सुप्रसिद्ध जेष्ठ गझलकार इलाही जमादार यांचं वृद्धपकाळ आणि आजारामुळे मुळे वयाच्या ७५ व्या वर्षी दवाखान्यात दुःखद निधन झालं हे ऐकून खूप दुःख झालं. इलाहीचा शेवटचा काळ खूप वाईट गेला. न संपणारं आजारपण….काळजी घ्यायला कुणी नाही….मनाला सुन्न करणारं एकटंपण यामुळे इलाही खूप व्यथित झाले होते. त्यांना शेवटच्या काळात वृद्धाश्रमात रहावं लागलं होतं. इलाहींना प्रसिद्धी खूप मिळाली……त्यांचा मित्रपरीवार खूप मौठा होता पण…..शेवटी वैयक्तिक जीवनात माणूस एकटाच असतो हेच खरे! सुरेश भटानंतर मराठी गझल संपते की काय असं वाटत असतांनाच इलाही जमादार नावाचा दमदार गझलकार मराठी गझलेला लाभला. १९७४ साली प्रतिभावंत गझलकाराचा शोध घेतांना इलाही जमादार नावाचा हिरा भीमराव दादा पांचाळेंना गवसला. ” अंदाज आरशाचा वाटे खरा असावा…..बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा” ही गझल ऐकून पु. ल. देशपांडे सुध्दा प्रभावित झाल्याशिवाय राहिले नाही. ” स्वप्ने मलूल माझी आली भरात साकी…..आता कुठे नशा ही आली वयात साकी” इलाहीची फारशी माहीत नसलेली ही गझल मला खूप आवडते. काचेमागील पारा उडून गेल्यावर आरसा निरूपयोगी ठरतो अशा आशयाचा एक शेर गझलेत आहे तो खूप सुंदर आहे. ” दारावरून त्यांच्या, गेली वरात माझी” ….असो की जखमा कशा सुगंधी, झाल्यात काळजाला” ही गझल असो मनाला स्पर्शून गेल्याशिवाय राहत नाही! इलाही साध्यासरळ सहज कळणा-या भाषेत लिहायचे. पण आशय खूप मोठा असायचा. कल्पनाशक्ती अफाट होती. त्यांना जे सुचायचं ते अफलातुन आणि जबरदस्त असायचं. त्यामुळेच इलाही खूप लोकप्रिय झाले. साहित्यिक आणि कलाकार लोकांचं जीवन विचित्र घटनांनी आणि घडामोडींनी भरलेलं असतं. बहुतेकांच्या आयुष्यात कुठलीतरी भळभळणारी जखम वाहत असते. इलाही त्याला अपवाद नव्हते. ” अल्ला उनको जन्नतमे सब खुशियाँ और आला जगह प्रदान करे” इसी कामनाओंके साथ विराम लेता हूँ।
श्रीनिवास गेडाम गझलकार…. रामनगर गडचिरोली
9834773245