Home Breaking News विदर्भासाठी अभिमानाची बाब! नागपूरचे आनंद देशपांडे 100 कोटी डॉलर्सच्या क्लबमध्ये !

विदर्भासाठी अभिमानाची बाब! नागपूरचे आनंद देशपांडे 100 कोटी डॉलर्सच्या क्लबमध्ये !

फोर्ब्जच्या अहवालात नोंद

नागपूर : परिश्रमातील सातत्य याचे दुसरे नाव म्हणजे ‘पर्सिस्टन्स.’ हे नाव सार्थ ठरविणार्‍या पर्सिस्टंट सिस्टिम्स लि.चे सर्वेसर्वा असलेले नागपूरचे डॉ. आनंद देशपांडे यांचा जागतिक अब्जाधीशांच्या यादीत (100 कोटी डॉलर्स क्लब) नुकताच समावेश झाला आहे. त्यांच्या वैयक्तिक संपदेचे मूल्य एक अब्ज डॉलर्सहून अधिक असल्याची नोंद फोर्ब्ज इंटरनॅशनल न्यू यॉर्क यूएसए यांच्या अहवालात करण्यात आली आहे. ही बाब नागपूरकरांसाठी अभिमानाची आहे.

अतिशय सामान्य स्थितीतून वाटचाल करीत केवळ सरस्वती हेच भांडवल या तत्त्वावर आनंद देशपांडे यांची सातत्याने वाटचाल राहिली आहे. आयआयटी खडगपूर येथून शिक्षण पूर्ण करून उच्चशिक्षणासाठी अमेरिकेत गेलेल्या आनंद देशपांडे यांनी वयाच्या 28 व्या वर्षी भारतात परतून आपली कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. आपल्या बचतीतील 21 हजार डॉलर्स हे त्यांचे सुरुवातीचे भांडवल होते. त्यात वडिलांकडील काही रकमेची भर टाकून त्यांनी पर्सिस्टंटची मुहूर्तमेढ रोवली.

फोर्ब्जच्या अहवालानुसार आजमितीस पर्सिस्टंट कंपनीचे वार्षिक उत्पन्न 56.5 कोटी डॉलर्स असून, ही कंपनी डेटा, डिजिटल इंजिनीअरिंग तसेच आर्टिफिशियल इंटेलिजिन्स या क्षेत्रात कार्यरत आहे. केवळ पाच सहकार्‍यांच्या मदतीने सुरू केलेल्या या कंपनीत आता 14 हजारांहून अधिक अभियंते व कर्मचारी काम करतात. जगभरात पाच देशांतील 39 शहरांत विखुरलेल्या कार्यालयांपैकी एक कार्यालय मागील दहा वर्षांहून अधिक कालावधीसाठी नागपुरात कार्यरत आहे. मार्चअखेर संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनीने आपल्या वार्षिक उलाढालीत 13 टक्के, तर नफ्यामध्ये 38 टक्के वाढ नोंदविली आहे. मागील वर्षी कंपनीने सव्वासहा कोटी डॉलर्सचा नफा कमाविला आहे.

यशस्वी उद्योजक असलेल्या आनंद देशपांडे यांनी कौटुंबिक स्तरावर ‘दे आसरा’ फाऊंडेशन तसेच, ‘पर्सिस्टंट फाऊंडेशन’ या दोन सेवाभावी संस्थांची स्थापना केली आहे. त्यांच्या सुविद्य पत्नी सोनाली देशपांडे या दोन्ही संस्थांच्या अध्यक्षा आहेत. ‘दे आसरा’च्या माध्यमातून स्वयंरोजगार करू इच्छिणार्‍या तरुणांना प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न कंपनीतर्फे करण्यात येत आहे. तसेच, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करण्यासाठी ‘पर्सिस्टंट फाऊंडेशन’ ही संस्था कार्यरत आहे.

कोरोना काळात गरजूंना मोफत धान्य किट वाटप, सामाजिक उत्तरदायित्व योजनेतून अनेक सामाजिक संस्थांना आर्थिक मदत करण्याचे काम कंपनीतर्फे सातत्याने होत आहे. जमिनीवर पाय रोवून असलेल्या व्यक्ती अशी ओळख असलेल्या देशपांडे कुटुंबीयांनी नुकतीच पुणे पोलिसांसाठी 450 सदनिका असलेली गृहप्रकल्प वसाहत स्वत:च्या पैशातून उभी केली आहे. आनंद देशपांडे यांचे सासर नागपूरचे असून तरुण भारतचे संचालन करणार्‍या श्री नरकेसरी प्रकाशन लि.चे माजी संचालक पद्माकर खरे यांचे ते जावई आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here