Home Breaking News शालेय पोषण आहार कामगारांवर उपासमारीची वेळ

शालेय पोषण आहार कामगारांवर उपासमारीची वेळ

 

जिल्हा प्रशासनाकडून कामगारांची थट्टा.

जिल्हा C.I.T.U. संघटना प्रचंड आंदोलनाच्या तयारीत.

बुलडाणा: मा.सर्वोच्च्य न्यायालयाच्या आदेशानुसार देशात ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी, विद्यार्थ्यांच्या मनात शाळेविषयी आवड निर्माण व्हावी आणि कुपोषण निर्मूलन अशा अनेक चांगल्या उद्देशाने इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार योजना सन २००३ पासून अंमलात आणली आणि आजतागायत सुरळीत चालू आहे.
परंतु मागील वर्षी आलेल्या कोरोना महामारी पासुन या योजनेअंतर्गत आलेल्या धान्याचे घरपोच वाटपाचे काम हे शालेय पोषण आहार कामगार नियमितपणे करीत आहेत.
त्याचा मोबदला पण त्यांना माहे ऑक्टोबर २०२० पर्यंत मिळाला आहे. परंतु नोव्हेंबर २०२० पासुन आजपर्यंत त्यांना मानधन मिळाले नाही, संबंधित अधिकार्यांची वेळोवेळी भेट घेतली असता काम नाही तर मानधन कसं मिळेल? असं बोलून एकप्रकारे कामगारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम हे अधिकारी करत आहेत.
सदर कामगार हे दररोज नियमितपणे शाळेत हजर राहून शाळा परिसर स्वच्छ करतात शिवाय शिक्षकांनी सांगितलेले इतर कामेसुद्धा करतात, सांगितले ले कामं केली नाहीत तर ते त्यांना कामावरून काढून टाकण्याची धमक्या सुद्धा शिक्षकांकडून देण्यात येतात. अशाप्रकारे आई भिक मागु देईना अण् बाप जेवु घालीना अशी शालेय पोषण आहार कामगारांची अवस्था झाली आहे.
मा. मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार लाॅकडाउन काळात कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही कामगारांचं मानधन रोखण्यात येवू नये असे आदेश असतानाही काही अधिकारी आपल्या अधिकाराचा गैर वापर करून शालेय पोषण आहार कामगारांवर अन्याय करत आहेत.
दुसरीकडे महाराष्ट्रातील इतर सर्व जिल्ह्यात शालेय पोषण आहार कामगारांना त्यांचं मानधन त्यांच्या खात्यावर जमा झाले आहे, आणि बुलढाणा जिल्ह्याचे अधिकारी हे उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ काढु धोरण अवलंबत आहेत.
अवघ्या १५०० रु.एवढ्या तुटपुंज्या मानधनावर हे कामगार गावच्या सगळ्या मुलांची डोळ्यात तेल घालून जबाबदारी सांभाळत असताना गलेलठ्ठ पगार घेणारे हे अधिकारी मात्र दडपशाहीचे धोरण अवलंबुन शालेय पोषण आहार कामगारांवर अन्याय करण्याचं काम करत आहेत.
जिल्हा C.I.T.U. च्या वतीने आवाहन करण्यात येते की, येत्या १० मार्च पर्यंत जिल्हा प्रशासनाने शालेय पोषण आहार कामगारांच्या खात्यात त्यांचं मानधन जमा झाले नाही तर जिल्हा C.I.T.U च्या वतीने कोरोना काळात सुद्धा जिल्हा परिषदेवर शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रचंड मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे,याची जिल्हा प्रशासनाने जाणीव ठेवावी आणि त्याला स्थानिक प्रशासन जबाबदार असेल,असे C.I.T.U. जिल्हाध्यक्ष– काॅ.पंजाबराव गायकवाड, उपाध्यक्षा — सौ.शोभा काळे. जिल्हासचिव — कॉ.समाधान राठोड. जिल्हा कोषाध्यक्ष कॉ.ज्ञानेश्वर वाघमारे यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here