#स्मृती_स्मरण #थोरो_यांच्या_धाडसी_पावलाचे !
18 मार्च 1845, आजपासून पावणे दोनशे वर्षांपूर्वीची ही गोष्ट. एक तिशीच्या उंबरठ्यावरचा तरूण स्वेच्छेने वनवास पत्करायला निघाला होता. हेन्री डेव्हिड थोरो हे त्याचे नाव. जंगलात निघालेल्या आपल्या तरुण मुलाचे काय होणार या विचाराने चिंताक्रांत झालेल्या आई आणि बहिणीची समजूत काढून, आठवड्यातून एकदा तरी भेटेन असे आश्वासन देऊन थोरोने आजच्याच दिवशी, 18 मार्च 1845 मध्ये अरण्यात जाण्यासाठी प्रयाण केले होते… अमेरिकेतील काॅकाॅर्डहून वाॅल्डन तलावाच्या दिशेने निघालेल्या त्या एका ऐतिहासिक पावलाने जगाला जगण्याची नवी दॄष्टी दिली होती. म्हणून मला घराकडून अरण्यात टाकलेले ते पाऊल, मानवाने चंद्रावर टाकलेल्या पावलापेक्षा जास्त महत्वाचे वाटते. आर्मस्ट्रॉंग यांचं पाऊल निसर्गावर विजय मिळवण्याचे प्रतिक… तर थोरोंचे पाऊल निसर्गाच्या जवळ जाणारं .
आम्ही सगळे “डेज्”, दिवस हल्ली साजरे करतो. मग हा इतका महत्वाचा दिवस विसरून कसं चालेल?
लेख, पत्र, रोजनिशी, कविता, पुस्तक आदी विपुल लेखनातून प्रकट होणारी थोरो यांची जीवनलक्षी प्रेरणा म्हणजे आधुनिक युगाला लाभलेले वरदान आहे. त्यांना निसर्गवादी विचारवंत , काटकसरीचा पुरस्कार करणारे ‘मिनिमलिस्ट’ म्हणूनही ओळखले जातं. पण थोरो यांचे मोठेपण मला माणसाचा माणसासारखा विचार करणारा आणि सदैव माणूसपण जपणारा माणूस म्हणून जास्त भावतं. हा तुकाराम प्रणित ‘लाभाविण प्रीती’चा सद्गभावच थोरो यांना कृष्णवर्णिय लोकांना गुलामगिरीत लोटण्याच्या विरोधात लढायला प्रेरणादायी ठरला असावा. फार कमी लोकांना ठाऊक आहे की, विसाव्या शतकाचे महान प्रतिक मानले गेलेल्या महात्मा गांधी यांच्या सविनय कायदेभंग, अहिंसक क्रांती, शांततामय आंदोलन आणि साधं जगणं या सगळ्याची दिशा देणारा महामानव होता थोरो. आणि थोरो यांच्या जाणीवा समृद्ध करणारे दोन महापुरूष होते भगवान बुद्ध आणि श्री कृष्ण. भारतीय तत्वज्ञान अभ्यासलेल्या थोरो यांचा निसर्ग आणि माणूस हे एकमेकांसाठी बनलेले आहेत यावर दृढविश्वास होता. मनुष्य आणि निसर्ग एकमेकांशिवाय अपूर्ण राहतील अशी थोरोंची धारणा होती. निसर्गाशी जवळीक राखणारे समाजजीवनच खऱ्या अर्थाने सुखीसंपन्न असते. पैसे तुम्हाला कोणतंच सुख देवु शकत नाही तर, साधं आणि समाधानी जीवनाची समाजाला गरज आहे, हे थोरोने पावणे दोनशे वर्षांपूर्वी प्रगतीपथावर असणार्या, भौतिक सुखसोयीने परिपूर्ण होत असलेल्या अमेरिकन समाजाला सांगणं त्यांच्या दूरदृष्टीचे लक्षण आहे… अर्थात थोरो यांच्या या धाडसी विचारसरणीसाठी अरण्यावासाचा अनुभवच त्यांना नवीन दिशा देणारा ठरला होता…
रामायणातील राम-सीतेच्या वनवासाची कथा सर्वश्रृत आहे. नुकतंच लग्न झालेल्या राजपुत्राला चौदा वर्षे राज्याबाहेर काढणारी ती एक प्रकारची शिक्षाच होती. पण वनात, अरण्यात ज्ञानसाधना करण्यासाठी जाणे ॠषी, मुनी आणि बुद्ध, महावीरांसारख्या ज्ञानी तपस्वींसाठी आनंददायी होते. “तेणे सुखे रूचे, एकांताचा वास, नाही गुण दोष अंगा येत, वृक्ष वल्ली आम्हा सोयरी, वनचरी, पक्षीही सुस्वरे आळवीती “, या अभंग शब्दात निसर्ग प्रेम दर्शविणारा तुकाराम महाराजांचा मार्गही तोच… हेन्री डेव्हिड थोरो यांनाही तिच अरण्याची अनवट वाट खुणावत होती… याच मार्गाने गेल्यावर आपल्याला जीवनाचं अद्भुत दर्शन घडेल, हा थोरोंचा विश्वास या सबंध पुस्तकात जागोजागी प्रकाश पुंजक्यांच्या तेजोमय शब्दात पहायला मिळतो. आपले ह्रदय उजळून टाकण्याचे सामर्थ्य असणारा हा सारा शब्दसंभार मला थोरोंचा थोरपणा तर दाखवतोच, पण त्यांच्या फटकळ लिखाणात दडलेली अगदी तुकोबांच्या अभंगासारखी विश्वहिताची कोवळी कळकळ मन सुखावणारी आहे,
हे आवर्जून सांगितले पाहिजे.
