Home Breaking News अमरावती, यवतमाळ, अकोल्यात हे कडक निर्बंध

अमरावती, यवतमाळ, अकोल्यात हे कडक निर्बंध

अकोला : राज्यातील अमरावती, यवतमाळ, अकोला या जिल्ह्यांमध्ये करोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. या जिल्ह्यातील ज्या भागात रुग्ण संख्या जास्त आढळून येत आहे, तेथे कंटेनमेंट झोन जाहीर करुन तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्य सचिव संजय कुमार यांनी आज(गुरुवार) या तीन जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

अमरावती जिल्ह्यातील अचलपुर तालुका, अमरावती महापालिका क्षेत्र, यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ, पुसद आणि पांढरकवढा नगरपरिषद क्षेत्र आणि अकोला जिल्ह्यातील अकोट व मुर्तीजापूर तालुका आणि अकोला महापालिका क्षेत्र या भागामध्ये करोनाचे रुग्ण सर्वाधिक आढळून येत आहेत. या भागातील संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हे सर्व क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करुन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे मुख्य सचिवांनी निर्देश दिले आहेत.

अकोला जिल्ह्याचा करोना रुग्ण संख्येचा दैनंदिन पॉझिटिव्ह दर हा ३२ टक्के असून, आठवड्याचा पॉझिटिव्ह दर २४ टक्के आहे. अमरावती जिल्ह्याचा दैनंदिन पॉझिटिव्ह दर ४८ टक्के असून आठवड्याचा ३५ टक्के आहे. तर यवतमाळ जिल्ह्याचा दैनंदिन आणि आठवड्याचा पॉझिटिव्ह दर १५ टक्के आहे. संपूर्ण राज्याचा दैनंदिन पॉझिटिव्ह दर हा ८.८ टक्के असून आठवड्याचा पॉझिटिव्ह दर ७.७६ टक्के एवढा आहे.
राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी नुकतीच सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस प्रशासन यांची आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत घेण्यात आलेल्या विविध निर्णय तसेच उपाययोजनांबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदिप व्यास यांनी पत्राद्वारे कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here