या कंपनीच्या नावाने फसवणूक झाली असल्यास कागदपत्रे सादर करावी
आर्थिक गुन्हे शाखेचे आवाहन
बुलडाणा, :दि. 15 : शहर पोलिस स्टेशन येथे दि. 27 ऑक्टोबर 2020 रोजी फिर्यादी मो. साजीद अबुल हसन देशमुख वय 34 वर्षे रा. इकबाल नगर, टिपू सुलतान चौक, बुलडाणा यांनी फिर्याद दिली नोंदवली आहे. फिर्यादीमध्ये रिदाज इंडीया प्रॉपर्टीज कंपनी बेंगलोर, शाखा औरंगाबाद या कंपनीने औरंगाबाद टाईम्स व एशिया एक्सप्रेस वर्तमानपत्रात जाहीरात दिली की 50 हजार रुपये सदर कंपनीमध्ये गुंतवणुक केल्यास प्रत्येक महीन्याला 2650 ते 3125 रुपये नफ्यापोटी परतावा मिळणार. तसेच मुळ रक्कम परत पाहीजे असल्यास 40 दिवसात रक्कम परत मिळेल व औरंगाबाद जिल्ह्यामध्ये रोड टच प्लॉट पाहीजे असल्यास स्वस्त दरात मिळेल, अशी जाहीरात दिली. फिर्यादी व इतर नातेवाईक यांनी जाहीरातीवरून एकुण 11,50,000 रुपये सदर कंपनीमध्ये गुंतवणुक केली आहे.
सदर कंपनीने काही महीने परताव्या पोटी फिर्यादी व इतर गुंतवणुकदार यांच्या बँक खात्यात काही रक्कम जमा केली. परंतु नंतर जाहीराती प्रमाणे रक्कम जमा न करता रिदास इंडिया प्रॉपर्टीज कंपनीने डायरेक्टर आरोपी अयुब हुसेन व अनिस आयमन रा. बेंगलोर यांनी फिर्यादी व इतर गुंतवणुकदार यांचा विश्वासघात करुन फसवणूक केली आहे. या रिपोर्टवरून बुलडाणा शहर पोलिस स्टेशन मध्ये अपराध क्रमांक 778/2020 कलम 409,406,420,34 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अधिक्षक अरविंद चावरिया यांचे आदेश व मार्गदर्शनरप्रमाणे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांचे नेतृत्वात पो. उप. नि. कैलास राहणे, पो. हे. कॉ. राजेंदसिह मोरे, अविनाश जाधव, रामेश्वर मुंडे करीत आहे.
तसेच या बाबत रिदास इंडिया प्रॉपर्टीस औरंगाबाद या नावाने गुंतवणूकदारांना जास्त नफ्याचे आमिष दाखवून कोणाची फसवणुक झालेली असल्यास अशा व्यक्तींनी त्यांचेकडे उपलब्ध असलेली रिदास इंडिया प्रॉपर्टीस कंपनी शाखा औरंगाबादच्या आर्थिक गुन्हे शाखा, पोलीस अधिक्षक कार्यालय, बुलडाणा येथे कागदपत्रांसह संपर्क साधावा, असे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, पोलीस उप-निरीक्षक कैलास रहाणे, यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.