Home मनोरंजन …आणि मेहकरच्या प्रसिद्ध ‘प्रताप टॉकीज’ चा पडदा कायमस्वरूपी पडला…

…आणि मेहकरच्या प्रसिद्ध ‘प्रताप टॉकीज’ चा पडदा कायमस्वरूपी पडला…

मेहकरच्या वैभवात भर टाकणारी प्रताप टॉकीज नेस्तनाबूत..

मेहकरशी संबंधित असलेल्या प्रत्येकाचं प्रताप टॉकीज शी एक वेगळं नातं होतं, त्यामुळे नेस्तनाबूत झालेल्या प्रताप टॉकीज चा हा फोटो पाहून अनेकांच्या हृदयात कालवाकालव झाल्या शिवाय आणि तोंडातून अरेरे हे शब्द निघाल्याशिवाय राहणार नाही.

तब्बल 11 वर्ष मेहकर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेल्या माजी आमदार स्व अण्णासाहेब देशमुख यांच्या मालकीची आणि त्यांच्या दूरदृष्टीचा कल्पना करायला लावणारी प्रताप टॉकीज म्हणजे केवळ मेहकर चे नव्हे तर एकेकाळी जिल्ह्याचे वैभव असणारी टॉकीज मेट्रो सिटी मध्ये ज्या पद्धतीने टॉकीज होत्या अगदी तशाच पद्धतीची जिल्ह्यातील ही पहिली टॉकीज म्हटले तर ते चुकीचे होणार नाही.

बाल्कनी, प्रेक्षकांसाठी सुसज्ज मुत्रीघर, संडास,महिलांची स्वतंत्र आसन व्यवस्था,उत्कृष्ट बांधकाम ह्याचा एक चांगला नमुना म्हणून प्रताप टॉकीज कडे बघितल्या जायचे
मला कळत पण नव्हतं तेव्हापासून प्रताप टॉकीज म्हणजे माझ्यासाठी कायम आकर्षण असलेली आवडती टॉकीज
मी किती वर्षाचा असेल हे आठवत नाही. मात्र आई बाबांसोबत अकोल्यावरूनवकिंवा कुठूनतरी मेहकर ला आलो. रात्र झाली, घरी सुल्ताणपूर ला जायला बस नसेल म्हणून कदाचित पण आई आणि बाबासोबत काहीच कळत नसलेला एव्हडा मी लहान असतांना आई बाबा सोबत प्रताप टॉकीज मध्ये कुठला तरी ब्लॅक अँड व्हाइट सिनेमा बघितल्याचे अस्पष्ट आठवते. त्या अजाणत्या वयापासून माझं प्रताप टॉकीज सोबत नातं जुळलं

आज मीच पन्नाशीत गेलो आहे
प्रताप टॉकीज चे वय असेल 65 पेक्षा अधिकचे
जिल्ह्यात बुलढाणा, चिखली ,खामगाव ला देखील एव्हडी सुंदर टॉकीज नव्हती.
नंतरच्या काळात माजीमंत्री माझ्या वडिलांचे मित्र स्व शिवाजीराव पाटील यांची मलकापूर येथील एक टॉकीज बांधल्या गेली व नंतर खामगाव ची,अलिकडे 1985 च्या दरम्यान किशोर मापारी यांची भागवत चित्र मंदिर लोणार पण तरीही ह्या सगळ्या टॉकीज प्रताप टॉकीजच्या तुलनेत कमीच
तो काळ म्हणजे सिनेमा टॉकीज चा सुवर्ण काळ
मेहकरच्या प्रताप टॉकीज मध्ये लागलेला सिनेमा बघण्यासाठी बैलगाडी ने खेड्यापाड्यातून लोकं यायची. दसऱ्याच्या दिवशी तर हमखास आम्ही सुल्ताणपूर ला असतांना त्यावेळी 7 वि , 8 विला सुल्ताणपूर येथील स्व डॉ आर एन लाहोटी यांचे चिरंजीव व आताचे शैक्षणिक तथा अनेक क्षेत्रातील मोठे व्यक्तिमत्व संजय लाहोटी हा मेहकरच्या एम ई एस हायस्कुल ला शिकायचा तो मेहकर वरून घरी आला की आम्ही त्याच्या घराजवळ त्याची आवर्जून वाट बघायचो
त्याला आम्ही सांगायचो,येताना एसटी बस मधून सिनेमा ची पाटी बघायची. तो आला की हमखास सांगायचा
आमच्या सर्वांच्या अगोदर आमचा बालमित्र संजय लाहोटी सिनेमा बघायचामग आम्ही तहान भूक विसरून त्याच्या तोंडून सिनेमाची स्टोरी ऐकायचो
तो एकटा बोलायचा आणि आम्ही कान देऊन सिनेमा चे कथानक ऐकायचो.

