Home Breaking News लाइनमनने खांबावर चढवलेल्या ग्रा.पं. कर्मचाऱ्याचा तारांना चिकटून मृत्यू 

लाइनमनने खांबावर चढवलेल्या ग्रा.पं. कर्मचाऱ्याचा तारांना चिकटून मृत्यू 

 लाइनमनविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
सिंदखेड राजा, दि. १६ (प्रतिनिधी)
…………………………………………..
शेेेतातील मुुख्य वीज वाहिनीच्या खांबावर चढावयास लावून बिघाड शोधण्याचे काम करवून घ्यायला लावणाऱ्या लाइनमनच्या हलगर्जीपणामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा बळी गेला. अचानक वीजपुरवठा सुरू झाल्याने ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा तारांना चिकटून जागीच मृत्यू झाला. गाव शिवारात १६ मार्च रोजी सकाळी दहा वाजता ही दुर्दैवी घटना घडली. दरम्यान, घटना घडताच लाइनमन फरार झाला. तर लाइनमनविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह खांबावरून उतरवू देणार नसल्याचा आक्रमक पवित्रा संतप्त ग्रामस्थांनी घेतला. अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर तीन तासांनी मृतदेह खाली उतरविण्यात आला.
मलकापूर पांग्रा येथील विश्वंभर श्रावण मांजरे (५०) हे ग्रामपंचायतीमध्ये पाणीपुरवठा कर्मचारी म्हणून काम करतात. त्यांना विजेची सर्व कामे यायची. दुरुस्तीची कामे केली जात असल्याने गावकरी त्यांना डॉक्टर या टोपण नावाने हाक मारायचे. १५ मार्च रोजी सकाळी दहा वाजता वीजपुरवठा खंडित झाला. काय दोष झाला आहे, हे शोधून बिघाड दुरुस्ती करायचा असल्याने लाइनमन प्रशांत देशमुख यांनी विश्वंभर मांजरे यांना साखरखेर्डा रोडवरील खांबावर दुरुस्तीच्या कामासाठी नेले. लाइनमनला खांबावर चढता येत नसल्याने त्यांनी डॉक्टरला खांबावर चढवले. त्यासाठी वीजपुरवठा बंद करण्याचा सबस्टेशनमधून परवाना घेतल्याचे लाइनमने सांगितले. मात्र, खांबावर असतानाच अचानक वीजपुरवठा सुरू होऊन विश्वंभर मांजरे हे विद्युत तारांना  चिटकून जागीच मृत्युमुखी पडले. ही घटना घडताच लाइनमन प्रशांत देशमुख आणि त्याचा सहायक घटनास्थळाहून फरार झाले. या दुर्दैवी घटनेची माहिती समजताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच साखरखेर्डा पोलीस ठाण्याचे ठाणेदार जितेंद्र आडोळे आणि सहकारीही पोहोचले. मृतदेह खाली उतरविण्याचा प्रयत्न सुरू केला असता गावकऱ्यांनी विरोध दर्शविला. तसेच सरपंच भगवान उगले, अहमद यारखॉं पठाण, गुलशेरखॉं, बंडू उगले, राजू साळवे यांच्यासह गावकऱ्यांनी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. त्याचप्रमाणे मृताच्या नातेवाईकांसह लाइनमनला आमच्यासमोर हजर करा, अशी भूमिका घेतली. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह खाली उतरवू देणार नाही, असा पवित्रा घेण्यात आला. त्यामुळे ठाणेदार आडोळे यांनी आणखी पोलीस कुमक मागवली. पोलीस उपनिरीक्षक दीपक राणे, बीबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार लहू तावरे यांच्यासह अतिरिक्त पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. तब्बल तीन तासांनी महावितरण कंपनीचे अभियंता ए.एम. खान पोहोचले. दोषी लाइनमनला निलंबित करून मृताच्या नातेवाईकांना मदत करू, असे ठोस आश्वासन दिल्यानंतर तसेच लाइनमनविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविल्यानंतरच पोलिसांच्या मदतीने मृतदेह खाली उतरविण्यात आला.
घटनेच्या पार्श्वभूमिवर उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मृत विश्वंभर हे मनमिळावू स्वभावाचे होते. सर्वांना पाणी मिळेल असे नियोजन करून ते पाणी सोडायचे. त्यांच्या दुर्दैवी मृत्यूच्या घटनेने अख्खे गाव हळहळले.

तासभर रास्तारोको
घटनेची माहिती समजल्यानंतर भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विनोद वाघ हेदेखील घटनास्थळी पोहोचले. महावितरणच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून मृताच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी वाघ यांनी केली. त्याचप्रमाणे लाइनमनविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी तासभर रास्ता रोको आंदोलनही करण्यात आले.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here