Home Breaking News रा स्व संघ यांचे खोटे महिमामंडन करण्यासाठी ‘ती’ पोस्ट

रा स्व संघ यांचे खोटे महिमामंडन करण्यासाठी ‘ती’ पोस्ट

न केलेला त्याग, बलिदान
व न दाखवलेले औदार्य !!!

गेल्या तीन दिवसापासून फेसबुक, व्हॉटसऐप, टवीटर इ. समाज माध्यमातून नागपूरचे रा.स्व.संघाचे स्वयंसेवक (कै) नारायणराव दाभाडकर यांनी केलेल्या त्यागासंबंधी एक पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टनुसार 85 वर्षीय दाभाडकर यांना कोरोना झाल्यामुळे गांधीनगर नागपूर येथील मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयात 22 एप्रिल रोजी भरती करण्यात आले होते. त्यांची ऑक्सिजन पातळी 60 पर्यंत कमी झाल्याने त्यांना ऑक्सिजन सुद्धा दिला जात होता. परंतु त्याच वेळी दवाखान्यामध्ये एक तरुण महिला तिच्या 40 वर्षाच्या पतीला कोरोना झाल्यामुळे उपचारासाठी बेड मिळवण्याचा प्रयत्न करीत होती. बेड उपलब्ध नसल्याने हताश, निराश झालेली ही महिला करूण विलाप करत होती आणि ते पाहून दाभाडकर यांची सहानुभूती जागृत झाली. त्यामुळे
मी माझे आयुष्य 85 वर्षापर्यंत जगलो आहे त्यामुळे आता मला जगण्याची इच्छा नाही असे म्हणून त्यांनी महत्प्रयासाने मिळालेला आपला बेड त्या महिलेच्या तरुण पतीसाठी रिकामा केला व ते घरी निघून गेले. दुसऱ्या दिवशी (23 एप्रिल) त्यांचे निधन झाले असे पोस्टमध्ये लिहीले आहे व या अद्वितीय त्याग व औदार्याबद्दल दाभाडकरांची प्रशंसा व रा.स्व.संघाच्या संस्कारांची भलावण सुध्दा पोस्टमध्ये करण्यात आली आहे.
याच पोस्टवरुन नागपूरातील सर्व वर्तमानपत्रांनी बुधवारी तशा आशयाच्या बातम्या आपापल्या अंकांमध्ये छापल्या.
परंतु या प्रकरणाची सखोल चौकशी केली असता, दाभाडकर आणि रा स्व संघ यांचे महिमामंडन करण्यासाठी एका साधारण घटनेचे व म्हातारहटटाचे विनाकारण उदात्तीकरण केल्याचे आता उघड झाले आहे.