मग आमच्या टीम मध्ये अनेकवेळा नेतृत्व आमच्या पेक्षा वयाने व वर्गाने मोठा असलेला आमचा सुभाष दा,अर्थात मुख्याध्यापक सुभाष टकले सिनेमा ला जायचं ठरवायचा
आणि आम्ही घरी रडून पडून पैसे व परवानगी मिळवायचो.
मी आई बाबासोबत बघितलेला कुठला तरी सिनेमा, सन 2000 ला लग्न झाल्यावर जयचंद बाठिया कडे घरी आलो,भाभीनी जेवून जा असा आग्रह धरला
मग तो पर्यंत आम्ही सिनेमा बघून येतो असे सांगून माझ्या पत्नी सोबत कहो ना प्यार है, मुलांसोबत – परिवारासोबत 2006- 7 च्या दरम्यान विवाह हा सिनेमा बघितला त्यानंतर मात्र प्रताप टॉकीज मध्ये सिनेमा बघायला मिळाला नाही,नाही म्हणायला इतर खासगी कार्यक्रम बघितले.

प्रताप टॉकीज च्या अनेकांना गोड आठवणी देखील असतील
एखादी मैत्रीण सिनेमा आलेली असली की सिनेमात शिट्या वाजवून संपूर्ण टॉकीज डोक्यावर घेणारे अनेक हिरो पडद्या समोर टॉकीज मध्ये बसलेले देखील बघितले.
मात्र अनेक गोड आणि मधुर आठवणी प्रताप टॉकीज सोबत जुळलेल्या आहेत
सुल्ताणपूर येथील आमचे मामा पंजाबराव पाटील यांच्या करडी गाळायला बैल गाडी जाणार होती,त्यांच्या कामावरील माणूस,त्यांचा मुलगा बाळू पाटील व मी बैलगाडीने केवळ सिनेमा बघायला गेलो
पण चिंचोली च्या समोर बैलगाडी चे चाक तुटले, दुसऱ्याच्या बैलगाडी चे चाक बसवून आम्ही मेहकर ला गेलो,त्यावेळी रणधीर कपूर चा चाचा भतीजा हा सिनेमा बघितला.एकदा संजय लाहोटी यांची मोठी बहीण चंदा जिजी,माझी बहिण सौ मंगल ताई ,कचरुसेठ जोशी यांच्या मुली विजयाताई व सरोज ( मुन्नी ) ह्या सगळ्या मोठ्या बहिणी सोबत एक सिनेमा बघितला होता,त्यात चल चमेली बाग मे झुल्ला झुलावूनगा गे गाणं होतं
चांदणी हा सिनेमा कितीवेळा बघितला असेल सांगता येत नाही.

