घाव बसल्याने ते घटनेच्या दिवसापासून कोमात होते. या प्रकरणात भरत विश्‍वासराव लाहुडकार सध्या तुरुंगात आहे. त्याआधी पिंपळगाव राजा पोलिसांनी या प्रकरणात चौघांना अटक केली होती. ते सध्या जामिनावर आहेत.
8 एप्रिलला वाकूड (ता. खामगाव) येथे भूमी अभिलेख कार्यालयाचे अधिकारी मोजणीसाठी उपस्थित होते. त्यावेळी ही घटना घडली. भरत लाहुडकर याने माजी सरपंच सोपान लाहुडकर यांच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला केला होता. यात तलवार, कुऱ्हाड, लोखंडी रॉडचा वापर करण्यात आला. हल्ल्यात सोपान लाहुडकर यांच्या परिवारातील सहा जण गंभीर जखमी झाले होते. यातील तिघांना अकोला तर तिघांना खामगाव येथे उपचारासाठी हलविण्यात आले होते. जखमींपैकी 5 जण बरे झाले होते. मात्र गजानन लाहुडकर कोमात होते. अकोल्यातील विदर्भ रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली.
हल्ल्यातील गंभीर जखमीचा मृत्यू झाल्याने या प्रकरणात आता खुनाच्या गुन्ह्याचाही समावेश होणार आहे.