अगा जे घडलेचि नाही

या प्रकरणात नेमके काय घडले हे जाणून घेण्यासाठी सदरहू पत्रकाराने इंदिरा गांधी रुग्णालयाच्या Covid-19 उपचार विभागाचे प्रमुख डॉ अजय हरदास यांच्याशी संपर्क केला.
डॉ हरदास यांच्या म्हणण्यानुसार दाभाडकर 22 एप्रिलला संध्याकाळच्या सुमारास दवाखान्यात भरती झाले होते त्यावेळी त्यांची ऑक्सिजन पातळी 60च्या आसपास असल्याने त्यांना श्वास घेण्यात खूप त्रास होत होता. ही स्थिती धोकादायक असल्याने, त्यांचे वय लक्षात घेऊन त्यांना ईमर्जन्सी म्हणून उपचारासाठी बेड उपलब्ध केला होता व ऑक्सिजन दिला गेला होता. एक तासानंतर दाभाडकर यांची ऑक्सिजनची पातळी 90पेक्षा अधिक झाली व त्यांना श्वास घेण्यात होत असलेला त्रास कमी झाला व त्यांना बरे वाटू लागले. ते झाल्याबरोबर स्वतः दाभाडकर यांनी ड्युटीवरील नर्स/डॉक्टरांना आपल्याला घरी जायचे आहे, तेव्हा डिस्चार्ज द्या, असा हट्ट सुरु केला. डॉक्टरांनी त्यांना तुमची ऑक्सिजन पातळी कमी होऊ शकते त्यामुळे आम्ही तुम्हाला डिस्चार्ज देऊ शकत नाही असे सांगून परावृत्त करण्याचा भरपूर प्रयत्न केला. परंतु दाभाडकर हट्टाला पेटले होते व कुणाचे ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नव्हते. म्हणून शेवटी आम्ही त्यांना आमच्या दवाखान्यात उपचार घ्यायचे नसतील तर आम्ही तुम्हाला डिस्चार्ज देतो पण तुम्ही दुसऱ्या मोठ्या दवाखान्यात जाऊन उपचार घया असा पर्याय दिला होता. त्यावर दाभाडकर व त्यांच्या सोबतच्या नातेवाईकांनी दुसऱ्या दवाखान्यात भरती होण्याचे मान्य केले होते, पण ते न करता दाभाडकर घरी गेले, अशी माहिती डॉ हरदास यांनी दिली.
दाभाडकरांची ऑक्सिजन पातळी कमी होऊ शकत होती तर त्यांना डिस्चार्ज कसा दिला या प्रश्नावर, डॉ हरदास म्हणाले, एखादा पेशंट दवाखान्यात उपचार घ्यायला नकार देत असेल तर त्याला डिस्चार्ज अगेन्स्ट मेडिकल ॲडव्हाइस (DAMA) या प्रक्रियेअंतर्गत डिस्चार्ज देण्यात येतो. ही अधिकृत प्रक्रिया आहे व ती जगभर वापरल्या जाते. यामध्ये रुग्ण स्वेच्छेने उपचार घ्यायला नकार देत आहे व डिस्चार्ज स्वमर्जीने घेत आहे, काही बरेवाईट झाल्यास दवाखाना प्रशासन/डॉक्टराना जबाबदार धरु नये, असे रुग्ण किंवा त्याच्या नातेवाईकांकडून कडून लिहून घेतल्या जाते व रुग्णाला डिस्चार्ज दिल्या जातो, अशी माहिती डॉ हरदास यांनी दिली.
दाभाडकर यांच्या बाबत ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली व त्यांना DAMA अंतर्गत डिस्चार्ज देण्यात आला. ते मोठ्या दवाखान्यात भरती होतील असे आम्हाला वाटले होते पण ते तिथे न जाता सरळ घरी गेले व दुसर्‍या दिवशी त्यांचे निधन झाले असे डॉक्टर हरदास म्हणाले दाभाडकरांवर उपचार चालू असताना त्या ठिकाणी कोणी महिला आपल्या पतीसाठी बेड मिळावा म्हणून विलाप करत होती का असा प्रश्न विचारला असता डॉ हरदास म्हणाले याबाबत मला निश्चित सांगता येणार नाही, कारण हल्ली आमच्या दवाखान्यात प्रचंड गर्दी, गोंधळ असतो. पण तरीही एका रुग्णाचा बेड काढून दुसऱ्या रूग्णाला अशा प्रकारे देता येत नाही आणि ती अधिकृत पद्धतही नाही. त्यामुळे दाभाडकरांचा रिकामा बेड प्रक्रीयेप्रमाणे वेटींग लिस्टवर प्रथम असलेल्या रुग्णाला दिला गेला असावा, पण कोणाला दिला याची माहिती देणे आमच्यासाठी शक्य नाही, असेही डॉ हरदास म्हणाले.
याच बरोबर भारतामध्ये इच्छामरणाला मान्यता नाही त्यामुळे कुठलाही डॉक्टर कुठल्याही रुग्णाचा उपचार बंद करू शकत नाही, ते बेकायदेशीर आहे व डॉक्टरांच्या व्यावसायिक शपथेचा (Hippocratic Oath) तो भंग समजला जातो, असा खुलासाही डॉ हरदास यांनी केला.
लोकमतमधील बातमी मध्ये आपण दाभाडकरांच्या घटनेचे वर्णन सर्वौच्च औदार्य म्हणून कसे केले, हे विचारल्यावर डॉ हरदास म्हणाले ही प्रतिक्रिया मी फोनवर दिली होती. वार्ताहराने मला सोशल मिडीया पोस्टमध्ये एका मृत्यूशय्येवर असलेल्या वृद्ध पेशंटने आपला बेड दुसऱ्या तरुण पेशंटला दिला असे म्हटले आहे, त्याबद्दल आपल्याला काय म्हणायचे आहे असा सर्व सामान्य प्रश्न विचारला होता. त्यावर मी, ‘जर असे झाले असेल तर ते सर्वोच्च औदार्य असेल’असे उत्तर दिले होते आणि तेच पेपरमध्ये छापून आले आहे. पण त्याची पार्श्वभूमी अशी की प्रश्नच मुळात ‘हायपोथेटिकल’ होता केवळ दाभाडकरांशी संबंधित नव्हता हे लक्षात घ्यायला हवे.
याच रुग्णालयातील एका उच्चपदस्थ डॉक्टरने नाव न छापण्याच्या अटीवर सदरहू प्रतिनिधीला सांगितले कि दाभाडकरांचे वय 85 वर्ष असल्यामुळे त्यांना म्हातारचळ (Senility) लागला असण्याची दाट शक्यता आहे व त्यातून त्यांनी घरी जाण्याचा हट्ट केला असावा. बरेचदा वृद्ध पेशंट असे अतार्किक निर्णय घेतात व एखादा हट्ट धरून बसतात तसेच काहीसे या प्रकरणात घडले आहे या प्रकाराला त्याग, बलिदान म्हणणे हास्यास्पद आहे, असे या सूत्राने सांगितले.
याच दरम्यान सदरहू पत्रकाराने दाभाडकर यांची कन्या सौ आसावरी कोठीवान यांनाही संपर्क करायचा प्रयत्न केला परंतु तो असफल राहिला. त्यांचे कोरोनाग्रस्त श्वसूर अत्यवस्थअसल्याने त्या फोनवर बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत, अशी माहिती पारिवारिक सूत्रांनी दिली.
परंतु बुधवारी दुपारी सौ कोठीवान यांनी एक व्हिडीओ व्हायरल करुन त्यांची बाजू मांडली. या व्हिडिओत त्यांनी, माझ्या वडिलांनी जो त्याग केला त्याचा उहापोह न करता आपण त्या गरजू महिलेच्या पतीसाठी बेड रिकामा करतो आहोत, याबददल कुठलेही भाष्य वडिलांनी जाहीररित्या केलेले नाही व रुग्णालयाच्या डॉक्टरांनाही तसे सांगितलेले नाही. ही बाब फक्त आमच्या परिवारातील सदस्यांनाच माहित होती. त्यामुळे माझ्या वडिलांचा बेड कुणाला मिळाला याची आम्हाला माहिती नाही, अशी कबुलीच दिली आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओत DAMA प्रक्रीयेत डिस्चार्ज घेताना दुसऱ्या मोठ्या दवाखान्यात भरती होण्याचे दाभाडकर कुटंंबियांनी मान्य केले होते या मुद्याचा उल्लेख नाही. मग डॉ हरदास खोटे बोलताहेत का हा प्रश्न उभा रहातो पण त्याचे उत्तर सौ कोठीवान यांच्या व्हिडीओत नाही.
डॉ अजय हरदास, त्यांचे एक सहकारी व सौ आसावरी कोठीवान या तिघांची बाजू समजून घेतल्यानंतर दाभाडकरांच्या दुर्देवी निधनाचा फायदा संघ-भाजप परिवाराने घेतला असे दिसते. त्यांनी त्या गरजू महिलेच्या पतीसाठी स्वतःचा बेड देण्याचा महान त्याग दाभाडकर यांनी केला अशी धादांत खोटी पोस्ट टाकून दाभाडकर आणि संघ परिवाराचे खोटे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला, तो प्रयत्न सोशल मिडीयावर फसल्यानंतर दाभाडकरांनी आपला त्याग फक्त कुटुंबातील सदस्यांनाच बोलून दाखवला होता, अशी मखलाशी केली, हे आता स्पष्ट झाले आहे.

