Home कृषि वार्ता अरे वा ! आता कापूस वेचणार यंत्रमानव!!

अरे वा ! आता कापूस वेचणार यंत्रमानव!!

जगभर कोरोना महामारीने हैदोस घातलेला असल्याने झाडून सगळ्या यंत्रणा सध्या कोरोनाचे उच्चाटन करण्यासाठी किंवा त्याच्यासोबत दोन हात करण्यासाठी झगडत आहेत. आरोग्य यंत्रणांसह प्रत्येक ठिकाणचे प्रशासन फक्त कोरोना संक्रमण रोखण्यासाठी व्यस्त आहे. माध्यमांमध्येही या महामारीचा उद्रेक, त्यामुळे किड्या-मुंग्यांसारखे जाणारे जीव आणि उद्भवलेली बिकट परिस्थिती बघायला मिळत आहे. महामारी बरोबरच सातत्याने लोकांवर होणारा या संदर्भातील बातम्यांचा माराही अनेकांना नकोसा झाला आहे. म्हणूनच सरकारने जसे लॉकडाउन जाहीर केले, त्या पद्धतीने कोरोनाच्या बातम्याही लॉकडाउन कराव्यात, असे संदेश आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अनेकजण मानसिकदृष्ट्या खचल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत एखादी दुसरी चांगली बातमी ऐकायला मिळाली तर थोडे बरे वाटते. एरव्ही पांढरा हत्ती म्हणून संबोधल्या जाणार्‍या कृषी विद्यापीठाने ही चांगली बातमी दिली आहे. कापूस वेचणारा रोबोट अर्थात यंत्रमानव लवकरच शेतकर्‍यांच्या मदतीला येणार असून, त्यामुळे कापूस उत्पादकांची मोठीच समस्या सुटणार असल्याची ही बातमी आहे. कापूस पिकासाठी यंत्रमानव निर्मितीसंदर्भात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला व ज्योश आर्टिफिशीयल इन्टेलिजन्स सोल्युशन्स ठाणे यांच्यात या संदर्भात नुकताच सामंजस्य करार झाला आहे. कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.विलास भाले व त्यांच्या सहकार्‍यांचे यासाठी अभिनंदन करावे लागेल. देशांतर्गत कापूस लागवडीचे क्षेत्र 129 लाख हेक्टर असून, सुमारे 60 लाख शेतकरी कापसाची लागवड करतात. विदर्भ-मराठवाड्यात कापूस हे महत्त्वाचे नगदी पीक आहे. गेल्या काही वर्षांपासून मात्र कापूस उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत आला आहे. कापूस उत्पादक पट्ट्यात शेतकर्‍यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्याही वाढल्या आहेत. या आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने वेळोवेळी पॅकेज घोषित केले, कर्जमाफी केली, शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यासाठी वेगवेगळे उपाय अवलंबिले. डॉ. पंजाबराव देशमुख जैविक मिशन किंवा अन्य ठोस कार्यक्रम हाती घेऊन शेतकर्‍यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केल्या गेला. तरीही कापूस उत्पादकांच्या अडचणी कमी झाल्या नाहीत. त्यासाठी वेगवेगळी कारणे आहेत. गेल्या काही वर्षांपासून या पांढर्‍या सोन्याला मिळणारा भाव आणि उत्पादन खर्च याचा ताळमेळ बसेनासा झाला आहे. कापूस उत्पादकांच्या समस्या या वेगवेगळ्या आहेत. वेचणी, त्यासाठी येणारा खर्च, कीड -रोगांचे नियंत्रण, तणाचे -खताचे नियोजन, महागडे बियाणे यासर्व बाबींवर शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात खर्च येतो. अलिकडच्या काळात तर शेतात काम करणार्‍यांची मोठ्या प्रमाणात वाणवा असून, दुसर्‍या राज्यातील मजूर प्रसंगी काम करण्यासाठी आणावे लागतात, एवढी परिस्थिती भयंकर आहे. त्यातही कापूस वेचणीचे काम अतिशय किचकट. प्रामुख्याने ग्रामीण भागातील महिला हे काम करतात. तरीही ही वेचणी महागात पडत असल्याने ते शेतकर्‍यांना कधीही परवडणारे नसते. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन विद्यापीठाने त्यासाठी पुढाकार घेतला. कापूस पिकासाठी यंत्रमानव निर्मिती झाली तर ती शेतकर्‍यांसाठी मोठेच वरदान ठरणार आहे. कापूस वेचणीसह तण नियंत्रणासंदर्भातील हा अभिनव प्रयोग असल्याचे या कराराच्या निमित्ताने सांगण्यात आले. ठाणे येथील ज्योश आर्टिफिशीयल इन्टेलिजन्स सोल्युशन्स ही कंपनी गेल्या सहा महिन्यांपासून इन्टीग्रेटेड अ‍ॅग्रीकल्चर रोबोट बनविण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर काम करीत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीवर आधारित तंत्रज्ञान वापरून हा कृषी यंत्रमानव लवकरच शेतकर्‍यांना उपलब्ध होईल, असा अधिकार्‍यांचा दावा आहे. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ तांत्रिक सहकार्य करून या यंत्रमानव निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. कृषी विद्यापीठाचे नवनवे तंत्रज्ञान आणि कृषी क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानामुळे शेतकर्‍यांना भरीव मदत होत असते. या यंत्रमानवामुळेही कापूस उत्पादकांची मोठीच समस्या मार्गी लागेल. या यंत्रमानवामुळे वेचणीसारखे किचकट काम करून घेताना वेळ आणि पैशाची बचत होणार असल्याने निश्चितच त्याचा उत्पादनावर परिणाम होईल. शेतकर्‍यांच्या जीवनात त्यामुळे नवीन पहाट उगवल्याशिवाय राहणार नाही. हा यंत्रमानव लवकरात लवकर तयार होऊन कापूस उत्पादकांच्या मदतीला यावा, यासाठी विद्यापीठ आणि ज्योश कंपनीला शुभेच्छा!


सुधाकर खुमकर
जेेष्ठ पत्रकार अकोला
——————————————

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here