Home Breaking News कोरोना काळातही महाराष्ट्रात तरंग सुपोषणाचे!

कोरोना काळातही महाराष्ट्रात तरंग सुपोषणाचे!

 

– 15 लाख 76 हजार 300 फोन
– 4 लाख 58 हजार 995 संदेश
– 6 लाख 30 हजार 841 ब्रॉडकास्ट मेसेज
– 10 लाख व्हॉटसॲप चॅटबॉट वापरकर्ते
– 6 लाख 5 हजार ब्रॉडकास्ट कॉल ला लाभार्थ्यांनी दिली उत्तरे

मुंबई ( दि. १६ ऑगस्ट २०२१ )

कोरोना महामारीचे संकट राज्यावर अजूनही घोंगावत आहे मात्र या काळातही बाल संगोपन आणि सुपोषण नियमितपणे आणि सुयोग्यरित्या व्हावे यासाठी राज्याच्या महिला आणि बाल विकास विभागामार्फत राबविल्या गेलेल्या तरंग सुपोषित महाराष्ट्राचा या मोहिमेमुळे लाखो लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे शक्य झाले आहे. व्हाट्सअप चॅट, प्रत्यक्ष फोन याद्वारे हजारो लाभार्थ्यांनी माहिती घेऊन समुपदेशन आणि इतर बाबी योग्यरीत्या नियोजित केले आहेत त्यामुळे आता तरंग सुपोषित महाराष्ट्राचा या माध्यमातून 8080809063 हा फोन क्रमांक परवलीचा क्रमांक ठरला आहे.

‘महिला व बालविकास विभागाने कोविडकाळातील सर्व समस्यांचं बारकाईने अवलोकन करून डिजीटल होण्याचा मार्ग स्विकारला. त्यानुसार अंगणवाडी सेविकांनी अगदी झूम मिटींग च्या माध्यमातून ही काम पुढे नेले. गेल्या वर्षी कोविड काळात माझ्या विभागाने डिजीटल प्लॅटफॉर्म वर मोठ्या प्रमाणावर काम केलं. तरंग सुपोषित महाराष्ट्राचा या डिजीटल प्लॅटफॉर्म मुळे आपण सर्व गर्भवती महिला आणि स्तनदा मातांशी सातत्याने थेट संपर्कात आहोत’, अशी प्रतिक्रीया विभागाच्या मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली आहे.
Whatsapp चॅटबॉट तसंच IVR व्हॉइस कॉल्स मुळे तात्काळ माहिती मिळवणं सोपं जात आहे. सक्षम महिला, सुदृढ बालक आणि सुपोषित महाराष्ट्र हे विभागाचं ब्रीद आहे, त्या दिशेने ही एक चांगली वाटचाल आहे. गेल्या वर्षी आपण देश पातळीवर पोषण अभियान अंतर्गत पोषण माह मध्ये पहिला क्रमांक मिळाला, सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे आपली पोषण चळवळ व्यापक होत आहे. तरंग सुपोषित महाराष्ट्राचा मुळे बाळाच्या पहिल्या १००० दिवसांमधली काळजी चांगल्या प्रकारे घेतली जात आहे. हा उपक्रम राबवणाऱ्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना, राजमाता जिजाऊ मिशन आणि सर्व अंगणवाडी सेविका-पर्यवेक्षिका यांचे काम खरोखरच स्त्युत्य आहे, असं मत ही यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केलं आहे.

‘तरंग सुपोषित महाराष्ट्राचा’ या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यभरात आय. व्ही. आर. हेल्पलाइन, व्हाट्सअप चॅट बोट, ब्रॉडकास्ट कॉल आणि संदेश प्रणाली तसेच एक घास मायेचा, आजीबाईच्या गूजगोष्टी या माध्यमातून लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे शक्य झाले आहे. महामारीच्या काळातही संभाव्य लाभार्थ्यांशी संवाद सुरू ठेवण्यासाठी राज्य सरकारच्या महिला आणि बाल विकास विभागाचा ‘तरंग सुपोषित महाराष्ट्राचा’ हा एक उत्कृष्ट डिजिटल उपक्रम आहे. टेली-न्यूट्रिशनच्या दिशेने हे एक महत्त्वाचं पाऊल आहे कारण आपण आपल्या एका बोटाच्या क्लीकवर पोषण आणि मुले, गर्भवती महिला, स्तनपान करणारी माता आणि किशोरवयीन मुलींच्या आरोग्याशी संबंधित माहिती मिळवू शकता. वयानुसार पोषण समुपदेशन, बालसंगोपन, आणि पूर्व शालेय शिक्षण विषयी माहिती मुलांच्या सर्वांगीण वाढीसाठी घरी सक्षम वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने हे व्यासपीठ अत्यंत प्रभावी म्हणून काम करीत आहे, अशी प्रतिक्रिया या विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन यांनी व्यक्त केली आहे.
सक्षम महिला सुदृढ बालक, सुपोषित महाराष्ट्र हे ध्येय साध्य करण्याचं महिला आणि बाल विकासाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी कोरोना काळात हेल्पलाइन सुरू करण्यात आली. या हेल्पलाईनद्वारे 8080809063 फोन क्रमांकावरून कॉल अथवा व्हॉट्सॲप च्या मदतीने पोषण आणि बालकांच्या संगोपनाच्या संदर्भातील विविध पैलूबाबत आधी रेकॉर्ड केलेले संदेश पाठवण्यात येतात. या संदेशासाठी त्यांचे अभिप्राय देखील पाठवू शकतात. आतापर्यंत या माध्यमातून 15 लाख 76 हजार 300 फोन करण्यात आलेले आहेत. तर 4 लाख 58 हजार 995 संदेश पाठवण्यात आले आहेत. व्हाट्सअप चॅटबोटच्या माध्यमातून आतापर्यंत साधारण 10 लाख लाभार्थ्यांनी प्रतिसाद नोंदवला आहे. ब्रोडकास्ट फोनला उत्तर देणाऱ्या लाभार्थ्यांची एकूण संख्या 6 लाख 5 हजार इतकी आहे तर प्रति वापर करण्याची सरासरी वेळ दीड मिनिटांची आहे. ब्रॉडकास्ट एसएमएस 6 लाख 30 हजार 841 जणांना पाठवण्यात आलेत.
एक घास मायेचा या उपक्रमांतर्गत महामारी आणि त्यानंतरच्या टाळेबंदी कालावधीमध्ये मुलांच्या आहाराकडे दुर्लक्ष होण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन गर्भवती महिलांसाठी व बालकांसाठी विविध पौष्टिक पाककृती चित्रफितीच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आल्या. एक घास मायेचा, याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. स्वच्छता पद्धती आणि प्रतिसादात्मक आहार याबाबत सहाय्यक मार्गदर्शन असलेले हे व्हिडिओ व्हाट्सअप चॅटबोटसह सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आले आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आतापर्यंत 60 हजारांहून अधिक लोकांपर्यंत ते पोहोचले आहे. आजीबाईंच्या गूजगोष्टी या ‘तरंग सुपोषित महाराष्ट्राचा’ अंतर्गत असलेला आणखी एक उपक्रम या उपक्रमाद्वारे मुलाच्या पहिल्या 1000 दिवसांशी संबंधित विविध पोषण व आरोग्य विषयक माहिती देण्यासाठी एक ॲनिमेटेड चित्रफीत मालिका तयार करण्यात आली आहे ही मालिका घराघरात पोहोचून गैरसमज आणि महामारीमुळे निर्माण झालेल्या भीतीवर मात करण्यास मदत झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here