Home कृषि वार्ता बीटी बियाणे उत्पादक कंपनीच्या तांत्रिक  चौकशीची गरज

बीटी बियाणे उत्पादक कंपनीच्या तांत्रिक  चौकशीची गरज

संग्रामपूर (ता.प्र.):  कपाशीचे देशी वाणा ऐवजी सुधारित तंत्रज्ञानाच्या नावाखाली बीटी बियाण्याची लागवड करण्यास शेतकर्‍यांना भाग पाडले जात आहे. मात्र कपाशीवरील बोंडअळीचा वाढता प्रकोप पाहता उत्पादनात घट होऊन शेतकरी देशोधडीला लागत आहे. त्यामुळे बीटी बियाणे उत्पादक कंपनीच्या तांत्रिक  चौकशीची गरज निर्माण झाली आहे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगाव जामोद विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष तथा शेती तज्ञ विश्वनाथ झाडोकार यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तथा माजी केंद्रीय कृषि मंत्री शरदचंद्र पवार यांना एका निवेदनाव्दारे केली आहे.
शेतकरी पूर्वीपासून कपाशीच्या देशी वाणाची लागवड करून एकरी 7-8 क्विंटल उत्पादन घेत आला आहे. परंतु बीटी बियाण्यांची लागवड केल्यास भरघोस उत्पादन होईल असे भासवून शेतकर्‍यांची फसवणूक केली जात आहे. मात्र सुधारित तंत्रज्ञानाच्या बिटी बियाण्याची लागवड केल्यास बोंडअळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होऊन उत्पादन घटले आहे. बीटी कपाशी लागवडीपासून ते उत्पादनापर्यंत वारेमाप खर्च करावा लागत आहे, शेवटी मात्र एकरी 2 क्विंटल उत्पादन होत असल्याने शेतकर्‍यांच्या पदरी निराशा पडत आहे. बिटी बियाणे व किटकनाशक उत्पादक कंपन्या आणि त्यांचे विके्रते जणूकाही शेतकर्‍यांना लुटण्यासाठी टपून बसलेले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांची या दुष्टचक्रातून सुटका करून त्यांना दिलासा देण्यासाठी बिटी बियाणे उत्पादक कंपन्यांची तांत्रिक चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विश्वनाथ झाडोकार यांनी निवेदनात केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here