Home कृषि वार्ता नोकरी सोडून शिक्षिका वळली फळबाग शेतीकडे 

नोकरी सोडून शिक्षिका वळली फळबाग शेतीकडे 

शेगाव : तालुक्यातील येऊलखेड येथील सुवर्णा व शशीकांत पुंडकर या प्रयोगशील दाम्पत्याने जलयुक्तअंतर्गत तयार केलेल्या शेततळ्यावर फळबागेसह विविध प्रकारचे पीक आधुनिक पद्धतीने घेण्याचा सुरू केलेला प्रयोग यशस्वी ठरला आहे. प्रचंड मेहनत, जिद्द आणि चिकाटीने हे दाम्पत्य शेतात कष्ट उपसत असल्याने त्यांना बऱ्यापैकी उत्पादन होत आहे. यातून कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीचा स्तर उंचावत आहे. फळपीकामध्ये पेरूची लागवड करण्यात आली असून, २० दिवसांमध्ये त्यांना ४५ हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. आणखी डिसेंबरपर्यंत बागेतून पेरू निघणार असल्याने दोन ते अडीच लाखांचे उत्पादन होण्याची अपेक्षा आहे.
शशीकांत पुंडकर बीए भाग एक उत्तीर्ण असून, पत्नी सुवर्णा पुंडकर या उच्चशिक्षित आहेत. सुवर्णा यांचे शिक्षण एमए, बीएड झाले आहे. त्या खासगी शिक्षण संस्थेवर शिक्षिका होत्या. पती शशीकांत हे प्रयोगशील शेतकरी असून ते उत्तम शेती करतात. आपणही त्यांना साथ देऊन काळ्या आईची सेवा केल्यास भरघोस उत्पादन घेऊ शकतो या विचाराने सुवर्णा यांनी स्वत: उत्कृष्ट शेतकरी बनून शशीकांत यांचे हात बळकट केले. जलयुक्त शिवार अभियानातून बनविलेल्या शेततळ्याच्या पाण्यावर या दाम्पत्याने विविध प्रकारच्या पिकांची लागवड केली आहे. त्यातील पेरू फळबाग त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण व भरभरून आर्थिक हातभार लावणारी ठरली आहे. शशीकांत यांचे वडील भास्कर भाऊराव पुंडकर हेदेखील शेतात त्यांच्या सोबतीला राब राब राबत आहेत.
आठ बाय सहा अशा अंतर पद्धतीने एका एकरामध्ये ४०० पेरूच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. रोप लावल्याचे हे त्यांचे चौथे वर्ष आहे. जून महिन्यामध्ये या झाडांची कटिंग करावी लागते. त्यामुळे झाडांना पेरू मोठ्या प्रमाणावर लगडतात.
दररोज ७५ किलो पेरूची विक्री
ऑक्टोबरमध्ये बहार येतो. तेव्हापासूनच पेरूंची विक्री सुरू होते. ३० रुपये किलो या दराने सध्या पेरूची विक्री केली जात आहे. दररोज ७५ किलो पेरू विकला जात आहे. गत वीस दिवसांच्या काळात १५ क्विंटल पेरूची विक्री झाली असून त्या माध्यमातून सुमारे ४५ हजारांचे उत्पन्न झाले आहे. शेतकरी ते ग्राहक अशी ते पेरू विकतात. अजून डिसेंबरपर्यंत पेरूची विक्री चालणार असल्याने आर्थिक उत्पन्नात वाढ होईल असे शशीकांत पुंडकर यांनी सांगितले.

दोघेही विविध पुरस्कारांचे मानकरी
शशीकांत पुंडकर हे एक दर्जेदार आणि उत्तम शेती करत असल्याने त्यांना कृषीरत्न आणि जिल्हा परिषदेचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार बहाल करण्यात आला. त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नी सुवर्णा यांना उत्कृष्ट शेडनेट शेती केल्याबद्दल रोटरी कृषि दीपस्तंभ व पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचा स्त्री शक्तीचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

जलमित्र पुरस्कार वितरणात पेरूचे सादरीकरण
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल अकोला येथे नुकताच जलमित्र पुरस्कार वितरण सोहळा मंत्रिगणांच्या उपस्थितीत पार पडला. याठिकाणी पुंडकर यांच्या पेरूचे विशेष कौतुक झाले. येथे पेरूचे सादरीकरण झाले. तसेच मान्यवरांना पॅकिंगमध्ये पेरू भेट देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here