शेगाव – तालुक्यातील भास्तन येथील शेतकऱ्याने कर्जबाजारी पणाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. परमेश्वर शेषराव मिरगे असे शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे 3 एकर तर पत्नीच्या नावावर दिड एकर शेती आहे. दरम्यान गेल्या काही वर्षांपासून शेतात सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे परमेश्वर मिरगे हे चिंतेत होते. शुक्रवारी त्यांनी टोकाचे पाऊल उचलत शेतामध्ये तणनाशक विष घेतले. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली व त्यांना खामगाव येथील एका हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. शेतकरी परमेश्वर मिरगे यांच्यावर बँक ऑफ महाराष्ट्र चे कर्ज आहे. तसेच कोटक महिंद्रा फायनान्स चे मागील वर्षी महिंद्रा ट्रॅक्टर किंमत 5 लाख रूपये घेतले होते. सततची नापिकी व कर्जबारीपणामुळे त्यांनी आत्महत्या केली.