Home Breaking News पीक विमा न देणाऱ्या रिलायन्स कंपनीला ब्लॅक लिस्ट करावे : ॲड...

पीक विमा न देणाऱ्या रिलायन्स कंपनीला ब्लॅक लिस्ट करावे : ॲड आकाश फुंडकर (Reliance should be blacklisted for not providing crop insurance: Ad Aakash Fundkar)

जिल्हाभरातील शेतक-यांना पिक विमा मिळण्याच्या आशा पल्लवीत

कृषी मंत्री दादा भुसे यांच्या बुलढाणा जिल्हयातील पिक विमाबाबत आयोजित बैठकीत सकारात्मक प्रतिसाद

बुलढाणा : जिल्हयातील खामगांव सह अनेक तालुक्यातील शेतकरी हे पिकविम्यापासून वंचीत राहीले होते. याबाबत भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हाभरात आंदोलने करण्यात आली. पिक विम्याच्या प्रश्नाबाबत राज्याचे कृषी मंत्री मा.ना.श्री दादाजी भुसे यांनी मंत्रालयातील त्यांच्या दालनात आज दि.01 सप्टेंबर 2021 रोजी मुंबई येथे बुलढाणा जिल्हयातील पंतप्रधान पिक विमा योजनेबाबत महत्वाची बैठक जिल्हयात आमदार व प्रशासकीय अधिकारी यांच्या समवेत आयोजित केली होती. या बैठकीत खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी पिक विम्याबाबत विविध मुददे मांडले. त्याबाबत मा मंत्री महोदयांना स्वतंत्र पत्र देऊन परिस्थितीशी त्यांना अवगत केले व जिल्हाभरातील शेतकऱ्यांना पिक विम्याची मदत देण्यात यावी अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
याबैठकीत आ.ॲड आकाश फुंडकर म्हणाले की, सद्यस्थितीत विविध पिकाच्या उत्पादकतेची परीगणना करण्यासाठी महसूल मंडळ / मंडळ गट स्तरावर पिक कापणे प्रयोगाचे नियोजन केले जात आहे. परंतु यामुळे काही विशिष्ट गावातच पिक कापणी प्रयोग घेऊन त्यामधून आलेली उत्पादकता सर्वच गावांना लागू करण्यात येत आहे. तसेच राज्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे संपुर्ण जिल्हयात काही ठिकाणी अतिवृष्टी, तर काही ठिकाणी ढगफुटी, तर काही ठिकाणी, अत्यल्प पाऊस पडतो काही वेळा असेही निदर्शनास आले की, ज्या गावात पाऊस पडला नाही परंतु शेजारच्या गावात ढगफुटी झाल्यामुळे या गावातील शेतक-यांचे पिक वाहून गेले शेती खरडून गेली.
ज्यांचे खरोखरच नुकसान झाले आहे असे शेतकरी मदतीपासून वंचित राहतात. म्हणून मुख्य पिकासाठी सोयाबीन, तुर व कापूस इ.ग्रामपंचायत हा घटक मानून ग्राम पंचायत स्तरावर पिक कापणी प्रयोगाचे नियोजन करुन उत्पादकतेची परिगणना करावी जेणेकरुन जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना पिक विमाचा लाभ होईल.


50 टक्के पेक्षा खाली आणेवारी असल्यामुळे शेतक-यांना हेक्टरी मदत देण्यात यावी. यासोबतच विमा संरक्षणाच्या बाबी अंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये भुस्सखलन, गारपिट, ढगफुटी, वीज कोसळणे, क्षेत्र जलमय होणे, आणि नैसर्गिक आग, याबाबींचा समावेश आहे. परंतु खामगांव तालुक्यात व परिसरात किड व रोगांच्या प्रादुर्भावामुळे मोठया प्रमाणात पिकांचे नुकसान होते आणि पिक नष्ट करण्याची वेळ सुध्दा शेतक-यांवर येते. अशा वेळी दुसरे पिक घेण्याची शेतक-याची आर्थीक परिस्थिती नसते. पर्यायाने कर्जबाजारी पणा वाढतो आणि शेतकरी आर्थीक विवंचनेत सापडतो. त्यासाठी तात्काळ आर्थीक मदत ‍मिळणे आवश्यक असलयाने ‍ किड रोगामुळे होणा-या नुकसानीचा समावेश स्थानिक नैसर्गिक आपत्ती या सदरामध्ये करण्यात यावा.


तरी पंतप्रधान पिक विमा योजना प्रभावीपणे राबविण्याचे दृष्टीने व शेतक-यांना योग्य पध्दतीने लाभ मिळण्याचे दृष्टीने उपरोक्त उपाय योजनांचा समावेश करण्याचे दृष्टीने आपल्या स्तरावर आवश्यक कार्यवाही करण्यात यावी व त्याची अंमलबजावणी करण्याबाबत संबधीतांना आदेश देण्यात यावे अशी मागणी आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी यावेळी केली.
यावर मा कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी सकारत्मक प्रतिसाद दर्शविला त्यामुळे आता जिल्हयातील ज्या शेतक-यांना पिक विम्याचा लाभ मिळाला नाही जे शेतकरी पिकविम्यापासून वंचीत राहीले त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत असेही आमदार ॲड आकाश फुंडकर म्हणाले.
पिक विमा न देणाऱ्या रिलायन्स कंपनीला ब्लॅक लिस्ट करावे अशीही मागणी आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी मा मंत्री महोदयांना केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here