४ जुलै १८४५ ते ६ सप्टेंबर १८४७ ह्या कालखंडात थोरो कंकाॅर्डजवळच्या वॉल्डन तळ्याच्या काठी एक झोपडी बांधून एकांतवासात राहिले. विख्यात कवी इमर्सन यांच्या मालकीच्या या जागेत दोन वर्षाहून अधिक काळ राहून ते निसर्गाच्या खुप जवळ गेले, पक्षी जसा आपलं घरटं बांधतो तशा पध्दतीने त्यांनी आपल्या हाताने आपलं घर बांधून तयार केलं . ह्या काळात त्यांना लाभलेल्या एकांतातून ते जीवनाचा विविधांगाने विचार करून लिहिते झाले. वॉल्डनकाठी लाभलेले हे विचारसंचित त्यांनी विलक्षण ताकदीने “वॉल्डन ऑर लाइफ इन द वूड्स” (१८५४) ह्या आपल्या पुस्तकात मांडले आहे. ह्या पुस्तकाचे मराठी भाषांतर “वॉल्डनकाठी विचार–विहार” ह्या नावाने दुर्गा भागवत ह्यांनी केले आहे . गद्य काव्य असणारे हे आधुनिक तत्वज्ञानाची मांडणी करणारे पुस्तक भाषांतर करणं महाकठीण काम होते. पण दुर्गाबाईंनी ते मोठ्या प्रेमाने केलेलं दिसतं. दुर्गाबाईंचे अवघं भाषाकौशल्य या पुस्तकात प्रतिबिंबित झालेले आहे. माझ्या जन्माआधी १९६५ साली प्रसिद्ध झालेले हे पुस्तक सध्या बाजारात उपलब्ध नाही. वाचनालयात दिसत नाही. मी स्वतः कितीतरी दिवस हे पुस्तक मिळावं यासाठी जीवाचा आटापिटा करीत होतो. गेल्या काही दिवसांत इंग्रजी वाचले, ऑडियोबुक ऐकले, पण समाधान होईना. मग चौकशी करताना येत्या दोन महिन्यात ते मॅजेस्टिक प्रकाशनाच्या माध्यमातून प्रसिद्ध होणार आहे, असे खुद्द अशोक कोठावळे यांनी जेव्हा सांगितले, शिवाय एखादी जुनी प्रत आहे का हे पाहतो असे आश्वस्त केलं तेव्हा थोडं बरं वाटलं होतं. तरीही हे पुस्तक पुन्हा मराठीतून, दुर्गाबाईंच्या शब्दात वाचण्याची उर्मी गप्प बसू देत नव्हती. मग ग्रंथ संग्राहक आणि अभ्यासक शशिकांत सावंत पासून नांदेडचे भगवंत क्षीरसागर सरांपर्यंत सगळ्यांची दारं ठोठावली…
आज अकस्मात सकाळी सकाळी मॅजेस्टिक प्रकाशनाकडून व्हाटसअप संदेश आला. “वॉल्डनकाठी विचार–विहार” हे पुस्तक उपलब्ध आहे. अगदी पहिली आवृतीची प्रत आहे…
मग काय, अक्षरशः दहा मिनीटात शिवाजी नाट्य मंदिरातील ग्रंथ दालनात पोहोचलो आणि फक्त सहा रूपयात लाख मोलाचे पुस्तक हातात घेतले…
डोळे भरून पाहिले, वाचून काढले.
जणू काही ते पुस्तक माझी प्रतिक्षा करत होते…
-महेश_म्हात्रे यांच्या फेसबुक वॉलवरून सााभार