Home Breaking News संत चोखासागर ओव्हरफ्लो होणार; तीन दरवाजे उघडले खडकपूर्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

संत चोखासागर ओव्हरफ्लो होणार; तीन दरवाजे उघडले खडकपूर्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

दे. मही : खडकपूर्णा (संत चोखासागर) प्रकल्प ८० टक्के भरला असून, लवकरच ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे. जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. धरणसुरक्षा व पूरनियंत्रण लक्षात घेता प्रकल्पाचे तीन दरवाजे बुधवारी सायंकाळी साडेसात वाजता उघडण्यात आले. पाण्याचा विसर्ग खडकपूर्णा नदी पात्रात होणार असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती शाखा अभियंता रोहित मोर्या यांनी दिली.
बुलडाणा पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी तिरमारे, प्रकल्प निरीक्षक राहुल गुंजाळ, शाखा अभियंता रोहित मोर्या, पुरुषोत्तम भागिले, बी.एस. खार्डे, योगेश भगिले परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. धरणाचे दरवाजे उघडल्याने देऊळगाव राजा तालुक्यातील निमगाव गुरु, डीग्रस, सावंगी टेकाळे, टाखरखेड वायाळ, टाखरखेड भागीले, सिंदखेडराजा तालुक्यातील निमगाव वायाळ, हिवरखेड पूर्णा, राहेरी, तढेगाव, ताडशिवणी, देवखेड, पिंपळगाव कुडा, लिंगा, लोणार तालुक्यातील खापरखेडा, रायगाव, सावरगाव तेली, जिंतुर तालुक्यातील किर्ला, दुधा, सासखेडा, लिंबखेडा, हुमनत खेडा, अस्वद, टाखळखोपा, इंचा कानडी देवठाणा, वझर भामटे, शेनगाव तालुक्यातील धानोरा या नदीकाठच्या गावातील लोकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
बळीराजा सुखावला
यावर्षी प्रकल्प शंभर टक्के भरण्याचे संकेत मिळाल्याने सिंचनासाठी पाणी वापरता येणार असल्याने बळीराजा सुखावला आहे.
अवघ्या आठवडाभरात भरला प्रकल्प
गेल्या पंधरा दिवसांपूर्वी प्रकल्पात केवळ काही टक्केच पाणीसाठा होता. त्यामुळे प्रकल्प कोरडाच राहणार अशी भीती वाटत होती. मात्र, प्रकल्प क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने अवघ्या आठच दिवसांत धरण भरत आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here