Home विदर्भ नौकाविहार करायचा, वाघोबाला पाहायचे, खामगावलाच एक सुंदर पिकनिक डेस्टिनेशन!!

नौकाविहार करायचा, वाघोबाला पाहायचे, खामगावलाच एक सुंदर पिकनिक डेस्टिनेशन!!

खामगाव : आपणास पशु, पक्षी व प्राणी हे आवडतात. तसे ते सर्वांनाच आवडतात. पशु पक्ष्यांना पाहण्याची उत्सुकता प्रत्येकालाच असते. काहीतर त्या करता फार दूर दूर भटकंती देखील करतात. काहींचा हा छंद असतो. काही तर जसा वेळ मिळेल त्या प्रमाणे गावाजवळील जंगलात फिरायला जातात.

बुलडाणा जिल्ह्याला लाभलेल्या समृद्ध वनसंपदेमध्ये बोथा लगत ज्ञानगंगा अभयारण्य आहे. करोना चे सावट जरा कमी होऊ पाहत असताना जंगल सफारीचा आनंद घेण्यासाठी ज्ञानगंगा अभयारण्यात पर्यटकांचा ओढा वाढला आहे. शनिवार,रविवार असा विकेंड आणि सुट्टीच्या दिवशी अगदी हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळतोय. नौकाविहार करायचा, वाघोबाला पाहायचे मग खामगावच्या “ज्ञानगंगा” अभयारण्य फिरायला येथे तुम्हाला जिप्सीचा सुद्धा आनंद घेता येईल.

जिल्हामध्ये सन १९९७ मध्ये निर्माण करण्यात आलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात ३० नोव्हेंबर २०१९ रोजी सी – वन – टी – वन या पट्टेदार वाघाचे आगमन झाले होते. मध्ये हा वाघोबा अजिंठा सफारी वरून परतला आणि तेव्हापासून याच ज्ञानगंगा अभयारण्याच्या क्षेत्रात वास्तव्याला आहे. अलीकडे देव्हारी बिट येथे अचानकपणे रानगवा निदर्शनास आला आहे. तसेच योगायोग म्हणजे वाघाच्या आगमना नंतर बरोबर एका वर्षात या परिसरात रानगवा आढळून आल्याने ज्ञानगंगा अभयारण्यात पुन्हा नवीन पाहुण्यांचे पर्यटकांना दर्शन होत आहे.
जिल्ह्यासाठी आनंदाची वन्यप्रेमीसाठी सुखद करणारी ही बाब आहे. यावर्षी जिल्ह्यात भरपुर प्रमाणात पाऊस पडला असून वन्यजीव परिक्षेत्राअंर्गत असलेल्या संपूर्ण बिटांचे काळजीपुर्वक काटेकोरपणे संरक्षण केल्‍यामुळे फार मोठया प्रमाणात गवत वाढले आहे. गवताची उंची सुमारे ९ ते १० फुट असल्यामुळे वन्यप्राण्यांना संचार करणसाठी पुरेपुर वाव आहे. जंगल सफरचा आनंदी योग पर्यटकांसाठी घडवून आणण्यासाठी वन विभाग पुढाकार घेत आहे. अभयारण्यात पूर्वी १० जिप्सी वाहनांतून पर्यटन केले जायचे. आता वन्यजीव विभागाच्या ताफ्यात आणखी तीन वाहने दाखल झाल्याने आता १३ जिप्सी वाहनांमधून पर्यटन वाढीला चालना मिळत आहे.
वन व वन्यजीवाने समृद्ध असलेल्या, अनेक डोंगरदऱ्या, नयमरम्य गवती कुरणे, नद्या, नाले, तलाव या विपूल नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या व जवळपास ५० हजार एकरावरील विस्तीर्ण ज्ञानगंगा अभयारण्य पर्यटकांना खुणावत आहे.पर्यटकांना माहिती देण्याकरिता अभयारण्यालगतच्या गावांमधील २४ गाइड पर्यटकांच्या सेवेत रुजू आहेत. एक वाघ, नवीन आलेला रानगवा, २५ ते ३० बिबटे, सुमारे ५० अस्वल, तडस ,हरण, काळवीट , चौसिंगा आणि यासह इतर वन्य प्राणी यांचा मुक्त वावर ज्ञानगंगा मध्ये आहे. बुलढाणा व खामगाव अशा दोन रेंजमध्ये या अभयारण्याचा विस्तार आहे. सकाळी सहा ते नऊ आणि दुपारी तीन ते सहा या वेळेत जंगल सफारीचा आनंद पर्यटकांना घेता येतो. एका जिप्सी मध्ये सहा प्रवासी आणि गाईड ची व्यवस्था केलेली असते. शिवाय पर्यटकांच्या काही खाजगी वाहनांनाही वन विभाग याठिकाणी गाईड सह परवानगी देते. पलढग धरण व माटरगाव धरण पॉईंट व गोंधनखेड गेट अशी प्रसिद्ध तीन गेट आहेत.

लवकरच जलविहारचाही आनंद
पर्यटकांनी ज्ञानगंगा अभरण्यात जास्तीत जास्त संख्येने पर्यटनास यावे त्यासाठी सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. अलीकडे भरपूर प्रतिसाद मिळतोय. पलढग धरण येथे दोन बोट ची व्यवस्था नव्याने करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांना जलविहाराचाही आनंद लवकरच मिळणार आहे, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्य जीव) म. द. सुरवसे यांनी दिली आहे.

कसे जाल
ज्ञानगंगा अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा खामगांव राज्य मार्गास लागून असलेल्या २०५ चौ. कि. मी. क्षेत्रात पसरले आहे. या अभयारण्याच्या क्षेत्रात असलेले बोथा गाव जुने वनग्राम आहे.

सध्या प्लँन नको….
एका महिन्यासाठी बोथा मार्ग बंद

बुलडाणा ते खामगांव राष्ट्रीय महामार्ग वरील ज्ञानगंगा अभयारण्यातील रस्ता लांबीत नूतनीकरण व मजबूतीकरणाचे काम करण्यासाठी किमान एक महिन्याचा कालावधी लागणार आहे. ( यामुळे बुलडाणा ते बोथा मार्गे खामगांव या मार्गावरील वाहतूक ३० जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत बंद करण्यात येत असून खामगांवसाठी पर्यायी मार्ग बुलडाणा-वरवंड-उंद्री-खामगांव हा खुला राहिल. सर्व वाहतूक एका महिन्यासाठी उंद्री मार्गाने वळविण्याचे आदेश जिल्हाधिकारी एस. राममूर्ति यांनी जारी केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here