Home Breaking News विहिरीत आढळला आईसह चिमुकल्याचा मृतदेह 

विहिरीत आढळला आईसह चिमुकल्याचा मृतदेह 

बुलडाणा, दि. १८ (प्रतिनिधी)
तालुक्यातील हतेडी खुर्द येथे गुरुवारी सकाळी एका विहिरीत सहावर्षीय चिमुकल्यासह आईचा मृतदेह आढळून आला. महिलेने मुलाला घेऊन आत्महत्या केली की त्यांच्यासोबत अपघात घडला, याचा अद्याप उलगडा झाला नाही. मायलेकाचा मृतदेह आढळून आल्याने हतेडी व पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.
रुपाली हरिदास चव्हाण (२७) व समर्थ हरिदास चव्हाण (वय ६ वर्षे) अशी मृत मायलेकाची नावे आहेत. रुपाली चव्हाण ही महिला समर्थला घेऊन १७ मार्च रोजी दुपारी शेतात गेली होती. रात्री उशिरापर्यंत दोघेही घरी परतले नाहीत म्हणून पती हरिदास व नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला. ते कुठेच आढळले नाहीत. अनुचित घटनेची शक्यता वर्तविल्याने दुसऱ्या दिवशी १८ मार्चला सकाळी त्यांच्या शेताशेजारील कावेरीबाई कन्हेर यांच्या शेतामधील विहिरीत गळ टाकून पाहिले असता दोघांचे मृतदेह गळाला लागले. या घटनेबाबत पोलीस पाटलांनी बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात माहिती दिली.
ठाणेदार सारंग नवलकार, पोलीस उपनिरीक्षक बबन रामपुरे, शकील खान व शेख राजीक हे घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करून मृतदेह विहिरीबाहेर काढून शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आले. रुपाली चव्हाणने मुलासह आत्महत्या केली, की ते विहिरीत पडून मृत्युमुखी पडले याविषयी अद्याप माहिती समजली नाही. घटनेचा अधिक तपास पीएसआय रामपुरे करीत आहेत. मृत रुपालीचे माहेर मेरा खुर्द आहे. घटनेची माहिती समजल्यानंतर माहेरची मंडळी गावात दाखल झाली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here