Home Breaking News केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या अटकेसाठी हालचाली;आ. संजय गायकवाड यांनी दिला ‘हा’...

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या अटकेसाठी हालचाली;आ. संजय गायकवाड यांनी दिला ‘हा’ इशारा

 

नाशिक : केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर नारायण राणे यांनी सुरू केलेली जनसंवाद यात्रा आता वादात सापडली आहे आपल्या बेधडक फक्त यासाठी ओळखले जाणारे नारायण राणे आता मात्र चांगलेच कचाट्यात सापडले असल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्र्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अडचणीत आलेल्या नारायण राणे यांच्या अटकेची कायदेशीर प्रक्रिया सुरू झालेली आहे, अशी माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी दिली आहे. नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल झालेला असून गुन्ह्याचं गांभीर्य पाहून याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून राणेंना अटक करण्यासाठी पथक पाठवण्यात आलं आहे. राणेंच्या अटकेदरम्यान त्यांच्या केंद्रीय मंत्रीपदाचा आदर राखून तसंच हक्कभंग होणार नाही याची दक्षता घेऊन कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं आहे.
मुख्यमंत्र्यांच्या कानशिलात लगावण्याच्या नारायण राणेंच्या वक्तव्यामुळे आता राज्यात चांगलीच खळबळ माजली आहे. शिवसैनिक संतापले असून राणेंवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. संतापलेल्या शिवसैनिकांनी अनेक ठिकाणी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला असून नाशिकमध्ये भाजपा कार्यालयाची शिवसेनेकडून तोडफोड करण्यात आली आहे. तर जुहूमध्येही शिवसैनिकांचं जोरदार आंदोलन सुरू आहे. नारायण राणेंच्या या वक्तव्यामुळे ते चांगलेच अडचणीत सापडले आहेत. राज्यात तीन ठिकाणी राणेंवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना अटक करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

दरम्यान, नाशिक पोलिसांचं एक पथक चिपळूणला रवाना झालं आहे. नारायण राणेंना अटक करुन कोर्टासमोर हजर करण्याचे आदेश आहेत. दरम्यान चिपळूणमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला असून नारायण राणेंकडून अटक टाळण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पुणे पोलिसांचं पथकही राणेंच्या अटकेसाठी रवाना झालेलं आहे.

तर अटकेच्या वृत्तावरुन नारायण राणे चांगलेच संतापले आहेत. माझ्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही असं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटलं असून मी काय साधा माणूस वाटलो का अशा शब्दांत आपला संताप व्यक्त केला आहे. मी कोणताही गुन्हा केलेला नाही, तुम्ही तपासून पहा असंही यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं. नारायण राणे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानाखाली लगावण्यासंबंधी केलेल्या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला असून चिपळूणमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

काय आहे प्रकरण?

शिवसेनेचे नाशिकमधील शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी नारायण राणेंविरोधात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करत अटकेचे आदेश दण्यात आले आहेत. दरम्यान महाडमध्येही नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्ह्याची गंभीरता, व्यापकता लक्षात घेता नारायण राणे यांना तात्काळ अटक करून कोर्टासमोर उपस्थित करणं आवश्यक आहे. यासाठी पोलीस उप-आयुक्त दर्जा अधिकार नेमणे उपयुक्त असल्यामुळे पोलीस उप-आयुक्त संजय बारकंडू यांना नारायण राणेंना अटक करण्यासाठी नेमलं आहे. तसेच त्यांना एक पोलिसांचे पथक तयार करून नारायण राणेंना अटक करून कोर्टासमोर उपस्थित करण्याचे आदेश पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिले आहेत.

नारायण राणे यांच्या अटकेनंतरची माहिती उपराष्ट्रतींना द्यावी
तसंच आदेशात पुढे म्हटलं आहे की, गुन्ह्यातील आरोपी हे राज्यसभेचे सदस्य असल्यामुळे संसदेच Rules Of Procedure And Conduct Of Business चे Rule 222 A प्रमाणे चेअरमन आणि उपराष्ट्रपती यांना कळविणे बंधनकारक आहे. त्यामुळे पोलीस उप-आयुक्त संजय बारकुंडे यांनी नारायण राणे यांच्या अटकेनंतरची माहिती उपराष्ट्रपतींना कळवावी.

तसंच याशिवाय इंन्टेलिजन्स ब्युरो, भारत सरकार, एसआयडी कमिशनर, महाराष्ट्र शासन व संबंधीत जिल्हा दंडाधिकारी व न्यायदंडाधिकारी यांना नारायण राणे यांच्या अटकेची माहिती द्यावी, असं सांगण्यात आलं आहे.

महाडमध्येही गुन्हा दाखल

युवासेना अधिकारी सिद्धेश पाटेकर यांनी फिर्याद दिली असून महाड शहर पोलीस ठाण्यात नारायण राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाड शहराचे पोलिस निरीक्षक शैलेश सणस या प्रकरणी तपास करत आहेत. याशिवाय भाजपा कार्यकर्त्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि करोना प्रतिबंधक कायद्यार्तगत स्वतंत्र गुन्हा दाखल झाला आहे.

नारायण राणे नेमकं काय म्हणाले?

नारायण राणे सध्या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सोमवारी रायगडमधील महाड येथे नारायण राणेंची पत्रकार परिषद झाली. यावेळी बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत आक्षेपार्ह वक्तव्य केलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी केलेल्या भाषणावर टीका करताना नारायण राणे यांनी हे विधान केलं. “त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून… अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती,” असं नारायण राणे म्हणाले. या पत्रकार परिषदेत विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर देखील उपस्थित होते.

“महाराष्ट्रात यांच्यामुळे एक लाखापेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला, मात्र काही उपाय नाही. लस नाही, डॉक्टर नाहीत, वैद्यकीय कर्मचारी नाहीत. भयावह परिस्थिती महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाची होती. यांना बोलायचा अधिकार तरी आहे का? बाजूला एखादा सेक्रेटरी ठेव आणि विचारून बोल. त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून… अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती. देशाच्या स्वातंत्र्य दिनाबाबत तुम्हाला माहिती नसावी? सांगा मला किती चीड येणारी गोष्ट आहे. सरकार कोण चालवतंय ते कळत नाही, ड्रायव्हरच नाही. राष्ट्रवादी मात्र सत्ता उपभोगते आहे,” असं नारायण राणे यांनी म्हटलं होतं.

बुलडाण्याचे आ. संजय गायकवाड आक्रमक
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याचे पडसाद राज्यभर पडत आहेत शिवसेनेच्या वतीने ठिकाणी आंदोलने केला जात आहेत दरम्यान शिवसेनेतील बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी सुद्धा याप्रकरणी आक्रमक पवित्रा घेतला असून नारायण राणे यांना त्वरित अटक करावी अशी मागणी केली आहे पोलिसांनी राणे यांना अटक केली नाही तर कोकणात जाऊन त्यांना घरात घुसून मारू आणि बाळासाहेबांचे शिवसैनिक काय असतात हे दाखवून देऊ असा इशारा आमदार संजय गायकवाड यांनी दिला आहे.

पहा व्हीडीओ..

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here