सव्वा लाख बालकांना ‘दो बुंद जिदंगी
बुलडाणा : पोलिओच्या आजाराचे उच्चाटन करण्यासाठी पाच वर्षापर्यंतच्या बालकांना पोलिओचे मोफत डोस आज, रविवारी दिले जात आहेत. दुपारी ०१. ३० पर्यंत जवळपास सव्वा लाख बालकांना डोस दिल्या गेल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र सांगळे यांनी दिली.
जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांच्या हस्ते ५ वर्षापर्यंतच्या बालकांना पोलिओचे डोस देऊन मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. जिल्ह्याला अडीच लाख डोसचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी २१३९ बुथवरून सव्वा लाख डोस आता पर्यंत देण्यात आले. जागतिक आरोग्य संघटनेने १९९८ सालापासून ‘पल्स पोलिओ’ची मोहीम सुरू केली. दरवर्षी जानेवारी व फेब्रुवारीत ‘पोलिओ रविवार’ साजरे केले गेले. लोकांच्या घरोघर जाऊन ‘पोलिओ रविवार’च्या नंतरच्या आठवड्यात ५ वर्षांखालील मुलांना पोलिओ डोस पाजले गेले. अमिताभ बच्चन, महम्मद कैफ इत्यादी व्यक्तींना हाताशी धरून दूरचित्रवाणीच्या माध्यमातून लोकांना भावनिक आवाहन केले गेले आणि लोकजागृती सुरू ठेवली.