Home Breaking News शाळेतील ओली पार्टी भोवली ; ‘ते’ गुरुजी निलंबित !

शाळेतील ओली पार्टी भोवली ; ‘ते’ गुरुजी निलंबित !

आदिवासी भागात कार्यरत दोन शाळेवरील तीन शिक्षकांचे निलंबन

एकाला अस्वच्छता तर दोघांना शाळेतील ओली पार्टी भोवली

सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यावर कारवाई

 

संग्रामपूर :  संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी भागात जिल्हा परिषद शाळेवरील कार्यरत तीन शिक्षकांचे निलंबन करण्यात आल्याने शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे. शाळा परिसरात अस्वच्छता व शाळेत ओली पार्टीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व्हायरल व्हिडिओचे अवलोकन करून तिघांना दि. १६ रोजीच्या एका आदेशान्वये निलंबित केले आहे. संग्रामपूर पंचायत समिती अंतर्गत आदिवासी ग्राम हडीयामहाल येथील जि. प. म. प्रा शाळेच्या परिसरात निकृष्ट दर्जाचा केरकचरा प्रचंड प्रमाणात आढळून आला. अस्वच्छतेमुळे शाळा परिसरात दुर्गंधीमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आणल्याचा ठपका ठेवत येथील मुख्याध्यापक इरफान सुरत्नेला निलंबित केले आहे. निलंबन काळात पंचायत समिती बुलढाणा अंतर्गत जि. प. शाळा ढंगारपूर येथे ठेवण्याचे आदेशात नमूद आहे. तसेच आदिवासी ग्राम शिवनी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेवरील स. अ. मनोज ठोंबरे यांच्याविरुद्ध सुद्धा निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ठोंबरे यांनी शाळेच्या परिसरात मद्यप्राशन करून मटणाची पार्टी करीत अशोभनीय वर्तन करीत शिक्षक पदाच्या कर्तव्यात कसूर केल्याने त्यांनाही निलंबित करण्यात आले. निलंबन काळात पंचायत समिती मेहकर अंतर्गत जि. प. शाळा बेलगाव येथे ठेवण्याचे आदेश दिले आहे. याच शाळेवरील स.अ. शांताराम चव्हाण यांनीही शाळा परिसरात मद्यप्राशन करून मटणाची पार्टी करीत कर्तव्यात कसूर केल्याने त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. निलंबित शिक्षक चव्हाण यांना लोणार पंचायत समिती अंतर्गत जि प शाळा गायखेड येथे ठेवण्याचे आदेशात नमूद आहे. व्हायरल व्हिडिओचे अवलोकन करून आदिवासी ग्राम हडीयामहाल येथील मुख्याध्यापकाला शाळा परीसरात अस्वच्छतेमुळे तर आदिवासी ग्राम शिवनी येथील शाळेवर ओली पार्टी करून अशोभनीय वर्तन केल्याने दोघे शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. शिक्षण विभागाकडून कायम दुर्लक्षित असलेल्या आदिवासी भागात शिक्षणाचा बोजवारा उडाला असल्याचे यावरून सिद्ध झाले असून येथील कारभाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. जर शिक्षक अशाप्रकारे गैरवर्तन करत असतील तर ते विद्यार्थ्यांचे भविष्य काय घडवणार अशी संतप्त सवाल आदिवासी भागातील पालक करीत आहेत.