Home जागर राज्यात 17 हजार अनाथ बालक, मुलांना मिळालं कुटुंब; सरकारने केली अनुदान वाढ

राज्यात 17 हजार अनाथ बालक, मुलांना मिळालं कुटुंब; सरकारने केली अनुदान वाढ

मुंबई, दि. 28 : अनाथ, निराश्रीत, बेघर किंवा अन्य कारणाने अडचणीमध्ये असलेल्या मुलांना संस्थांमधे ठेवण्याऐवजी कौटुंबिक वातावरणात ठेवावे यासाठी महिला व बालविकास विभागाकडून बाल संगोपन योजना राबविण्यात येते. या योजनेत पालकांना आणि संस्थांना देण्यात येणाऱ्या सहायक अनुदानात भरीव वाढ करण्याचा निर्णय घेतल्यामुळे अशा बालकांना कौटुंबिक वातावरणात ठेवण्यासाठी अधिक कुटुंबे पुढे येतील, अशी आशा महिला व बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली.

बाल संगोपन योजनेच्या सहायक अनुदानात वाढ करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. त्या अनुषंगाने प्रतिक्रिया देताना मंत्री ॲड. ठाकूर बोलत होत्या.

ॲड. ठाकूर म्हणाल्या, अनाथ, निराश्रीत, बेघर किंवा अन्य कारणाने अडचणीमध्ये असलेल्या मुलांमधील संवेदनशीलता वाढविण्याच्या आणि त्यांच्यात सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून त्यांना कुटुंबांमध्ये ठेवण्यासाठी बाल संगोपन योजना राबविण्यात येते. राज्यात सध्या अशी 17 हजार बालके, मुले कुटुंबात राहत आहेत. त्यांची देखभाल व्यवस्थित होत आहे यावर स्वयंसेवी संस्था, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी लक्ष ठेवतात.

वाढता खर्च लक्षात घेता या योजनेमध्ये भाग घेणाऱ्या पालक आणि अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांच्या सहायक अनुदानात वाढ करणे गरजेचे होते. त्यानुसार आज हा निर्णय घेण्यात आला असून, या योजनेंतर्गत संगोपन करणाऱ्या पालकांना प्रति बालक दरमहा देण्यात येणाऱ्या अनुदानामध्ये 425 रुपयांवरून 1 हजार 100 रुपये इतकी वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांना प्रति बालक 75 रुपयांवरून वरुन 125  रुपये एवढे अनुदान देण्याचा निर्णय झाला आहे. या योजनेसाठी आता 14 कोटी 57 लाख 40 हजार रुपयांचा अतिरिक्त निधी लागणार आहे. याआधी 9 कोटी खर्च होता तो आता 24 कोटी 45 लाख झाला आहे, असेही ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here