Home Breaking News राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिल्याचं वृत्त?

राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिल्याचं वृत्त?

मुंबई/ वृत्तसंस्था

बीड जिल्ह्यातील परळी येथील पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नाव आलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिल्याचं वृत्त टीव्ही ९ या वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे. राठोड यांनी मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर राजीनामा पाठवल्याचंही वृत्तात सांगण्यात आलं आहे. राठोड यांच्या राजीनाम्याच्या वृत्तावर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी भूमिका मांडली आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर भाजपाने संजय राठोड यांचं नाव घेत कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली होती. दरम्यान, या प्रकरणात राठोड यांनी राजीनामा दिल्याचं वृत्त आहे. मातोश्रीवर राजीनामा पाठवला असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

दरम्यान, यासंदर्भात शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना या मुद्द्यावर मौन सोडलं.राऊत म्हणाले, “हा विषय सरकारचा आहे आणि सरकारचे प्रमुख लोक त्यासंबंधात त्यांचं मत व्यक्त करतील किंवा निर्णय घेतील. तसेच संजय राठोड हे शिवसेनेचे प्रमुख मंत्री आहेत. शिवसेनेचा चेहरा आहेत. त्यांच्यावर जे आरोप केले जात आहेत, त्याप्रकरणी पोलीस तपासाचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यासंबंधीची माहिती मुख्यमंत्री घेतील,” असं राऊत म्हणाले. पत्रकारांनी राऊत यांना राठोड यांच्या राजीनाम्याविषयी विचारले. त्यावर राऊत म्हणाले, “राजीनामा दिला की नाही, हे मला माहिती नाही. तुम्हाला याची जास्त माहिती असेल,” असं म्हणत राऊत यांनी प्रश्नाला थेट उत्तर देणं टाळलं.

राठोड कुठे आहेत?

बीड जिल्ह्यातील परळी येथील २२ वर्षाच्या पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यात तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. पुण्यातील हडपसर भागातील महमंदवाडी परिसरातील हेवन पार्कमध्ये ही घटना घडली होती. पूजाच्या आत्महत्येची चर्चा सुरू झाल्यानंतर राठोड यांचं नाव या प्रकरणात समोर आलं होतं. भाजपाकडून त्यांचं नाव घेऊन कारवाई करण्याची मागणी केली गेली होती. या प्रकरणात नाव आल्यापासून राठोड अज्ञातस्थळी आहेत. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here