Home बुलढाणा जिल्हा कोरोना अपडेट असे आहेत जिल्ह्यात कोरोना प्रतिबंध सुधारित नियम

असे आहेत जिल्ह्यात कोरोना प्रतिबंध सुधारित नियम

मिशन बिगेन अंतर्गत 15 एप्रिल पर्यंत जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी

रात्री 8 वाजे नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजेपर्यंत कडक संचारबंदी
बुलडाणा,(जिमाका)दि. 1 : जिल्ह्यातील कोविड 19 चा प्रादुर्भाव बघता 15 एप्रिलपर्यंत मिशन बिगेन अगेन अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यात रात्री 8 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजेपर्यंत कडक संचारबंदी लागू असणार आहे. या कालावधीत पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र येण्यास बंदी आहे, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी एस रामामूर्ती यांनी दिले आहे.

या आदेशान्वये जिल्ह्यात सर्व प्रकारची सिनेमागृहे / नाट्यगृहे / बहुचित्रपट गृहे, मॉल्स, प्रेक्षकगृहे, व्यायामशाळा व हॉटेल, उपहारगृहे, खाद्यगृहे सकाळी 8 ते रात्री 7.30 पर्यंत 50 टक्के क्षमतेसह कोविड नियमांचे पालन करून सुरू ठेवण्यास परवानगी राहील. त्यानंतर हॉटेल्स, उपहारगृहे, खाद्यगृहे, स्वीटमार्ट्स प्रत्यक्ष सुरू न ठेवता केवळ पार्सल सुविधेस रात्री 10 वाजेपर्यंत मुभा देण्यात येत आहे. दुध विक्रेते, दुध वितरण केंद्र सकाळी 6 ते रात्री 9.30 वाजेपर्यंत सुरू राहतील. नगर पालिका तसेच क्षेत्राबाहेर ज्या उद्योगांना सुरू ठेवण्याकरीता यापूर्वी परवानगी देण्यात आलेली आहे. ते सर्व उद्योग सुरू ठेवण्याकरीता परवानगी राहणार आहे. आरोग्य सेवा व इतर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारच्या खाजगी आस्थापना त्यांचकेडील 50 टक्के कर्मचारी क्षमतेसह सुरू राहतील. संबंधीत आस्थापनांनी कोविड च्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजनांसह सुरू राहतील. सर्व प्रकारचे शासकीय कार्यालये, बँका अत्यावश्यक सेवा वगळून 50 टक्के कर्मचारी संख्या ग्राह्य धरून सुरू राहतील. सर्व बँका नियमितपणे सुरू राहतील. लग्न समारंभाकरीता वधु,वर, बॅंड पथक व मंडप डेकोरसह 50 व्यक्तींना तहसिलदारांकडून परवानगी अनुज्ञेय असणार आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या मंगल कार्यालयाच्या मालकाविरूद्ध दंड आकारण्यात येईल. तसेच सदर मंगल कार्यालये ही केंद्र शासनाने कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून अधिसुचीत असेपर्यंत बंद करण्यात येतील. अंत्यविधी करिता 20 व्यक्तींना परवानगी असेल.

विविध प्रकारचे निर्मिती उद्योग हे त्यांचे पुर्ण क्षमतेसह सुरू राहतील. तथापि याबाबत सामाजिक अंतर व कोविड च्या प्रतिबंधीत उपाययोजना अंतर्गत त्यांची कर्मचारी संख्या ही नियंत्रीत ठेवतील. कर्मचाऱ्यांची उपस्थिती नियंत्रित ठेवण्याकरीता सर्व प्रकारचे निर्मिती उद्योग हे स्थानिक प्राधिकरणाने दिलेल्या दिशा निर्देशानुसार त्यांच्या कामाच्या वेळा वाढवून त्यानुसार नियंत्रण ठेवतील. उद्योगांमध्ये योग्य पद्धतीने मास्क घातल्याशिवाय प्रवेश असणार नाही. अंगात ताप असलेल्या व्यक्तीला प्रवेश देण्यात येणार नाही. यासाठी आवश्यक तपासणी यंत्रणा ठेवणे आवश्यक आहे. सॅनीटायझरची पुरेशी व्यवस्था करण्यात यावी. या नियमांचे उल्लंघन करणारे उत्पादक उद्योग केंद्र शासनाने कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून अधिसुचीत असेपर्यंत बंद करण्यात येतील. तसेच उद्योग मालकाविरूद्ध दंड आकारण्यात येवून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. शासकीय कार्यालयात गर्दी टाळण्यासाठी केवळ लोकप्रतिनिधी यांनाच प्रवेश देण्यात यावा व इतर अभ्यागतांना केवळ अत्यावश्यक कामाकरीताच प्रवेश देण्यात येणार आहे. ज्यांना बैठकीसाठी बोलाविण्यात आले असेल त्यांना विभाग प्रमुखांनी विशेष पास द्यावा.

