Home Breaking News नारायण राणे यांची रात्र पोलीस स्टेशनमध्ये की हॉस्पिटलमध्ये?

नारायण राणे यांची रात्र पोलीस स्टेशनमध्ये की हॉस्पिटलमध्ये?

 

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी अठक केली आहे. राणे यांना अटक करुन संगमेश्वर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलं. त्यानंतर आता त्यांना महाड पोलिस ठाण्यात नेण्यात आलं आहे. नारायण राणे यांनी महाडमधील पत्रकार परिषदेतच मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यामुळे तिथे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर आता राणेंना महाड पोलीस ठाण्याकडे नेण्यात आलं आहे. दरम्यान, महाडमध्ये पोहोचण्यासाठी तीन तासाचा अवधी लागू शकतो. त्यामुळे राणेंना आज कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता नाही. अशावेळी राणे यांना आता आजचा मुक्काम महाड पोलीस ठाण्यात होईल, असं सांगितलं जात आहे.

उद्या न्यायालयात हजर करणार?

तत्पूर्वी राणे यांनी रत्नागिरी सत्र न्यायालय अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने तो फेटाळला. त्यानंतर राणे यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, राणेंच्या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिलाय. त्यामुळे राणे यांना तिथेही दिलासा मिळाला नाही. अशावेळी राणे यांना आता महाड पोलीस ठाण्यात हजर केलं जाणार आहे. त्यासाठी महाड पोलीस राणेंना संगमेश्वर पोलिसांकडून ताब्यात घेत महाडकडे रवाना झाले आहेत. त्यानंतर उद्या राणे यांना रायगड सत्र न्यायालयात हजर केलं जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

हॉस्पिटलमध्ये दाखल करणार ?

दुसरीकडे राणे यांचा रक्तदाब वाढल्याचं वैद्यकीय पथकाकडून सांगण्यात आलं आहे. मात्र, राणे यांनी शुगर आणि ईसीजी करता आलेला नाही, असंही त्यांनी सांगितलं आहे. तर राणे यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं आहे. त्यामुळे नारायण राणे यांना आज रुग्णालयात दाखल करण्यात येणार का हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे.

राणेंच्या जीवाला धोका – प्रसाद लाड

राणे यांना ताटकळत ठेवून कोर्टात हजर करायचं नाही आणि त्यांचा छळ करण्याचा प्रयत्न सुरु आहे. राणे यांच्या जीवाला धोका आहे. आता एका मंत्र्याचा व्हिडीओ समोर आलाय. तो मंत्री फोनवरुन पोलीस अधीक्षकांना फोन करुन दबाव टाकताना दिसत आहे, असा आरोपही लाड यांनी केलाय. पोलिस राणेंसोबत ज्या पद्धतीने वागले त्याचा व्हिडीओ माझ्याकडे आहे. आमदार, खासदार, मंत्री बाजूला ठेवा. पण एका ज्येष्ठ नागरिकांला अशी वागणूक दिली जात आहे, जी चुकीची आहे. राणे यांची अद्याप अटक दाखवण्यात आलेली नाही. त्यांना ताटकळत ठेवण्याचा प्रयत्न सुरु आहे. माझा स्पष्ट आरोप आहे की राणेंच्या जीवाला धोका आहे, असा गंभीर आरोप लाड यांनी केलाय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here