Home Breaking News कोविड उपचार करणाऱ्या 7 रूग्णालयांनी जास्त पैसे घेतल्याचे उघड

कोविड उपचार करणाऱ्या 7 रूग्णालयांनी जास्त पैसे घेतल्याचे उघड

कोविड बाधीत रूग्णांकडून 5 लक्ष 8 हजार 650 रूपये जास्त घेतल्याचा अहवाल
• कोविड उपचार करणाऱ्या 7 रूग्णालयांच्या लेखा परीक्षणातून स्पष्ट
• लेखा परीक्षकांकडून रूग्णालयांनी दिलेल्या देयकाची तपासणी
बुलडाणा,  3 : जिल्ह्यात कोविड बाधीत रूग्ण किंवा नातेवाईक यांना अंतिम, पक्के देयक देताना देयकांची पडताळणी करण्यासाठी लेखा परीक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. या लेखा परीक्षकांकडून त्यांना नेमून दिलेल्या रूग्णालयांना भेटी देण्यात आल्या. या भेटीदरम्यान त्यांनी लेखा परीक्षण केले. लेखा परीक्षकांकडून प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील कोविडवर उपचाराची परवानगी असणाऱ्या एकूण 7 रूगणालयांनी रूग्ण अथवा नातेवाईक यांचेकडून 5 लक्ष 8 हजार 650 रूपये जास्तीचे घेतल्याचे समोर आले आहे. ही बाब लेखा परीक्षण अहवालात दिसून आली आहे.
कोरोना विषाणूची लागण झालेल्या गंभीर रूग्णांनी मान्यताप्राप्त रूग्णालयामध्ये घेतलेल्या औषधोपचाराच्या बाबत त्यांनी रूग्णालयामध्ये अदा केलेली रक्कम संबंधित रूग्णालयाने शासनमान्य दराप्रमाणे घेतलेली आहेत, काय याबाबत लेखा परीक्षकांनी लेखा परीक्षण केले आहे. त्यासाठी जिल्ह्यात रूग्णालय निहाय लेखा परीक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. लेखा परीक्षण अहवालात ज्या रूग्णालयांनी जास्तीची रक्कम रूग्णाकडून घेतली आहे, त्यांनी सदर रक्कम संबंधितास परत देण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी एस रामामूर्ती यांनी दिले आहे. तशा प्रकारच्या सूचनादेखील उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. लेखा परीक्षक यांना नेमून देण्यात आलेल्या खाजगी रूग्णालयांची यादी www.buldhana.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या बाबतचे कामकाज अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांचे मार्गदर्शनाखाली नोडल अधिकारी तथा नायब तहसिलदार विजय पाटील, अव्वल कारकून नितीन बढे यांनी केले आहे.
यापुढे सुद्धा ज्या रूग्णांकडून रूग्णालयाने कोरोना औषधोपचाराबाबत जास्तीची रक्कम घेतली असल्यास अशा रूग्णांनी संबंधित रूग्णालयाचे लेखा परीक्षक यांचेकडे तक्रार करावी, असे आवाहनही जिल्हादंडाधिकारी यांचेवतीने नायब तहसिलदार तथा या विषयाचे नोडल अधिकारी सुनील आहेर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here