मार्केट यार्डातील लिलावात हमीभावापेक्षा जास्त दराने होत आहेत खरेदी विक्रीचे व्यवहार
शेतकऱ्यांनी आपला शेतमाल बाहेर विक्री न करता मार्केट यार्डातच विक्रीसाठी आणण्याचे सहकारनेते पांडुरंगदादा पाटील यांचे आवाहन
शेगांव – येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये तूर या शेतमालाची प्रचंड आवक सुरू असून गुरुवार दि ०४ फेब्रुवारी रोजी तुरीला जाहीर लिलावात रु ६७००/- भाव मिळाला आहे. यामुळे शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण असून शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत. केंद्र शासनाकडून तुरीला रु ६०००/- हमीभाव जाहीर करण्यात आला आहे माञ शासनाचे हमीभावापेक्षा जास्त दराने शेतकऱ्यांना मार्केट यार्डातील जाहीर लिलावात आपल्या शेतमालाला जास्त बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी मार्केट यार्डातच आपला माल विक्री करण्यासाठी पसंती देत आहेत. शेगांव बाजार समितीत दैनंदिन १००० क्विंटल चे वर तूर या शेतमालाची आवक होत असून शेतकरी बांधवानी आपला शेतमाल बाहेर विक्री न करता मार्केट यार्डातच जाहीर लिलावात विक्रीसाठी आणावा असे आवाहन सहकारनेते पांडुरंगदादा पाटील, बाजार समितीचे सभापती श्रीधर पाटील उन्हाळे व सचिव विलास पुंडकर यांनी शेतकऱ्यांना केले आहे.