Home क्राईम बाशिंग बांधून प्रियकर बोहल्यावर चढणार, तोच प्रेयसीने रोखले लग्न!

बाशिंग बांधून प्रियकर बोहल्यावर चढणार, तोच प्रेयसीने रोखले लग्न!

जवानाने दोघींचे आयुष्य केले बरबाद : एकीचे सर्वस्व लुटले; दुसरीला लग्नाच्या हळदीचा लावला डाग
बुलडाणा, (प्रतिनिधी)
……………………………………
शहरातील एका युवतीला सैन्यदलातील एका जवानाने आपल्या प्रेमजाळ्यात ओढले. प्रेमाच्या आणाभाका घेतल्या आणि लग्नाचे आमिष दाखवत तिचे लैंगिक शोषण केले. सर्वस्व लुटल्यानंतर आपल्यासोबत विवाहास नकार देत तो दुसऱ्या मुलीसोबत लग्न करतोय म्हणून प्रेयसी संतापली आणि लग्नाच्या आदल्या दिवशीच पोलीस ठाण्याची पायरी ओलांडत तिने बाशिंग बांधून बसलेल्या जवानाचे शुक्रवारी होणारे लग्न मोडले. या प्रकरणी शहर पोलिसांत सैनिकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान, हळदभरल्या अंगाने आरोपी फरार झाला.
पीडित युवतीला अंधारात ठेऊन तिच्या भावनांशी तर तो खेळलाच, पण सोयरसंबंध जोडून दुसऱ्या कुटुंबीयांतील नवऱ्या मुलीलादेखील त्याने दगा दिला. साक्षगंध झाल्यापासून ती सुखी संसाराची स्वप्ने रंगवू लागली, दोन दिवसांत वरमाला गळ्यात पडतील म्हणून तिच्या अंगाला हळद लागली. मात्र, हाच हळदीचा डाग आता तिला आयुष्यभर छळणार आहे. रामेश्वर चव्हाण असे आरोपीचे नाव असून, या जवानाने दोघींच्या आयुष्यात विष कालवल्याच्या प्रतिक्रिया या घटनेनंतर उमटू लागल्या आहेत.
शहरातील एका गरीब कुटुंबामधील १९ वर्षीय तरुणी पोलीस भरतीची तयारी करत होती. अशातच तिची ओळख रामेश्वर भास्कर चव्हाण (रा. केसापूर, ता.जि. बुलडाणा) या सैनिकासोबत झाली. ओळखीचे रुपांतर पुढे प्रेमात झाले. याचाच फायदा घेत रामेश्वरने पीडित युवतीचे शारीरिक शोषण केले. लग्नाच्या भुलथापा दिल्या. दरम्यान, रामेश्वरची सोयरिक झाली असून तो तिच्याशी लग्न करणार असल्याची भनक लागताच पीडित तरुणीने १५ एप्रिल रोजी रात्री बुलडाणा शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. आपल्यावरील अत्याचाराची कैफियत सांगितल्यानंतर पोलिसांनी रामेश्वर चव्हाणविरुद्ध बलात्कारासह अनुसूचित जाती, जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल केले. विशेष म्हणजे रामेश्वरचे लग्न शहरानजीक खामगाव रोडने असलेल्या एका गावातील मुलीसोबत लागणार होते. अन्यायग्रस्त तरुणीने तक्रार केल्यानंतर शुक्रवार, १६ एप्रिलला पार पडणारा विवाह मोडला. तर गुन्हे दाखल झाल्यानंतर रामेश्वर पसार झाला. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते करीत आहेत.
मनधरणीचा प्रयत्न
आरोपी रामेश्वर चव्हाणच्या कुटुंबीयांनी पीडित युवतीच्या मनधरणीचा बराच प्रयत्न केला. विनवणीचा हा प्रकार काही तास चालला. मात्र, मला न्याय हवा म्हणत युवती ठाम राहिली आणि अखेर तिने पोलीस ठाण्याची पायरी ओलांडत सविस्तर तक्रार दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here