मेहकर ला राम ‘तेरी गंगा मैली हा सिनेमा प्रताप मध्ये आणि त्याचवेळी अमिताभ चा मर्द हा सिनेमा राजा टॉकीज मध्ये लागलेला होता
त्यावेळी यात्रेत देखील हे सिनेमे आलेले नसल्याने बुलढाणा येथून आमचे नातेवाईक हे 2 सिनेमे बघण्यासाठी मेहकर ला आले होते.
कधी फर्स्ट,सेकंड क्लास चे पैसे नसतील तर थर्ड क्लास मध्ये देखील सिनेमा बघण्याचा अनुभव एकदा घेतलेला आहे
त्यावेळी 2 रुपये तिकीट होते
1986 ला घरून शाळेसाठी यायचं व सिनेमा बघायचा हाच क्रम
घाईत मेहकर ला यायचं,अमर म्युझिक सेंटर वर गाण्यांची यादि देऊन जुनी कॅसेट द्यायची व तोपर्यंत छत्रे गाणे भरून ठेवायचे
आज प्रताप टॉकीज उध्वस्त झाल्याने हे आठवणीच गाठोडं आपोआप सुटलं
शिवाजी शाळेत असतांना एक घडलेला किस्सा मी 1997 ला लोकमत चा महाविद्यालयीन प्रतिनिधी असतांना प्रसिद्ध केला होता
आमच्या वर्गात हिवरा साबळे येथील एक साबळे मित्र होता.( आज तो ह्यात नाही ) त्याने आशिष चावला,मंदाकिनी चा चित्रपट बघितला होता
मधल्या सुट्टीत तो त्या सिनेमाची स्टोरी सांगताना त्यातील ‘उषा आय लव्ह यु’ असे त्याने फळ्यावर लिहले व ते खोडायचे तो विसरला
आमच्या वर्गात नुकतीच एकच मुलगी आली होती. तिचे नाव योगायोगाने उषा होते
तिने ते वाचले व रडायला लागली
प्रा सुरुषे सर क्लासवर आले
ती मुलगी का रडते हे सरांच्या लक्षात आले
आम्ही 4,5 मित्र उडाणंटप्पू,पण असला घाणेरडा प्रकार कधीच न केलेले…..
सुरुषे सर जाम चिडले,मी ब्लॅक बोर्ड चा फोटो काढतो,पोलीस कम्प्लेनट करतो,खर सांगा कुणी लिहले असे विचारायला लागले
राजू टाले ( हे आता माझे सख्खे मावस सासरे आहेत ) , कलिम खान ( आताचा शहर काँग्रेस चा अध्यक्ष ) ,विवेक तळणीकर, व मी अशा आम्हाला सरांनी बेंच वर उभे केले. (माझ्या सोबत 11 विला व्यंकटेश मॉल चे मालक बबन चरखा, आर्ट होम टेलर स्वर्गीय पुरुषोत्तम रूनवाल हे पण सोबत होते)
मी वगळता हे सगळे क्रिकेट चे शौकीन, त्यादिवशी कुठली तरी मॅच होती
त्यांनी सांगितले सर भारताची मॅच होती आम्ही आलोच नव्हतो, सरांना ते पटले. आणि ते खरे होते
मग मला विचारलं
मी लाजत लाजत सिनेमा ला गेलो होतो असे सांगितले व योगायोगाने आदल्या दिवशी चे सिनेमा चे तिकीट खिशात होते मी पण सुटलो
नंतर एक साधा मुलगा,साबळे उभा राहला
सर हे मी लिहले पण आपल्या वर्गातील मुलीचे नाव उषा आहे हे मला माहिती पण नाही सर ( तिला वर्गात येऊन दुसराच दिवस होता,हजेरीत पण नाव नव्हते,दिवाळी पूर्वी खूप उशिरा वर्गात आली होती )
सर मी प्रताप टॉकीज मध्ये सिनेमा बघितला व ती स्टोरी मित्रांना सांगताना सहज फळ्यावर लिहून बसलो अस जेव्हा त्या साबळे ने सांगितले तेव्हा कुठे सुरुषे सर व ती मुलगी देखील शांत झाली
पण मला सिनेमाची खूप आवड आहे व मी शाळेला दांडि मारतो हे मित्रांना व शिक्षकांना देखील माहिती होतं
अशा अनेक आठवणी ज्या प्रताप टॉकीज सोबत जुळलेल्या होत्या त्या आता आठवणी गुलदस्त्यात बंद झाल्या आहेत.

– सिद्धेश्वर पवार
गोडवा
बालाजी नगर,मेहकर
9422880080
7350473030

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here