Home Breaking News वाशिममध्ये घडला ‘हा’ इतिहास; महाराष्ट्रासमोर ठेवला आदर्श

वाशिममध्ये घडला ‘हा’ इतिहास; महाराष्ट्रासमोर ठेवला आदर्श

*वाशिमचा आदर्श*
*महाराष्ट्राने घ्यावा* !

-पुरुषोत्तम आवारे पाटील

पोटाला चिंध्या बांधून ज्याला वाढविले , ज्याच्या शिक्षणावर एकवेळ उपाशी राहून खर्च केला तोच मुलगा पुढे पायावर उभा राहताच पहिली लाथ आई – वडिलांच्या कंबरड्यात घालत असेल तर माता – पित्यांना हे दुःख मरणाहून सुद्धा वेदनादायी असते . असे भयंकर दुःख देणारी मुले जर शासकीय कर्मचारी असतील तर शरमेने आपली मान आपोआप झुकते एवढे हे विदारक वास्तव सभोवताल बघायला मिळते . वाशिम या छोट्याशा जिल्ह्यात पंचायत समिती सभापती रेश्मा गायकवाड यांनी नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद सभेत या संदर्भातला एक क्रांतीकारी ठराव मांडला आणि त्यांनी याबाबतचे अनुभव कथन केल्यावर सभागृहाने तो एकमताने संमत केला . त्यानुसार आता जिल्हा परिषद , पंचायत समितीचे जे कर्मचारी आई – वडिलांचा सांभाळ करणार नाहीत , त्यांच्या पगारातून ३० टक्के हिस्सा कापला जाणार असून , तो थेट असहाय आई – वडिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे . वृद्ध आई – वडिलांचा सांभाळ हा समाजात मोठ्या चिंतेचा विषय बनला आहे . शहरात जगण्याचा स्वैराचार कायम राहावा यासाठी वृद्धाश्रमात अशा आई – वडिलांची रवानगी करण्याचा प्रघात वाढला असताना ग्रामीण भागातील संयुक्त कुटुंबानाही वाळवी लागायला सुरुवात झाली आहे . मुलगा नोकरीला लागताच त्याच्यासाठी स्थळे शोधली जातात आणि वधू पाहणी करताना आम्ही दोघे राजाराणी ‘ या स्वप्नात असलेल्या ९ ० टक्के तरुणींकडून काही महिन्यातच त्यांचे स्वतंत्र बिऱ्हाड थाटले जाते . आई – वडील जुन्या घरात आधार शोधत , खितपत पडतात आणि नववधू नोकरीतल्या नवऱ्याला नव्या फ्लॅटमध्ये अलगद घेऊन जाते . काही महिने हा लाडोबा आई – वडिलांकडे लक्ष देतो . नंतर पैसे पाठवतो . कालांतराने ही रसदही सरकारी मदतीसारखी सुरू होते . *राजा – राणींच्या पार्ट्या वाढतात आणि जन्मदात्यांना उपास घडायला लागतात . मुलाचे करिअर घडवताना पित्याने खाल्लेल्या खस्ता , पित्याला मधुमेह , हृदयविकार , दमा अशा विविध व्याधी भेट देतात . ज्या काळात आई – वडिलांची काळजी घ्यायला हवी नेमके त्याच काळात सासू – सासऱ्याची कथित चिडचिड ही नेहमीची कारणे फुगवून राजा – राणी स्वतःचे ‘ वन – बिएचके ‘ संस्थान उभे करतात* .
गेल्या काही वर्षात या चिंतेने ग्रामीण भागालाही पोखरले आहे . शाळा मास्तर असो वा आरोग्य केंद्रातला कर्मचारी त्यांच्याकडून असेच वर्तन घडताना सभापती रेश्मा गायकवाड व्यथित झाल्यात हे महत्त्वाचे आहे . असला दुर्मिळ अनुभव त्यांना यावा या अनुभवाने ही महिला चिंतित व्हावी आणि तिने त्यावरचा तोडगा काढावा हे परिवर्तनाच्या दिशेने पडलेले एक दमदार पाऊल म्हटले पाहिजे . *वाशिम जिल्ह्यात आजवर शेकडो महिला सभापती झाल्या असतील . खुद्द जिल्हा परिषदेच्या विविध पदांवर आणि प्रशासनातही महिला असतील मात्र जी सल रेश्मा गायकवाड यांना सतत बोचत होती , त्याने त्या अस्वस्थ झाल्या . अशी अस्वस्थता विविध पदांवर काम करणाऱ्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला सतत जाणवायला हवी . आई – वडिलांचा सांभाळ वा अवहेलना हा खरंतर कुटुंब वर्तन किंवा संस्काराचा विषय आहे , मात्र या संकेतांचे उल्लंघन झाल्यावर त्यासाठी नियम , कायदे यांचा आधार घ्यावा लागतो . कुटुंबातला जिव्हाळा कोणत्याही कारणांनी का होईना आटायला लागला की कौटुंबिक प्रश्न वाढायला लागतात . त्याकडे दीर्घकाळ दुर्लक्ष झाले की असे प्रश्न हाताबाहेर जातात . या हाताबाहेर जाणाऱ्या प्रश्नाकडे रेश्मा गायकवाड यांना लक्ष द्यावेसे वाटणे हाच मुळात आजच्या लोकशाही व्यवस्थेचा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचाही सन्मान आहे.विकासकामे , रस्ते , वीज , लाभार्थी निवड ही कामे तर सदस्य , सभापतींच्या पाचवीलाच पुजलेली असतात . त्यातून थोडेसे बाहेर डोकावून सामाजिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करीत स्वतःच्या लोकप्रतिनिधी असल्याचे समाजऋण या स्त्रीने फेडण्याचा जो प्रयत्न केला आहे त्याला सामाजिक सुधारणांच्या इतिहासात यापुढे मानाचे स्थान असेल याबद्दल आमच्या मनात संशय नाही . *वाशिम पंचायत समितीने , जिल्हा परिषदेने घेतलेला हा आदर्श निर्णय आता राज्यभर राबवला पाहिजे , त्यासाठी सामाजिक न्याय खाते आणि ग्रामविकास खात्याने वाशिमच्या या सभापती भगिनीला मंत्रालयात विशेष निमंत्रित करून वाशिमचा आदर्श राज्यात लागू केला पाहिजे असे वाटते* .

*पुरुषोत्तम आवारे पाटील*
संपादक दै.अजिंक्य भारत
संवाद : 9892162248
———–
*आमचा ई पेपर*
www.ajinkyabharat.in

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here