Home जागर आ.गायकवाड यांचे काय चुकले ?

आ.गायकवाड यांचे काय चुकले ?

 

बुलडाणा शहराचे शिवसेना आ.संजय गायकवाड हिंदुत्ववादी नाहीत,अचानक ते धर्मद्रोही झालेत असे कुणीही म्हणणार नाही,अगदी त्यांचे राजकीय विरोधक सुद्धा हे मान्य करणार नाहीत मग असे काय घडले की हिंदूंच्या धार्मिक भावना दुखवल्याचा त्यांच्यावर आरोप होत आहे ?
मुळात हे लक्षात घ्यायला हवे की कोणताही शिवसेना आमदार इतर कथित हिंदुत्ववादी मंडळींच्या तुलनेत काकणभर सरस असतो ,आक्रमक अन प्लेन हार्ट असतो.सभोवताली हिंदू समाजबाबत जे जाणवते ते परिणामांची पर्वा न करता बिनधास्त बोलून टाकणे हा खऱ्या शिव सैनिकांचा बाणा असतो,तोच संजय गायकवाड यांच्याकडून व्यक्त झालेला दिसतो.
कोरोना काळात प्रतिकारशक्ती मजबुत करायची असेल तर मटण,अंडी खा,उगाच उपास तापास करू नका,जिवंत राहिलात तर ही संधी आहेच,देव,मंदिरे लॉकडाऊन झाली आहेत,तुम्हाला कुणी वाचवणार नाही या गायकवाड यांच्या आवाहनात खरंतर कुणाच्याही भावना दुखण्याचे काहीच कारण दिसत नाही.त्यांनी त्यांच्या हिंदू मतदार आणि चाहत्यांना हे आवाहन केले आहे सक्ती नव्हे हे लक्ष्यात घ्यायला हवे.
आता यात वारकरी संप्रदाय कुठून आला ? गेल्या काही वर्षांपासून संघ परिवाराने,सनातनने वारकरी संप्रदायात घुसखोरी करून त्यात आपले विचार प्रसारक बुवा निर्माण केले आहेत,हे बुवा,कीर्तनकार वेळ प्रसंगी वापरण्याची भाजपची खेळी जुनी आहे,कथित आचार्य तुषार भोसले हे त्याचेच प्रोडक्ट आहे.यांची चावी नागपुरात असते तिथून जेवढी भरली तेवढी ही शाखा पुढे सरकत असते,गायकवाड प्रकरणी मूळ वारकरी आणि तुकोबांचा धारकरी अशी भूमिका घेणार नाही कारण सद्याच्या काळात काय आवश्यक आहे हे त्याला बरोबर कळते.
ज्या लोकांनी जादूटोणा विरोधी कायद्याला विरोध केला,जे लोक कोरोना काळात मंदिरे उघडण्याची मागणी करीत होते, ज्या लोकांनी बहुजन समाजाच्या प्रगतीला नेहमी विरोध केला त्याच लोकांनी प्रबोधनकार ठाकरेंच्या विचाराला पण विरोध केला आहे,वारकरी संप्रदायात सनातनी कातडी पांघरून शिरलेल्या अनेक बुवांनी वारकरी संप्रदायाचा आधार घेतला आहे,
संजय गायकवाड यांना जळगाव जामोद मतदार संघातून जाणारे फोन बरेच काही सांगून जातात ,गायकवाड यांना डिवचण्याचा प्रयत्न अनेक ऑडिओ क्लिप मधून दिसतो,जाणीवपूर्वक खोडसाळ प्रश्न विचारावे आणि त्यावर अपेक्षित उत्तर मिळाले की त्याचे भांडवल करावे हा खेळ या प्रकरणी सुरू आहे हे लक्षात घ्यायला हवे. मी संजय गायकवाड यांचा चाहता किंवा कार्यकर्ता नाही मात्र या प्रश्नावर त्यांच्या सोबत आहे,गायकवाड जिथे चुकले तिथे त्यांच्यावर टीका करायला माझी लेखणी कधी कचरली नाही आणि योग्य भूमिकेचे समर्थन करताना कधी कधी मागेही राहणार नाही.
संजय गायकवाड यांच्या अभ्यास किती हे मला माहित नाही मात्र कोरोना काळात त्यांनी मांडलेले हे विचार प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांचा वारसा सांगणारे आहेत.बुलडाणा जिल्हा प्रबोधनाची कास धरणारा जिल्हा आहे,या प्रकरणातही हा प्रागतिक जिल्हा आ.संजय गायकवाड यांची नक्कीच साथ देईल असा विश्वास आहे.

-पुरुषोत्तम आवारे पाटील
पत्रकार,अकोला
संवाद -9892162248

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here