Home पुणे वाहतूक पोलिसांनी आ. रोहित पवार यांना आकाराला होता दंड ; नंतर भेट...

वाहतूक पोलिसांनी आ. रोहित पवार यांना आकाराला होता दंड ; नंतर भेट झाल्यानंतर पवारांनी असा सांगितला अनुभव !

 

पुणे : वाहतूक पोलीस दिसला की सर्वसामान्य माणूस थोडा भांबावून जातो; काही अपवाद सोडले तर वाहतूक पोलीस आपले कर्तव्य बजावत असतात. वाहतूक चांगली राहावी आणि अपघातांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी नागरिकांनी नियम पाळणे गरजेचे असते. ही जागृती ते करतात. परंतु लोक नियम पाळत नाहीत आणि नंतर पोलिसांनी दंड केला की राजकीय नेत्यांना फोन लावणे, हुज्जत घालणे असे प्रकार करतात.  मात्र यासंदर्भात आमदार  रोहित पवार यांनी आपला एक वेगळाच अनुभव सांगितला आहे .शांत संयमी आणि मितभाषी अशी ओळख असलेले कर्जत मतदार संघाचे आमदार रोहित दादा पवार यांनी वाहतूक पोलिसांबाबत आपला एक अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. रोहित पवार आमदार नसताना त्यांना वाहतूक पोलिसांनी दंड केला होता त्यानंतर हेच पोलीस आता आमदार असताना रोहित पवार यांना भेटले आणि या भेटीत जे घडलं त्याचं भावनिक वर्णन रोहित पवार यांनी केले आहे.

दादा म्हणतात……

वाहतूक पोलीस नेहमीच दंडाची पावती फाडतात, असा तुमचा समज असेल तर तो गैरसमज आहे. दररोज शेकडो लोकांना तोंड देणाऱ्या या कर्मचाऱ्यांकडून अचानक तुम्हाला कौतुकाचीही पावती मिळू शकते. मलाही काल असाच अनुभव आला.

वाहतूक विभागात कार्यरत असलेल्या काही पोलीस कर्मचाऱ्यांची काल पुण्यात एका ठिकाणी भेट झाली. यावेळी सोबत फोटो काढायची इच्छा त्यांनी व्यक्त केल्याने आम्ही फोटो काढला. त्यातील एका कर्मचाऱ्याने मे २०१९ मध्ये माझ्या गाडीवर दंड आकारला होता. ती घटना मी विसरूनही गेलो होतो, पण त्या कर्मचाऱ्याने त्या घटनेची आठवण काढली आणि तुम्ही आमदार नसताना तेंव्हाचा स्वभाव आणि आताचा स्वभाव यात काहीच फरक नसल्याचं सांगत दंडाची नाही तर चांगल्या वर्तणुकीची पावती दिली. वाहतूक पोलिसाकडून मिळालेलं हे ‘प्रमाणपत्र’ पाहून मलाही सुखद धक्का बसला.

ऊन, थंडी, पाऊस याची कोणतीही पर्वा न करता नागरिकांच्या सुरक्षेसाठी १२-१२ तास रस्त्यावर उभं राहून कर्तव्य बजावणाऱ्या या पोलीस कर्मचाऱ्यांबाबत मला नेहमीच आदर वाटत आला आहे. नागरिकांनीही हुज्जत न घालता या कर्मचाऱ्यांना नेहमी सहकार्य करावं, असं माझं आवाहन आहे.

असा होता जुना प्रसंग

एका सिग्नलवर हे पोलिस कर्मचारी गाडीजवळ आले. त्यांनी त्यांच्या सिस्टिममध्ये गाडीचा नंबर टाकला होता व त्यावरुन गाडी झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे उभा असल्याच आणि त्यावर दंड असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी दंड आकारला. गाडीचा ड्रायव्हर असतो आणि तो कधीतरी चूक करतो पण मी अनेकदा बघतो की वाहतुकीची नियम कळत नकळत पणे मोडले की लोक हुज्जत घालतात.

प्रामाणिकपणे सांगायच तर अनेकदा मला देखील वाहतुकिचे नियम मोडलेत दंड माफ करायला सांगा म्हणून मित्र कधीकधी फोन करतात. तेव्हा तुमची चूक आहे दंड भरा असच माझं उत्तर असत. पोलीस कर्मचारी हे आपल्या सेवेसाठी उन्हातान्हात उभे असतात. ते आपलं कर्तव्य बजावत असतात अशा वेळी आपण नियम पाळून एक भारतीय नागरिक असल्याचं कर्तव्य बजावायला हवं अस मला वाटतं.

या कर्तव्यतत्पर कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधता आल्याचं मनापासून समाधान वाटतं असेही आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे.