Home संपादकीय मुख्यमंत्री साहेब, हा आवाजही ऐका हो…..

मुख्यमंत्री साहेब, हा आवाजही ऐका हो…..

पुन्हा टाळेबंदी परवडणारी नाही

वर्‍हाडात काही काळाच्या विश्रांतीनंतर कोरोनाने पुन्हा मुसंडी मारली आहे. अमरावती, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यात बाधितांचे जे आकडे समोर येत आहेत त्यावरून लोक अचंबित आणि अर्थकारण प्रभावित झाले आहे. पोटाला चिमटा घेत ज्यांनी वर्षभर कोरोनाकाळ सहन केला त्यांच्या पोटात या नव्या उद्रेकामुळे गोळा उठला आहे.
विश्रांतीनंतरचा कोरोना उद्रेक हळूहळू राज्याच्या इतरही जिल्ह्याला आपल्या कवेत घेताना दिसत आहे. मुख्यमंत्र्यांना जनतेशी संवाद साधत संपूर्ण टाळेबंदीचे सूतोवाच करावे लागले आहे. यावरून कोरोनाच्या संभाव्य संकटाची कल्पना येते. गेल्या आठ दिवसांपासून जे आकडे झपाट्याने वाढत आहेत त्यात नव्या प्रकाराचे किती रुग्ण आहेत यावर अजून आरोग्य यंत्रणा स्पष्ट बोलायला तयार नाही. नवा स्टेन नसल्याची काही मोघम वक्तव्ये समोर येत असली तरी अधिकृत घोषणा सरकार पातळीवर अद्याप झालेली नाही.
कोरोनातून बरे झाल्यावर दुसर्‍यांदा कोरोनाने पछाडल्याची असंख्य उदाहरणे घडत आहेत तर काहींना लस टोसून घेतल्यावर सुद्धा कोरोना लक्षण आढळून आल्याने सामान्य माणूस कमालीचा विचलित झाला आहे. घराबाहेर राहूनच ज्यांचे व्यवहार आहेत असा मोठा वर्ग या परिस्थितीने आतून हादरून गेला आहे. मुख्यमंत्री केवळ जनतेला उपदेशाचे डोसावर डोस पाजत आहेत. कोरोना ही माझी जबाबदारी असल्याचे जनतेला पटवून सांगत मोदींच्या पावलावर पाऊल टाकत जनतेलाच कोरड्या आत्मनिर्भरतेचे धडे देणे सुरू आहे. वर्षभराचा वाईट अनुभव गाठीशी असतानाही कोरोना हेडवर आरोग्य खात्याला एक रुपया बजेट मिळाले नसल्याची तक्रार माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. यात तथ्य असेल तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात राज्यातला सामान्य माणूस सुरक्षित आहे असे म्हणण्याचे धाडस कसे करावे हा मोठा प्रश्न आहे.
सणासुदीच्या, गौरी, गणपतीच्या काळात कोरोना जणू नेस्तनाबूत झाला असे समजून लोक वागले असतील तर सरकारी यंत्रणा तरी कुठे भानावर होती? सत्ताधारी पक्षांनी तर पार कंबरेचे सोडून डोळ्याला गुंडाळले होते. याच काळात निवडणुका, राजकीय मेळे आणि नेत्यांच्या संवाद कार्यक्रमाला ओसंडून गर्दी होईल याचे नियोजन सरकारच्या बाजूने झाले असेल तर सुप्तावस्थेत असलेल्या कोरोनाला वातावरणाचे बळ कुणी दिले? आरोग्य यंत्रणा सुस्तावल्या, तपासणी, उपचार यांच्यात शिथिलता आणण्याचे काम झाले. मंत्रालयामधील कोरोनाची ‘वॉर रूम’ या काळात कुणी बंद केली.
महाराष्ट्र आता कोरोनातून बाहेर आल्याचा आभास ज्यांनी निर्माण केला, त्यांची खरंतर झाडाझडती घेण्याची गरज असताना ठाकरे जनतेवरच ‘माझी जबाबदारी’ सक्तीची करत असतील तर राज्यातल्या 12 कोटी जनतेचे पालक म्हणून तुम्ही काय केले? हा प्रश्न निर्माण होतोच. ज्या धारावी आणि मालेगावची उदाहरणे आजवर मिरवली गेली त्यांची आजची काय स्थिती आहे? याचीही लोकांना माहिती घ्यायला हवी, मात्र यंत्रणा काहीतरी दडविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
सरकारी दवाखान्यात कोरोनाच्या उपचारासाठी दाखल होणार्‍या रुग्णांना तात्पुरत्या गोळ्या देऊन त्यांची बोळवण करणे हा राज्यातला सामूहिक उपचार झाला आहे. कोरोनाला एवढे गंभीर घेऊ नका, अशा सूचना आरोग्य संचालनालय जर जिल्ह्यांना देत असेल तर खालच्या यंत्रणा तशाच वागणार आहेत.
समूहांना कायद्याचा धाक दाखवून आवश्यक तेव्हा बडगा उगारून वठणीवर आणायचे सोडून लग्न, समारंभावरील निर्बंध उठविण्याची या सरकारला झालेली घाई आता सामान्य माणसाच्या जिवावर उठली आहे. वाढणार्‍या आकड्यांना लोकही तेवढेच जबाबदार असले तरी लोक आर्थिक नाड्या आवळल्याने कंटाळले आहेत. जिवावर उदार झालेत. अशावेळी पुन्हा टाळेबंदीचे संकट त्यांच्यावर घोंगावत असेल तर हातावर पोट असणारा माणूस उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. टाळेबंदीचा जीवघेणा मार्ग वगळून नियंत्रणाचे वेगळे मार्ग तपासून कोरोना साखळी तोडण्याचा प्रयत्न आता व्हायला हवा.

-पुरुषोत्तम आवारे पाटील

संपादक
दै.अजिंक्य भारत,अकोला

( लेखक हे  महाराष्ट्रातील स्वतंत्र दैनिक अजिंक्य भारतचे संपादक आहेत)

मो: 9892162248

———————–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here