सर्व प्रकारची शैक्षणिक संस्थांमध्ये अशैक्षणिक कर्मचारी, संशोधन कर्मचारी, वैज्ञानिक यांना ई माहिती, उत्तर पत्रिका तपासणे, निकाल घोषीत करणे आदी कामांकरीता परवानगी असणार आहे. या कालावधीत सर्व प्रकारच्या शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक प्रशिक्षण केंद्र, खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस बंद ठेवण्यात येतील. मात्र ऑनलाईन शिक्षणास परवानगी असेल. मालवाहतूक ही नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. आंतर जिल्हा बस वाहतूक, सर्व प्रकारची सार्वजनिक वाहतूक एकूण प्रवाशी क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेसह सोशल डिस्टन्स व निर्जंतुकीकरण करून सुरू ठेवण्यास परवानगी राहील. चार चाकी वाहनात चालक व्यतिरिक्त तीन प्रवाशी, तीनचाकी वाहनात चालक व्यतिरिक्त दोन प्रवाशी व दुचाकीवर हेल्मेट व मास्क लावून दोन व्यक्तींना परवानगी असेल. ठोक भाजी मंडई सकाळी 3 ते 6 या कालावधीत सुरू असणार आहे. मात्र सदर मंडईत किरकोळ विक्रेते यांनाच प्रवेश राहील. निर्बंधासह खुल्या मैदानावर शारिरीक कसरती व मॉर्निंग वॉक ला परवानगी असेल. तसेच सर्व प्रकारची सामाजिक, राजकीय, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम, जत्रा, यात्रा, उरूस, दिंडी व स्नेहसंमेलन, मेळावे, सभा या कालावधीत बंद असतील. सर्व धार्मिक स्थळे प्रतिबंधित क्षेत्रात नागरिकांसाठी पुर्णपणे बंद राहतील. तसेच प्रतिबंधित क्षेत्र वगळता अन्य ठिकाणी सर्व धार्मिक ठिकाणी 10 व्यक्तींच्या उपस्थितीत सुरू राहतील. जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद राहतील.

आगामी होणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने अभ्यासिका एकूण आसन क्षमतेच्या केवळ 50 टक्के क्षमतेने सोशल डिस्टसिंग, सॅनीटायझर, मास्कचा वापर आदी नियमांचे पालन करून सुरू राहतील. सर्व खाजगी वैद्यकीय सेवा, पशुचिकित्सा सेवा त्यांचे नियमित वेळेनुसार सुरू राहतील. कोणतेही रूग्णालय बंदचा आधार घेवून रूग्णांना आवश्यक सेवा नाकारणार नाही. जिल्ह्यातील ॲम्बुलन्स सेवा 24 तास सुरू राहतील. पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस यांची वाहतुक, वितरण, विक्री व साठवण सुरू राहील. या कालावधीत संपन्न होणाऱ्या पुर्वनियोजित परीक्षा त्यांचे वेळापत्रकानुसार घेण्यात येतील. तसेच परीक्षार्थी यांना सदर कालावधीमध्ये परीक्षेचे ओळखपत्र व पालकांना त्यांचे ओळखपत्र सोबत ठेवणे अनिवार्य असेल. सर्व प्रकारच्या खाजगी आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवरील सर्व कर्मचाऱ्यांची वेळोवेळी तपासणी करावी. संसर्ग सुरक्षा नियमांचे पालन करावे. कोविडची लक्षणे दिसून येताच संबधित कर्मचाऱ्याची आरटीपीसीआर चाचणी करून घ्यावी. कृषि उत्पन्न बाजार समितीच्या ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेता गर्दी नियंत्रण करून हात धुण्याची व्यवस्था करण्यात यावी. कोरोना संसर्ग सुरक्षा नियमांचे पालन याठिकाणी होणे आवश्यक आहे. गर्दी जमवून करण्यात येणारी निर्दशने, मोर्चे, रॅली, आंदोलने यांना बंदी राहील. मात्र केवळ 5 व्यक्तींच्या उपस्थितीत स्थानिक पोलीस विभागाची परवानगी घेऊन संबंधीत शासकीय विभागास निवेदन देता येणार आहे.

