मुंब्रा : मुक्या प्राण्यांवर दया करा असा संदेश नेहमी दिला जात असतो मात्र याला काळीमा फासणारी घटना मुंब्रा येथे घडली आहे, दिवसाढवळ्या एका निष्पाप कुत्र्याला वृद्ध व्यक्तीने ठार केले. मुंब्रा पोलिसांनी आयपीसीच्या कलम 429 अंतर्गत वृद्धाविरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि पुढील कारवाई करत आहेत.
जेव्हा कोणी वाईट वागते तेव्हा त्याला प्राण्यांसारखे वागणे म्हटले जाते, परंतु जेव्हा मनुष्य एखाद्या जनावराला घृणास्पद कृत्य करून मारतो, तेव्हा त्यालाही क्रूर म्हटले पाहिजे. अशीच घटना मुंब्रामध्ये घडले आहे. मुंब्राच्या संजयनगर भागात राहणारा फिरोज अहमद शेख यास एक कुत्रा रस्त्याच्या मधोमध घाण पसरवतो याचा राग आला. त्याचा राग इतक्या पातळीवर पोहोचला की त्याने एका कुत्र्याला जाड स्टंपने मारले. यात कुत्र्याचे डोके फुटले आणि रक्तस्त्राव सुरू झाला, त्यानंतर काही तरुणांनी कुत्र्याला रुग्णालयात दाखल केले परंतु दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी भादंविच्या कलम 429 अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सुरू आहे. या कलमांतर्गत आरोपींना 5 वर्षांपर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्हीसह शिक्षा करण्याची तरतूद आहे.