ही पोस्ट आली कुठून?

सदर्हू प्रतिनिधीने याबाबत चौकशी केली असता या खोटया पोस्टमागे, संघ, भाजयुमो, भाजप यामधील 20 ते 40 वयोगटातील 30 ते 50 तरुणांचा एक समूह असल्याची विश्वासनीय माहिती मिळाली आहे. नागपूरातील संघ परिवाराचा हा गट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अत्यंत जवळ आहे व तो 2014पासून सक्रीय झाला आहे. यापैकी काही तरुण/तरुणी उच्चशिक्षीत असून सर्व सदस्य सोशल मिडियाचे व्यवस्थापन करण्यात पटाईत आहेत. यातीलच एका उत्साही तरुणीने नारायणराव दाभाडकर यांच्या न घडलेल्या त्याग आणि औदार्याबददल ही खोटी पोस्ट सर्व प्रथम फेसबुकवर व्हायरल केली व ती नंतर इतरांनी शेअर करुन जगभर पसरवली, अशी माहिती मिळाली. दाभाडकर 23 एप्रिलला गेले आणि पोस्ट 26 एप्रिल ला म्हणजे तीन दिवसांनी आली. या तीन दिवसात या समूहातील सदस्यांनी सुनियोजितपणे दाभाडकरांच्या दुर्दैवी मृत्यूला त्याग, बलिदान, औदार्य अशी विशेषणे लावून उदात्ततेची झालर लावण्याचा प्रयत्न केला व त्यातून ही खोटी पोस्ट तयार झाली आहे. पण डॉ हरदासांचे वक्तव्य लक्षात घेतले तर, मुळात अशी घटनाच घडलेली नाही हे येथे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
( मृत्यू ही नेहमीच दुःखद घटना असते आणि त्याची जाहीर कारणमीमांसा करणे हे सौजन्याच्या चौकटीत बसत नाही. दाभाडकर यांच्या मृत्यूचे संघ परिवाराच्या या तरुण समूहाने खोटे उदात्तीकरण केले नसते किंवा तसा प्रयत्न केला नसता तर हे सर्व लिहिण्याची आणि हा सगळा शोध घेण्याचे मला काहीही कारण नव्हते. पण त्यातील खोटेपणा उघडकीस आणण्यासाठी पत्रकार म्हणून नाईलाजाने मला ते करावे लागले याबद्दल मी स्वतः दिलगीर आहे. नारायणराव दाभाडकर यांच्या आत्म्याला शांती मिळो, एवढीच प्रार्थना मी करू शकतो.)

-सोपान पांढरीपांडे,
पूर्व वाणिज्य संपादक,
लोकमत समूह,नागपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here