Home कृषि वार्ता सुगंधित ‘लिली’ ने रचला अर्थसंपन्नेतेचा पाया

सुगंधित ‘लिली’ ने रचला अर्थसंपन्नेतेचा पाया

शेगाव: जलयुक्त शिवार अभियानात प्रथम आलेल्या येऊलखेड्यात एकेकाळी जिरायती शेती केली जायची, आज त्या गावशिवारात नंदनवन फुलल्याचे दिसत आहे. शेततळ्यांचे गाव म्हणून ख्यातीप्राप्त झालेल्या येऊलखेड्यात जलयुक्तअंतर्गत ५९ शेततळे निर्माण करण्यात आल्याने शेतकरी बागायती शेती करू लागले आहेत. फळबाग, फुलपीक शेती, मत्स्यतळी, शेडनेड शेतीकडे शेतकरी वळला आहे. शशी पुंडकर यांनी फुलपीक शेतीचा सुरू केलेला प्रयोग यशस्वी झाला आहे. शून्य खर्चाच्या फुलपिकाने पुंडकर कुटुंबीयांना रोजगाराची नवी संधी निर्माण करून दिली आहे.
शेगाव तालुक्यातील येऊलखेड गाव परिसरात तीस बाय तीस आकाराचे लांबी-रुंदी असलेले व तीन मीटर खोली असलेले शेततळे मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. हिरवेगार झालेले शिवार पाहून जलयुक्त शिवार अभियान या गावात प्रभावीपणे राबविल्याची जाणीव पाहणाऱ्याला नक्कीच झाल्याशिवाय राहात नाही. कृषि विभागामार्फत शेततळ्यांचे महत्त्व पटवून देण्यात आले. एकंदरीत जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी अर्थसंपन्नतेचा पाया रचला आहे. आज या गावातील शेतकरी सधन झाले आहेत. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून घेतलेल्या शेततळ्याच्या आधारावर शशी पुंडकर यांनी एक एकर क्षेत्रावर लिली जातीची सुगंधित फुलपीक शेती केली आहे. लिलीच्या फुलांना चांगली मागणी आहे. हे बारमाही पीक आहे. संत गजानन महाराजांच्या शेगाव येथील मंदिर परिसरातील दुकानदार ही फुले विकत घेतात. त्यामुळे पुंडकर यांना चांगला रोजगार मिळाला आहे. शिवाय शेततळ्यात मत्स्यबीज टाकून ते मच्छीचे उत्पादन घेत आहेत. शशी पुंडकर, त्यांच्या पत्नी व वडील असे तिघे जण या शेतीत प्रचंड मेहनत घेतात.

शून्य खर्च, उत्पन्न अधिक
लिलीच्या पिकावर कुठलीही फवारणी करावी लागत नाही. लागवडीपासून ते काढणीपर्यंतचादेखील खर्च येत नाही. एक झाड २५ वर्षे टिकते. मूळामध्ये कंद वाढतात. या झाडाची वर्षातून एकदा छाटनी करावी लागते. केवळ शेणखत व पाण्यावर हे पीक येते. ३ ते ५ वर्षांनी कंद काढावे लागतात. बीज म्हणून कंदाची दोन रुपये नगाने लागवडीसाठी विक्रीदेखील होते. त्यातूनही मिळकत होते. साधारण: जून महिन्यात लागवड केली जाते. थंडीच्या दिवसात तीन महिने लिलीच्या झाडाला फुले येत नाहीत. इतरवेळी दररोज चारशे रुपयांप्रमाणे उत्पन्न मिळत असल्याचे पुंडकर यांनी सांगितले.

खारपाणपट्ट्यात जलसमृद्धी
शेगाव तालुक्यातील काही भाग खारपाणपट्ट्यात येतो. याच पट्ट्यात येऊलखेड गाव येते. क्षारयुक्त पाण्यामुळे शेतीची पोत खराब होते. मात्र, जलयुक्त शिवारअंतर्गत मोठ्या प्रमाणावर शेततळ्यांचे निर्माण केल्याने शिवार जलमय होण्यास मोठी मदत झाली. हे पाणी जास्त क्षारयुक्त नसल्याने शेती पिकांसाठी पोषक ठरले आहे. सगळीच शेतजमीन कोरडवाहू होती. ती आता पाणीदार झाली असून, ही जमीन बागायती शेतीलाही मागे टाकत आहे. दुष्काळातही जलसमृद्धीचा अद्भूत चमत्कार केवळ जलयुक्त शिवार अभियानामुळे घडला आहे.

अपार मेहनत
खरीप व रब्बी हंगामातील पारंपरिक पिके घेण्यासोबतच नवनवीन प्रयोग शेतकरी आहेत. त्यासाठी सकाळपासून सायंकाळपर्यंत ते घेत असलेल्या मेहनतीला तोड नाही. प्रचंड मेहनत, जिद्द आणि चिकाटीने काम करत असल्याचे फळ आम्हाला मिळत असल्याच्या प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here