Home प्रेरणदायी तुम्ही थक्क व्हाल वाचून ‘या’ तीन बहिणींच्या जिद्दीची कहाणी

तुम्ही थक्क व्हाल वाचून ‘या’ तीन बहिणींच्या जिद्दीची कहाणी

अरविंद शिंगाडे यांच्या फेसबुक वाँल वरून

एक सत्य प्रेरणादायी घटना नक्की वाचा

खामगाव: समाजात मुलापेक्षा मुलगी बरी, असे म्हटले जात असले तरी प्रत्यक्षात मुलाचाच हट्ट धरला जातो. हे वास्तव नाकारता येत नाही. असे असतानाही तऱ्हाळा येथील नारायण वाघमारे यांनी आपल्या मुलींना चांगले संस्कार व शिक्षण देऊन नोकरीला लावले. एक, दोन नव्हे तर चक्क तीनही मुली आज महाराष्ट्र पोलिस दलात शिपाई म्हणून रुजू झाल्या आहेत.

तऱ्हाळा येथील महिला पोलिस म्हणून रुजू झालेल्या त्या पहिल्या सख्ख्या तीनही बहिणी समाजासमोर एक आदर्श ठरत आहेत.

मंगरूळपीर तालुक्‍यातील शेलुबाजार येथून जवळच असलेल्या तऱ्हाळा येथील शेतमजूर म्हणून काम करणाऱ्या नारायण वाघमारे यांना तीन मुली आहेत. मुलींच्या जन्माने खचून न जाता त्यांनी तीनही मुलींना चांगल्या संस्कारासोबतच शिक्षणाकडे लक्ष दिले. आपल्या जीवनाचे उद्दिष्ट सतत त्यांच्या डोळ्यासमोर ठेवले. त्यामुळे या तीनही बहिणींनी जिद्द व चिकाटीमुळे शिक्षण व त्यानंतर पोलिस दलात दाखल होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यामुळे या तीनही बहिणी आज महाराष्ट्र पोलिस दलात सेवा देत आहेत. मुलगा असो किंवा मुलगी चांगले संस्कार, जिद्द व चिकाटी असली की अशक्‍य काहीच नसते असे याचा आदर्श समाजाने घ्यायला हवा.

प्राथमिक शिक्षण ते नोकरीचा प्रवास नारायण वाघमारे यांची मोठी मुलगी प्रिया (वय 24), भाग्यश्री (वय 21) व श्रद्धा (वय 19) या तिघींचे प्राथमिक शिक्षण तऱ्हाळा येथे, माध्यमिक शिक्षण शेलुबाजार व पदवीचे शिक्षण मंगरूळपीर या तालुक्‍याच्या ठिकाणी झाले. शिक्षणासोबतच नोकरीची जिद्द मनात ठेवून प्रयत्न सुरू केले. त्यामुळे प्रिया ही 2013 च्या पोलिस भरतीत शिपाई पदाकरिता पात्र ठरली. मोठ्या बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवून भाग्यश्री व श्रद्धा यांनी पोलिस दलातील सेवेकरिता प्रयत्न सुरू केले. 2018 मध्ये झालेल्या पोलिस भरतीमध्ये या दोन्ही बहिणींची निवड झाली. तसेच त्या ता. 7 जानेवारी 2019 रोजी पोलिस दलातील सेवेत रुजू झाल्या. त्यामुळे महाराष्ट्र पोलिस दलात सेवा देत, कायद्याचे रक्षण करणाऱ्या या तीनही मुली आदर्श ठरत आहेत.

“सावित्रीबाई, महात्मा जोतीराव फुले यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे उघडली. त्यांनी दाखविलेल्या मार्गावरून मी तीनही मुलींच्या जन्माचे स्वागत, चांगले संस्कार देऊन घडविण्याचा प्रयत्न केला. माझ्या तीनही मुलींनी #मुलगा #नसल्याची खंत न होऊ देता जिद्द व चिकाटीने प्रयत्न केले. त्यात त्यांना यश आले. त्यामुळे मला माझ्या तीनही मुलींचा अभिमान वाटतो.”

– नारायण प्रल्हादराव वाघमारे (वडील), रा. तऱ्हाळा, ता. मंगरूळपीर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here