Home जागर प्रशंसनीय कार्य !थॅलेसिमीया ग्रस्त चिमुकल्यांसाठी ३२६रक्तदात्यांनी केले रक्तदान

प्रशंसनीय कार्य !थॅलेसिमीया ग्रस्त चिमुकल्यांसाठी ३२६रक्तदात्यांनी केले रक्तदान

प्रवीण डवंगे
नांदुराः थॅलेसिमीया या असाध्य आजाराने आपल्या विळख्यात घेतलेल्या शहर व तालुक्यातील एकूण १४ निरागस बालकांकरीता सामाजिक उपक्रमात नेहमी पुढाकार घेणाऱ्या चंद्रशेखर आझाद क्रिडा व व्यायाम प्रसारक मंडळाच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या महारक्तदान शिबीराला युवकांनी, महिलांनी, नागरीकांनी प्रचंड प्रतिसाद देत एकूण ३२६ रक्तदात्यांनी शिबीरात रक्तदान करुन सामाजिक बांधीलकी जोपासत आपल्या माणुसकीचा परीचय करून दिला
यावेळी सर्वप्रथम आचार्य हरीभाऊ वेरुळकर गुरुजी व आमदार राजेश एकडे यांच्या हस्ते श्री संत गजानन महाराजांच्या प्रतिमेचे विधीवत पूजन व माल्यार्पण करून शिबीरास प्रारंभ करण्यात आला
रक्तसंकलनाकरीता अकोला येथील शासकीय सर्वोपचार रुग्णालयातील रक्तपेढी , डॉ हेडगेवार रक्तपेढी व खामगाव येथील सामान्य रुग्णालयाची रक्तपेढी यांना बोलाविण्यात आले होते
यावेळी रक्तदान शिबीरात सर्व जाती धर्माच्या तरुणांनी ,महिलांनी, नागरीकांनी उस्फूर्तपणे रक्तदान करीत आपला सहभाग नोंदवला
याप्रसंगी शिबीराला राजकीय, सामाजिक, धार्मिक, वैद्यकीय, सांस्कृतीक, शैक्षणिक यांसह इतरही क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी देत थॅलेसिमीया ग्रस्त चिमुकल्यांप्रती आपल्या संवेदना तर रक्तदात्यांचे आभार मानत आयोजकांच्या कार्याचे कौतुक केले
सदर शिबीर कोविड नियमांचे पालन करीत तसेच नियोजनबद्ध रित्या यशस्वी करण्याकरीता चंद्रशेखर आझाद मंडळासह,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, गुरुदेव सेवाश्रम,राष्ट्रधर्म युवा मंच,ओमसाई फाऊंडेशनचे स्वयंसेवक, कार्यकर्ते व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले

थॅलेसिमीया ने ग्रस्त रुग्णांकरीता आयोजित करण्यात आलेल्या या शिबीरात एकूण ३२६जणांनी रक्तदान केल्याने जिल्ह्यातील हा सुद्धा एक रक्तदानाचा उच्चांकच म्हणावा लागेल

-राजश्री पाटील
रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी
सामान्य रुग्णालय,खामगाव