या कालावधीत रात्री 8 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी लागू असल्याने नागरिकांना विनाकारण बाहेर फिरण्यास मनाई राहील. मात्र आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधीत शासकीय आस्थापना, अत्यावश्यक वैद्यकीय सेवा देणारे घटक, संचारबंदीच्या कालावधीत कंपनीत जाणारे व येणारे कामगार, बाहेर गावाहून येणाऱ्या प्रवाशांना सुविधा देणाऱ्या ऑटोरिक्षा यांना मुभा राहील. मात्र ऑटोमधून चालक वगळता केवळ देान प्रवाशांनाच प्रवास करता येईल.

गृह विलगीकरणातील रूग्ण ज्या वैद्यकीय अधिकारी यांच्या देखरेखीखाली असेल, त्यांनी सर्व प्रकारची दक्षता घ्यावी. संबंधित रूग्ण हा पॉझीटीव्ह असल्याबाबतचा फलक हा त्यांचे घरासमोर ठळकपणे दिलेस, असा लावण्यात यावा. त्याचा 14 दिवसांचा गृह विलगीकरणाचा कालावधी त्यामध्ये नमूद करावा. कोरोना पॉझीटीव्ह रूग्णाच्या हातावर गृह विलगीकरणाचा शिक्का मारण्यात यावा. या रूग्णाच्या कुटूंबातील सदस्यांनी बाहेर फिरणे टाळावे, अत्यावश्यक बाबीसाठी घराबाहेर पडावयाचे झाल्यास मास्कशिवाय बाहेर पडू नये. या नियमांचे उल्लंघन केल्यास अशा रूग्णास तात्काळ कोविड सेंटरमध्ये हलविण्यात येईल. या आदेशांचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग प्रतिबंधात्मक कायद्याअन्वये कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. नागरीकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये. कोरोना संसर्ग नियमांचे पालन करावे, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.

राष्ट्रीय दिशा निर्देशानुसार अशा आहेत सुचना

सर्व सार्वजनिक आणि कामाच्या ठिकाणी तसेच प्रवास करताना प्रत्येक व्यक्तीने मास्क वापरणे बंधनकारक राहील. तसेच सामाजिक अंतरच्या नियमांचे पालन करण्यात यावे. कमीत कमी 6 फुटाचे अंतर राखावे. दुकानांमध्ये खरेदी करतेवेळी दुकानदार यांनी दोन ग्राहकांमध्ये सुरक्षित अंतर राहील याची दक्षता घ्यावी. तसेच एकावेळी 5 पेक्षा जास्त लोक एकत्रित येणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. सार्वजनिक आणि कामाच्या ठिकाणी कोणत्याही व्यक्तीने थुंकू नये. हा गुन्हा आहे. सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, तंबाखू आदींचा वापर करू नये. या कालावधीत जास्तीत जास्त लोकांनी घरूनच काम करण्याची मुभा द्यावी. त्यासाठी कार्यालय, दुकान, औद्योगिक क्षेत्र, वाणिज्यिक आस्थापना यांनी त्यांचे कामाच्या वेळा निश्चित कराव्यात.प्रवेश व बाहेर जाण्याच्या ठिकाणी थर्मल स्कॅनिंग, हॅण्डवॉश सॅनीटायझर याची व्यवस्था करण्यात यावी. कार्यालये, आस्थापनांनी वारंवार निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करावे. कोणत्याही व्यक्तीने मास्क न वापरल्यास 500 रूपये दंड आकारण्यात येईल. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास अशा व्यक्तीवर 1000 रूपये दंड आकरण्यात येईल.

प्रतिबंधीत क्षेत्रासाठी सूचना

जिल्ह्यात यापूर्वी ज्याप्रकारे प्रतिबंधात्मक क्षेत्राचे वर्गीकरण करण्यात आले आहे, त्यानुसार स्थानिक प्राधिकरणाने याबाबत केलेले आदेश यापुढेही लागू राहतील. प्रतिबंधात्मक क्षेत्रात कोविड बाधीत रूग्ण आढळल्यास त्याबाबत नियमानुसार 14 दिवस विलगीकरणाची कार्यवाही करावी.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here