Home शैक्षणिक स्वाध्याय उपक्रमात बुलडाणा जिल्हा राज्यात द्वितीय तर विभागात प्रथम

स्वाध्याय उपक्रमात बुलडाणा जिल्हा राज्यात द्वितीय तर विभागात प्रथम

 

बुलडाणा दि . ७ -राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांचे कडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता पहिली ते दहावीच्या मराठी इंग्रजी व उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वाध्याय उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे . या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासोबत जोडून ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे . स्वाध्याय उपक्रमाच्या सोळाव्या आठवड्यात बुलढाणा जिल्ह्यातून 101535 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला .93015 विद्यार्थ्यांनी स्वाध्याय सोडविले तर 88056 विद्यार्थ्यांनी ते पूर्ण केले . या उपक्रमाला मोठ्या संख्येने प्रतिसाद देत बुलडाणा जिल्ह्याने राज्यात दुसरा तर अमरावती विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे . या आठवड्यात जळगाव जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे .
कोरोनामुळे यावर्षी शैक्षणिक वर्ष धोक्यात आले आहे . राज्यातील विद्यार्थी मागे पडू नये, ते अभ्यासक्रमासोबत जोडून राहावेत यासाठी संपर्काचे व संवादाचे माध्यम म्हणून व्हाट्सअप वापरून सरावासाठी स्वाध्याय उपक्रम उपलब्ध करून देण्यात आला आहे .या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बुलडाणा समन्वयाची भूमिका पार पाडत आहे .
या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जि . प .बुलडाणा यांचे मार्गदर्शनात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांचे अध्यक्षतेखाली शिक्षणाधिकारी माध्यमिक, शिक्षणाधिकारी प्राथमिक,डाएट बुलडाणाचे सर्व अधिव्याख्याता ,विषय सहाय्यक -समुपदेशक, जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी ,केंद्रप्रमुख, साधनव्यक्ती, सर्व मुख्याध्यापक, शिक्षक यांची झूमद्वारे आढावा बैठक मागील आठवड्यात घेण्यात आली . त्या बैठकीचा सकारात्मक परिणाम म्हणून स्वाध्याय उपक्रमाच्या 16 व्या आठवड्यात बुलढाणा जिल्ह्याने राज्यातून द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे . याबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ .विजयकुमार शिंदे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक ) प्रकाश मुकुंद ,शिक्षणाधिकारी (प्राथमिक ) सचिन जगताप यांनी सर्वांचे कौतुक केले आहे .
पुढील काळात बुलढाणा जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी करत बुलडाणा जिल्हा राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ .विजयकुमार शिंदे यांनी केले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here