Home Breaking News सरकारी दवाखान्यात महिन्याला ‘इतक्या’रूग्णांचे सिटीस्कॅन

सरकारी दवाखान्यात महिन्याला ‘इतक्या’रूग्णांचे सिटीस्कॅन

सामान्य रूग्णालयातील सिटीस्कॅन युनिट रूग्णांसाठी ठरत आहे लाभदायी

खामगाव- स्थानिक सामान्य रूग्णालयात अद्यावत सिटी स्कॅन युनिटचा शुभारंभ 14 ऑक्टोंबर 2020 रोजी करण्यात आला. आतापर्यंत साडेतीन महिन्याच्या कालावधीत सुमारे 1000 रूग्णांचे सिटीस्कॅन करण्यात आले असून जवळपास महिन्याला सरासरी 300 रूग्णांचे सिटीस्कॅन होत आहे
बुलढाणा जिल्ह्यातील घाटाखालील खामगावसह शेगाव, संग्रामपूर, जळगाव जामोद, नांदुरा व मलकापूर या 6 तालुक्यातील गरजू रूग्णांना उत्कृष्ट आरोग्य सेवा देणार्‍या स्थानिक सामान्य रूग्णालयाचा प्रजासत्ताक दिनी प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला आहे. रूग्णालयातील इतर रूग्णसेवा विभागासोबतच स्वतंत्र सिटी स्कॅन युनिट गरजू रूग्णांसाठी लाभदायी ठरत आहे. यामध्ये अत्याधुनिक 16 स्लाईस ची मशिन लावण्यात आली आहे. या मशिनव्दारे डोके, छाती, पोट व हातापायाच्या सांध्यांचे थ्रीडी सिटी स्कॅन केल्या जाते. या मशिनचे वैशिष्ट्य म्हणजे शरीराच्या ज्या भागाचे सिटीस्कॅन करायचे असेल त्याचे 16 भागात (स्लाईस) विश्लेषण केले जाते. दरम्यान काळात रूग्णांमधील कोविडचे प्रमाण तपासण्यासाठी सुध्दा या मशिनचा उपयोग झाला आहे. तर सिटी स्कॅन मशिनमुळे रूग्णाचे वेळीच निदान होेऊन त्वरित शस्त्रक्रिया करता आल्याने अनेक रूग्णांचे प्राण वाचले आहे. सदर युनिटचा कार्यभार रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस.बी. वानखडे व निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश टापरे यांच्या मार्गदर्शनाखाली रेडिओलॉजिस्ट डॉ. ज्ञानेश्वर वायाळ पाहत असून सदर युनिट दररोज सकाळी 10 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सुरू असते. विशेष म्हणजे दारिद्य्र रेषेखालील रूग्णांची मोफत तपासणी करण्यात येत असून इतर रूग्णांना शासकीय नियमानुसार शुल्क आकारून त्याची रितसर पावती देण्यात येते. त्यामुळे सिटीस्कॅनची गरज असणार्‍या रूग्णांसाठी सामान्य रूग्णालयातील सिटी स्कॅन युनिट लाभदायी ठरत असल्याचे दिसून येत आहे.

खाजगी रूग्णालयातील रूग्णांना सुध्दा मिळते सेवा
खाजगी रूग्णालयात भरती असलेल्या रूग्णाची सिटीस्कॅन करण्याची आवश्यकता असल्यास सामान्य रूग्णालयात सिटी स्कॅन करता येते. त्यासाठी दारिद्य्र रेषेखालील रूग्णांचे निशुल्क तर इतर रूग्णांचे शासकीय नियमानुसार शुल्क भरून सिटी स्कॅन करता येते. यामध्ये गरजू रूग्णांचा बराच आर्थिक लाभ होतो. त्यामुळे गरजू रूग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश टापरे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here