Home कोरोना अपडेट्स पुन्हा चिंता ; मेट्रो सिटीत वाढत आहेत कोरोनाचे रुग्ण!

पुन्हा चिंता ; मेट्रो सिटीत वाढत आहेत कोरोनाचे रुग्ण!

 

रोज ३० हजारांपेक्षा जास्त रुग्ण पॉझिटिव्ह निघाल्यास परिस्थिती हाताबाहेर जाणार

मुंबई : महाराष्ट्रात सध्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या रोज साडेचार ते पाच हजार आहे. ज्या दिवशी रोज २० हजार रुग्ण पॉझिटिव्ह निघू लागतील, त्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन करावा लागेल. अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली आहे. रोज ३० हजार रुग्ण पॉझिटिव्ह निघाले, तर त्यांना व्यवस्थित हाताळण्यात वैद्यकीय यंत्रणा आज महाराष्ट्र सज्ज आहे. मात्र ही संख्या रोज ४० हजार अशी होऊ लागली, तर मात्र परिस्थिती बिकट होईल. बेड, ऑक्सिजन, औषध यांची अडचण निर्माण होईल. परिणामी मृत्युदर ही वाढेल असेही अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना स्पष्ट केले आहे.

आज राज्यातली परिस्थिती पहाता, लोक ज्या पद्धतीने मास्क न घालता फिरत आहेत, कोरोनाचे कोणतेही नियम न पाळण्याकडे त्यांचा कल आहे, राजकारण्यांपासून विविध संघटना काहीही न ऐकण्याच्या भूमिकेत आहेत. हीच परिस्थिती कायम राहिली, तर महिनाभरात आपण २० हजार रुग्ण संख्येचा पल्ला गाठू शकतो. गौरी गणपतीच्या पार्श्वभूमीवर लोक प्रवास करत आहेत. ही वेळ अत्यंत बिकट आहे. आत्ताच जर नियम पाळले नाहीत तर तिसऱ्या लाटेला कोणीही रोखू शकणार नाही, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

याच वर्षी एप्रिल महिन्यात रोज ५९,६४७ एवढे रुग्ण पॉझिटिव्ह निघत होते. एप्रिल महिन्यात २९,६१३ तर मे महिन्यात २८,६७३ असे मिळून फक्त दोन महिन्यात महाराष्ट्रात ५८,२८६ लोकांचे मृत्यू झाले होते. सप्टेंबर महिन्यात ६ दिवसात ११३ मृत्यू झाले आहेत. १७ सप्टेंबर २०२० रोजी राज्यात ३,०१,७५२ तर २२ एप्रिल २०२१ रोजी ६,९९,८५८ लोक कोरोना पॉझिटिव्ह होते. तर आज ६ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रात ४७,६९५ एवढे लोक कोरोना बाधित आहेत. आपण एका निसरड्या वळणावर आहोत. संख्या कमी करणे किंवा वाढू देणे पूर्णपणे आपल्या हातात आहे. आपली थोडी बेफिकिरी राज्याला प्रचंड मोठ्या संकटात टाकू शकते, याची जाणीव लोकांना करून देण्याचे काम राज्यकर्त्यांचे आहे. अधिकारी म्हणून आम्ही जेवढे करणे शक्य आहे तेवढे करत आहोत, असेही एका वरिष्ठ सचिवांनी स्पष्ट केले.

आपल्याकडे आज रुग्ण संख्या कमी दिसत असली तरी तुलनेने तपासण्या देखील कमी झाले आहेत याच वर्षी १४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात २,१९,१५९ तपासण्या झाल्या. तेव्हा ६,१६७ रुग्ण पॉझिटिव्ह निघाले. पॉझिटिव्हिटी रेट त्यादिवशी २.८% होता. ६ सप्टेंबर रोजी १,४३,९४६ एवढ्या तपासण्या झाल्या आणि ३,९६० रुग्ण पॉझिटिव्ह निघाले. तेंव्हा पॉझिटिव्हिटी रेट २.७% होता. याचाच अर्थ कमी तपासण्या असतानाही रुग्ण वाढत आहेत त्यामुळे तातडीने तपासण्या वाढवून रुग्ण संख्या नियंत्रणात आणण्याचे उपाय करावे लागतील असेही सूत्रांनी सांगितले. मुंबई तपासण्या कमी आणि पॉझिटिव्हिटी रेट जास्त अशी परिस्थिती आहे. १४ ऑगस्ट रोजी मुंबईत ३६,५३० तपासण्या झाल्या होत्या. त्यात ३२५ रुग्ण पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्हिटी रेट ०.९% होता. आज सहा सप्टेंबर रोजी मुंबईत ३१,५७७ तपासण्या झाल्या. ४४७ रुग्ण निघाले, आणि पॉझिटिव्हिटी रेट १.४% आहे. तपासण्यांचे महत्त्व लक्षात येण्यासाठी एवढी आकडेवारी पुरेशी आहे, असे मंत्रालयातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

दुसऱ्या लाटेच्यावेळी महाराष्ट्रात ऑक्सिजनची तीव्र कमतरता होती. रेल्वेने ऑक्सिजन आणावा लागला. त्या पार्श्वभूमीवर राज्यात नेमकी कशी तयारी आहे, याची माहिती घेतली असता, महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे म्हणाले, राज्यात सध्या दर दिवशी १३०० मेट्रिक टन ऑक्सिजनचे उत्पादन होत आहे. त्यापैकी ४०० मेट्रिक टन हॉस्पिटलसाठी आणि जवळपास ६०० मेट्रिक टन उद्योग व इतर कामासाठी वापरला जात आहे. ऑक्सिजनचे १३० छोटे प्लांट्स विविध हॉस्पिटल्समध्ये कार्यान्वित झाले असून त्यातून जवळपास ११० मेट्रिक टन ऑक्सिजन तयार होत आहे. १५ ऑक्टोबरपर्यंत एकूण ५०० छोटे प्लांट्स ऑक्सिजन निर्मितीचे काम सुरू करतील. तेंव्हा आणखी जवळपास ५०० मेट्रिक टन ऑक्‍सिजन उपलब्ध होईल.

राज्यातील ९० टक्के रुग्ण फक्त दहा जिल्ह्यात
राज्यात कोरोनाचे जेवढे रुग्ण आहेत त्यापैकी ९० टक्के रुग्ण दहा जिल्ह्यात सामावलेले आहेत. त्यातही पुणे, ठाणे, सातारा, अहमदनगर आणि मुंबई या पाच जिल्ह्यात ७२.५% रुग्ण आहेत. सांगली, सोलापूर, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यातील रुग्णांची एकूण टक्केवारी १७.७७% आहे.

टॉप फाईव्ह
पुणे २९.७३%
ठाणे १३.७८%
सातारा ११.८७%
अहमदनगर ९.७१%
मुंबई ७.७५%

बेस्ट फाईव्ह जिल्हे
जिल्हा सक्रीय रुग्ण
धुळे ०
नंदुरबार १
वर्धा ३
वाशीम ४
भंडारा ४

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here