Home Breaking News परमबीरजी..‘जिन के घर शीशे के बने होते है, वो दुसरों पर पत्थर...

परमबीरजी..‘जिन के घर शीशे के बने होते है, वो दुसरों पर पत्थर फेका नही करते’

आता परमबीर सिंगांची बारी!
________________________
‘जिन के घर शीशे के बने होते है,
वो दुसरों पर पत्थर फेका नही करते’
वक्त चित्रपटातील हा डायलॉग आता मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना आठवत असेल. खरे तर तो त्यांना यापूर्वीच आठवायला हवा होता. विनाशकाले विपरीत बुद्धी अशी एक म्हण आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांवर आरोप करताना आपण धुतल्या तांदळाचे नाही हे परमबीर सिंग विसरले आणि आता त्यांच्या अडचणीत चांगलीच वाढ होताना दिसत आहे. पोलिस खात्यात अनेक प्रामाणिक अधिकारी आहेत. किंबहुना अशा प्रामाणिक आणि खमक्या अधिकार्‍यांमुळेच गुन्हेगारी जगत दचकून असते. मात्र खाकीची नशा लोकांच्या भल्यासाठी न चढता जेव्हा स्वत:च्या तुंबड्या भरण्यासाठी चढते तेव्हा खाकी बदनाम झाल्याशिवाय राहत नाही. गेल्या काही वर्षांपासून अशा काही अधिकार्‍यांमुळे पोलिस खात्याची प्रतिमा मलिन झालेली बघायला मिळते. महाराष्ट्र पोलिस किंवा मुंबई पोलिस यांचे तपासाच्या बाबतीत गुन्हेगारी जगतात एक वेगळे नाव आहे. असे असताना गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात जे सुरू आहे त्यामुळे प्रामाणिक पोलिस अधिकार्‍यांना निश्चितच प्रचंड वेदना झाल्याचे पहायला मिळते. असेच एक प्रामाणिक पोलिस अधिकारी मुंबईचे निवृत्त पोलिस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांनी या संदर्भातील खंत एका लेखातून व्यक्त केली आहे. राजकारण्यांनी, अधिकार्‍यांनी आपल्या पदाची कशी आब राखली पाहिजे याचा सल्लाही त्यांनी दिलेला आहे. राज्याचे तत्कालीन गृहमंत्री देशमुख यांनी पोलिसांना 100 कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते असा आरोप मुंबईच्या पोलिस आयुक्त पदावरून हटविल्यानंतर परमबीर सिंग यांनी केला होता. अर्थात त्यांचा हा आरोप ते पदावर असताना करण्यात आला असता तर त्याला महत्व होते. परंतु राज्यात आणि केंद्रात वेगवेगळी सरकारे असल्याने आणि केंद्राकडून राज्याला सातत्याने अडचणीत आणण्याची संधी शोधली जात असल्याने सिंग यांच्या आरोपातही ही संधी शोधल्या गेली. थेट परमबीर सिंग यांना अशी मागणी झालेली नसताना त्यांच्या हाताखालील अमुक एखाद्या अधिकार्‍याकडून आपणाला तशी माहिती मिळाली होती अशा ऐकीव माहितीच्या आधारावर या प्रकरणाचा डोलारा उभा आहे. प्रचंड गदारोळानंतर गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला आणि सीबीआयने या प्रकरणी आता गुन्हाही दाखल केला आहे. या प्रकरणाची शाई वाळत नाही तोच आता परमबीर सिंग यांचे कारनामे समोर आणले आहेत.

जबाबदार बना

सिंगांनी तर 100 कोटीचाच धमाका केला आणि त्यांच्या विरुद्ध हजारो कोटी रुपये भ्रष्टाचाराचा आरोप झाला आहे. त्यांच्याच हाताखाली काम केलेल्या एक नव्हे तर अनेकांनी एका मागोमाग लेटरबॉम्ब टाकल्याने आली रे आली आता तुझी बारी आली, असे म्हणण्याची वेळ आली आहे. मुंबईत आयुक्त पदावर येण्यापूर्वी परमबीर सिंग हे ठाण्याचे पोलिस आयुक्त होते. त्या पदावर असताना त्यांनी केलेली कमाई आणि केलेला पदाचा दुरुपयोग आता काही अधिकार्‍यांनी समोर आणला आहे. एखाद्या अधिकार्‍यावर आरोप झाले म्हणजे ते खरेच असतात असे नाही. परंतु पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांनी गेल्या सहा वर्षांपासून सातत्याने लाचलुचपत प्रतिबंधक खात्यापासून तर वरिष्ठांपर्यंत त्यांच्या विरुद्ध तक्रारी केल्या असतील तर त्याची चौकशी झाली पाहिजे. सिंग यांच्यावर आरोप करणारे एक पोलिस निरीक्षक सध्या अकोल्यात पोलिस नियंत्रण कक्षात कार्यरत आहेत. बी.आर. घाडगे नावाच्या या अधिकार्‍याने आपल्या 14 पानांच्या तक्रारीमध्ये सिंग यांच्यावर केलेले आरोप अतिशय गंभीर आहेत. सिंग यांनी पदाचा प्रचंड दुरुपयोग केला, शासकीय वाहनांचा दुरुपयोग केला, हजारो कोटींची बेनामी संपत्ती जमविली, या संपत्तीच्या माध्यमातून देशात आणि विदेशात व्यवसायाचे जाळे उभारले, काही बिल्डरांसोबत भागिदारी केली असे हे गंभीर आरोप आहेत. काही गंभीर प्रकरणांमध्ये बड्या आरोपींना पाठीशी घालण्यासाठी त्यांनी कशा पद्धतीने हाताखालच्या अधिकार्‍यांवर दबाव आणला त्याचा उहापोहही या तक्रारीत करण्यात आला आहे. एसीपी आणि डीसीपीकडून त्यांना दरवर्षी किती तोळे सोने भेट म्हणून लागत असे याचे संदर्भही या तक्रारीत आहेत. पत्नी आणि मुलाच्या नावे त्यांनी कशी संपत्ती जमविली या सर्वांचा तपशीलही या अधिकार्‍याने उघड केला आहे. तक्रारकर्ता अधिकारी सध्या पोलिस खात्यातच असून त्याच्या या तक्रारींची शासनाने तातडीने चौकशी करून या प्रकरणाचा फाडा निवाडा करण्याची गरज आहे.
-सुधाकर खुमकर जेष्ठ पत्रकार अकोला

जबाबदार बना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here